उद्योग विश्वातली ‘अन्नपूर्णा’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jul-2020   
Total Views |
Jayanti kathale_1 &n





अस्सल मराठमोळ्या चवीच्या खाद्यपदार्थांसाठी भारतासह, अगदी सातासमुद्रापार प्रसिद्ध असलेल्या ‘हॉटेल पूर्णब्रह्म’च्या महिला उद्योजिका जयंती कठाळे यांच्या कार्यप्रवासाचा घेतलेला हा आढावा...



जयंती कठाळे या मूळच्या नागपूरच्या. आयटी क्षेत्रात गलेलठ्ठ पगाराची नोकरी करणार्‍या जयंती नोकरीनिमित्त देशोदेशी प्रवास करत होत्या. काही वर्षांपूर्वी नोकरीनिमित्ताने त्या संपूर्ण परिवारासोबत बंगळुरूमध्ये स्थायिक झाल्या. देशोदेशी फिरताना त्यांनी अनेक वेगवेगळ्या पदार्थांची चव चाखली. मात्र, कायमस्वरूपी बंगळुरूसारख्या अमराठी शहरात स्थायिक झाल्यावर त्या मराठमोळ्या पदार्थांच्या आठवणीने व्याकुळ होत असत. एकदा तर पती व तीन महिन्यांच्या बाळाला घेऊन २७ तासांचा विमान प्रवास करत असताना त्यांना शाकाहारी जेवणाअभावी ब्रेड-बटर खावा लागला. या प्रसंगानंतर त्यांना खाद्यक्षेत्र व्यवसायात उतरावे, असे प्रकर्षाने वाटू लागले.


मराठमोळ्या कुटुंबात जन्मलेल्या जयंती यांच्या स्वयंपाकाला अगदी पारंपरिक चव होती. एकत्र कुटुंबात वावरलेल्या जयंती यांनी आजीच्या हाताखाली स्वयंपाकघरातल्या सगळ्या कला उत्तम शिकून घेतल्या होत्या. मराठमोळे पदार्थ बनवून खाण्याची आणि खाऊ घालण्याची आवड त्यांना होती. आपल्या याच कौशल्याचा उपयोग करण्याचे त्यांनी ठरवले. जयंती यांनी आपली नोकरी सांभाळून उत्सवाप्रसंगी पुरणपोळी आणि मोदक तयार करून विकण्यास सुरुवात केली. तेव्हा ‘ऑर्कुट’ या सोशल माध्यमाचा त्यांनी यासाठी पुरेपूर वापर करून घेतला. लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने, स्वतःचा व्यवसाय करण्याचा विचार त्यांच्या मनात आला. २०१२-१३ मध्ये त्यांनी ‘पूर्णब्रह्म’ नावाचे स्वतःचे मराठमोळे उपाहारगृह बंगळुरुमध्ये सुरु केले.


‘पूर्णब्रह्म’ची स्थापना करण्यापूर्वी जयंती यांनी सहा महिने बंगळुरुमधील छोट्या-मोठ्या प्रत्येक उपाहारगृहात जाऊन तेथील परिस्थितीचा, पदार्थांचा, सेवेचा, दरांचा, गुणवत्तेचा बारकाईने अभ्यास केला. पदार्थांची गरज लक्षात घेतली. महाराष्ट्रातल्या मुख्य शहरांत जाऊन तिथल्या वैशिष्ट्यपूर्ण पदार्थांची चव चाखली. आपल्याला ग्राहकांना वेगळे काय देता येईल? अमराठी माणसाला मराठी पदार्थांकडे कसे आकर्षित करता येईल? इत्यादी गोष्टींचा अभ्यास केला. मित्रपरिवाराचा सल्ला घेतला आणि ‘पूर्णब्रह्म’ची निर्मिती झाली.


आयटी क्षेत्रातील नोकरी सोडून सुरुवातीला दोन सहकार्‍यांच्या मदतीने त्यांनी छोटेसे रेस्टॉरंट सुरु केले. लोकांचा प्रतिसाद वाढू लागला, तशी जागेची उणीव भासू लागली. काही काळातच त्यांनी बंगळुरुमधील ‘एचएसआर लेआऊट’ या उच्चभ्रू वस्तीमध्ये ५,७०० चौरस फूट जागेत ‘पूर्णब्रह्म’चे आलिशान उपाहारगृह थाटले. ते आता बंगळुरूमधील मराठी पदार्थ खाऊ घालणारे उत्तम दर्जाचे उपाहारगृह म्हणून ओळखले जाते.


या मराठमोळ्या पदार्थांचा आस्वाद आपण महाराष्ट्रात राहून घेत आहोत, असा ग्राहकाला ‘फील’ यावा, या दृष्टीने ‘पूर्णब्रह्म’ उपाहारगृहात वातावरणनिर्मिती केली आहे. आयटी क्षेत्रातील नोकरीमुळे कधीकाळी स्कर्ट, पॅन्ट-शर्टमध्ये वावरणार्‍या जयंती या आपल्या हॉटेल्समध्ये चक्क नऊवारी साडीत वावरतात. एकावेळी २०० जणांची पंगत बसू शकेल, अशी चौरंग-पाटाची भारतीय बैठक तिथे मांडण्यात आली आहे. परदेशातील मराठी माणसाला आपल्या देशाची कमी भासू नये म्हणून त्याला अगदी गरमागरम तूप, भात आणि मेतकूट मिळावे, यासाठी त्या अक्षरश: दिवस-रात्र एक करत आहेत. गर्भवती स्त्रियांना आपल्या हॉटेलमध्ये आल्यावर खुर्चीत बसण्यास आराम वाटावा, यासाठी विशेष खुर्च्या तयार करण्यात आल्या. इतकेच नाही तर परदेशात सहज मिळू शकत नाहीत, असे अळिवाचे लाडूही याठिकाणी मिळतात.


‘पूर्णब्रह्म’चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, इथे महिला सबलीकरणाच्या दृष्टीने महिलांना प्राधान्य दिले जाते. कर्मचार्‍यांपैकी ५० टक्के महिला आहेत. इतर क्षेत्रांप्रमाणे पगाराच्या बाबतीत स्त्री-पुरुष यांच्या पगारात भेदभाव केला जात नाही.


भविष्यात पाच हजार शाखा उघडत आपल्या व्यवसायाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्याचा विचार करणार्‍या जयंती यांचा ‘फ्रँचायझी’ देतानाही महिलांना प्राधान्य देण्याकडे कल असतो. जयंती आयटी क्षेत्रात असल्याने त्यांच्या आदर्श म्हणजे ‘इन्फोसिस’च्या संस्थापिका सुधा मूर्ती! त्यांनी जयंती यांच्या आग्रहाखातर ‘पूर्णब्रह्म’ला भेट दिली. त्यांनाही हा उपक्रम आवडला. पुण्यात आणि बंगळुरू येथील ‘इन्फोसिस’मध्ये ‘पूर्णब्रह्म’च्या शाखा सुरू करण्यासही त्यांनी परवानगी दिली. मुंबईत अंधेरी येथेही ‘पूर्णब्रह्म’ची शाखा सुरू झाली आहे. भारताबाहेर फिलाडेल्फिया आणि शिकागो येथेही ‘पूर्णब्रह्म’च्या शाखा आहेत, तसेच मुंबई-दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावरही शाखा सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.


‘मोठे स्वप्न बघा. ते पूर्ण करण्यासाठी धडपड करा. वाटेत ठेच लागून खाली पडाल, तरीही उठून पुन्हा मार्गक्रमण करा. पुन्हा सर्व ताकदीनिशी उठा, सर्व प्रयत्न पणाला लावा.. यश नक्की तुमचेच होईल’ हा मूलमंत्र अनेक यशस्वी व्यावसायिक आणि उद्योजक देतात आणि स्वतःही त्याचे पालन करतात. असेच एक मोठे स्वप्न उराशी बाळगून मराठमोळ्या जयंती कठाळे या आज एक यशस्वी महिला उद्योजिका बनल्या आहेत. अशा या भारतीय महिला उद्योजिका जयंती कठाळे यांच्या ‘पूर्णब्रह्म’च्या पुढील वाटचालीस दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!





@@AUTHORINFO_V1@@