समरस समाज निर्माण करूया...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jul-2020   
Total Views |
Anil Bhasme_1  






जातीय विषमता का आणि कशासाठी, याचा विचार करताना अनिल भस्मे यांचे एकच उद्दिष्ट आहे, ते म्हणजे ‘जातिभेदाच्या भिंती पाडूया, समरसतेचे जीवन निर्माण करूया...’

समाजकार्याचे पदव्युत्तर शिक्षण घेऊन कायद्याचेही पदव्युत्तर शिक्षण घेतलेले अनिल भस्मे आज सामाजिक समरसतेचे काम करतात. ते सध्या ‘वेंकिज इंडिया लिमिटेड’मध्ये ‘जनरल मॅनेजर पर्सोनल’ या पदावर कार्यरत आहेत. या पदावर काम करताना समाजातील विविध स्तरांवरील लोकांशी त्यांचा संबंध, संपर्क येत असतो. सामाजिक जडणघडण, वळणवाटा यांचा मागोवा घेत अनिल आपल्या परीने प्रत्येकाला गरजेप्रमाणे साहाय्य करत आहेत. हे करताना मुख्य गाभा असतो तो समाजिक समरसतेचा. एखाद्याला वाटले की, आपल्यावर जातीनिहाय अन्याय होतोय किंवा कुणी खोडसाळपणे असे वातावरण तयार करत असेल, तर अनिल त्या प्रसंगातील सत्य समोर आणतात. समाज हा एकसंध असून आपल्या सर्वांचा आहे, हे पटवून देतात. कारण, अनिल भस्मे यांचे वैयक्तिक जीवनात आलेले अनुभव.


भस्मे कुटुंब मूळ पन्हाळा कोल्हापूरचे. अनिल यांचे वडील गणपती भस्मे कामानिमित्त कर्‍हाडला आले. गणपती हे कर्‍हाडच्या स्टेट बँकेमध्ये शिपाई, तर आई अंजनी गृहिणी. दोघेही निरक्षर. पण, मानवी शाश्वत मूल्ये मुलांनी शिकावीत, यासाठी दोघेही आटोकाट प्रयत्न करत. या दाम्पत्याला तीन मुले. त्यापैकी एक अनिल. अंजनीबाई धार्मिक, सत्य, न्याय, धर्म याबाबत जागरूक. प्राण गेला तरी खोटे बोलू नकोस आणि खर्‍याची साथ सोडू नकोस, असे संस्कार त्यांनी अनिल यांना दिले. या अशा वातावरणात अनिल वाढत होते. ते अभ्यासात हुशार होते. पाचवीला असताना अनिल यांनी एका वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला. त्यांना पारितोषिक मिळाले. घरी आल्यावर आईने पारितोषिक पाहिले आणि तिच्या डोळ्यात अश्रू आले. आई का रडते, विचारल्यावर अंजनीबाई म्हणाल्या, “आपलं पोर शिकूसवरू लागलंय, काहीतरी चांगल करतंय म्हणून रडू आलं.” त्या प्रसंगाने अनिल यांच्या जीवनालाच कलाटणी दिली.


१९७०चे दशक असावे. कर्‍हाडला कृष्णामाईची जत्रा भरे. त्या जत्रेत देवळात पूजाप्रसाद म्हणून अन्नदान असे. त्यावेळी लहान मुले तिथे अन्न वाढण्याचे काम करत. अनिललाही वाटे की आपणही देवळातल्या त्या पंगतीमध्ये ‘वाढपी’ म्हणून एकदा तरी काम करावे. पण, जातीयतेच्या विषम दरीमुळे तिथे अनिलला मज्जाव करण्यात आला. शिंपी समाजात जन्म घेतल्याने असे आहे, असे अनिल यांना वाटलेच असावे. पण, भेदभाव आणि तत्सम विषमतेला जातीयतेचे नाव जरी असले तरी त्याला इतरही वैयक्तिक संदर्भ आणि जडणघडणाची विकृती असते, हे पुढच्या काळात अनिल यांना समजले. अनिल यांचा मित्र आबा संघाच्या शाखेत जायचा. अनिलही त्यांच्याबरोबर शाखेत जाऊ लागले. जातीय विषमतेचे ओरखडे मनात होते. मात्र, संघ शाखेत त्यांनी जे वातावरण अनुभवले, त्यामुळे त्यांचा दृष्टिकोनच बदलला. इथे त्यांचे शिक्षक स्वत: तथाकथित उच्चवर्णीय समाजाचे होते. पण, अनिल यांना पोटच्या पोरासारखे ते जीव लावायचे. अनिलचे शिक्षण, पुढची प्रगती यावरही त्यांच्या आईवडिलांशी चर्चा करायचे. आईवडिलांना आनंद व्हायचा की, संघ शाखेतले गुरूजी घरी येऊन आपल्याशी संवाद साधतात. इथूनच अनिल यांच्या मनात ‘जातिभेदाच्या भिंती पाडूया, समरसतेचे जीवन निर्माण करूया’ हा संकल्प निर्माण झाला.


आपण आयुष्यात काही तरी चांगले करावे, असे त्यांना वाटू लागले. त्यामुळेच की काय दहावी आणि पुढे बारावीलाही अतिशय वंचित परिस्थितीमध्येही ते चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाले. पुढे त्यांनी ‘मास्टर ऑफ सोशल वर्क’चे पदव्युत्तर शिक्षण घ्यायचे ठरवले. समाजासाठी काम करण्याचे शास्त्रशुद्ध आयाम ते शिकले. शिक्षण पूर्ण झाले, पण तीन वर्षे झाली तरी नोकरी मिळाली नाही. या काळात अनिल मनातून खचले. या काळात त्यांना धीर दिला तो वाचनाच्या सवयीने. कर्‍हाडमधील वाचनालयातील सर्वच पुस्तके त्यांनी वाचून काढली. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनचरित्र वाचून अनिल यांना प्रेरणा मिळाली. त्यामुळे ते नोकरीसाठी शहराबाहेर पडले. इचलकरंजीला नोकरी करू लागले. तिथे गेल्यावर कंपनीच्या आऊटहाऊसमध्ये राहून स्वत:चा स्वयंपाक स्वत:च बनवून काम करू लागले. याच काळात नोकरी करता करता त्यांनी कायद्याचे शिक्षणही पूर्ण केले. आज अनिल यांचे जीवन स्थिर आहे. ते सध्या पुण्याला निवासाला आहेत इचलकरंजीला सुटलेला संघसंपर्क पुन्हा पुण्यात सुरू झाला. तसेही अनिल यांचा एक नेमच आहे की, कुठेही असो संघ उत्सवाला जायचेच जायचे. पुण्यातही हा त्यांचा नेम चुकला नाही. पुण्यात गेल्या तीन-चार वर्षांत बर्‍याच सामाजिक उलाढाली झाल्या. या घटनांना सामाजिक विद्वेषाचे राजकीय रंग काही व्यक्तींनी दिले. अवघ्या महाराष्ट्राचे वातावरण ढवळून निघाले. या पार्श्वभूमीवर अनिल भस्मे यांनी समरसता मंच शहर कार्यकारिणीची जबाबदारी स्वीकारली. कोणतेही काम करताना त्यांचा उद्देश एकच आहे, समरस समाज निर्माण करूया...







@@AUTHORINFO_V1@@