
बकरा ही ऑनलाईन खरेदीची गोष्ट नाही; काँग्रेस नेत्याचे वक्तव्य
मुंबई : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने सर्वच सणांवर आणि उत्सवांवर काही निर्बंध घातले आहेत. त्याचाच भाग म्हणून सरकारने बकरी ईदनिमित्तानेही गर्दी होणार नाही याची काळजी घेत काही निर्बंध घातले आहेत. तसेच याबाबत गृहविभागाने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मात्र, यावर काँग्रेसचे माजी मंत्री नसीम खान यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच बकरी ही ऑनलाईन खरेदीची गोष्ट नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
नसीम खान म्हणाले की, कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता नियम व अटींसह राज्यातील सर्व दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. भाजी मार्केट, मांस मार्केटला परवानगी देण्यात आली आहे, मग बकरा खरेदीला परवानगी का नाही? बकरा ही ऑनलाईन खरेदी करण्याची गोष्ट नाही. सरकारमध्ये अल्पसंख्याक समाजाचे अनेक मंत्री आणि आमदार आहेत. त्यांनीही योग्य पाठपुरावा करून राज्य सरकारच्या ध्यानात ही गोष्ट आणून द्यावी.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत नुकतीच लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी यांची एक बैठक संपन्न झाली होती. त्या बैठकीत कोरोना पार्श्वभूमीवर या वर्षी बकरी ईद साधेपणाने साजरी करावी, असे सर्वानुमते ठरले. त्या अनुषंगाने शासनाने काही मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. त्याचे पालन सर्व संबंधितांनी करावे असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. त्या अनुषंगाने शासनाने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.