शरयू तीरावरी अयोध्या...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jul-2020
Total Views |

nepal_1  H x W:



नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी नुकतेच एक वादग्रस्त वक्तव्य केले. ते म्हणतात, “श्रीरामाची जन्मभूमी नेपाळ असून, श्रीरामाचा जन्म नेपाळमधील ठोरी या ठिकाणी झाला होता. राजा दशरथसुद्धा नेपाळचा होता. त्याने नेपाळमधील रीदी या गावी पुत्रकामेष्ठी यज्ञ केला होता. वाल्मिकीही नेपाळचेच. वाल्मिकींचा आश्रमसुद्धा नेपाळमध्ये होता. पूर्वीच्या काळी लांबचा प्रवास शक्य नसल्याने तेव्हा श्रीरामाला भारतातील अयोध्येतून जनकपुरीपर्यंत येणे शक्य नव्हते. म्हणून श्रीरामाचा जन्म जनकाच्या गावाजवळ नेपाळमध्ये झाला होता.” कवी भानुभक्त यांच्या जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात ओली बोलत होते. हे कवी भानुभक्त कोण, तर ज्यांनी 19व्या शतकात ‘वाल्मिकी रामायणा’चा नेपाळी भाषेत अनुवाद केला ते कवी. त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो की, ओली यांच्या वक्तव्यात थोडे तरी तथ्य आहे का? वाल्मिकी श्रीरामायणात अयोध्येचे स्थान कुठे सांगितले आहे? नेपाळमधील ‘ठोरी’ ही ‘खरी’ अयोध्या असू शकते का, ते पाहू...



श्रीरामायणातील ‘बालकांड’मध्ये अयोध्येबद्दल वाल्मिकी लिहितात-
कोसलो नाम मुदितः स्फीतो जनपदो महान् ।
निविष्टः सरयूतीरे
प्रभूतधनधान्यवान् ॥ १-५ -५
अयोध्या नाम नगरी तत्रासील्लोकविश्रुता ।
मनुना मानवेन्द्रेण या पुरी निर्मिता स्वयम् ॥ १-५-६
शरयू नदीच्या काठावर कोसल नावाचे एक महाजनपद होते. या राज्यात विपुलता होती, भरपूर धनधान्य होते. तेथील लोक सुखाने राहत होते. त्या कोसल राज्यात, ‘अयोध्या’ नावाची नगरी होती. ती नगरी स्वत: मनुने निर्माण केली होती. या विस्तीर्ण नगरीतील राजमार्ग रोज फुलांनी सजवले जात. त्या नगरीत अनेक उद्याने व आमराई होत्या. इंद्राप्रमाणे शोभणारा दशरथ इथे राज्य करीत होता इत्यादी वर्णन येते.


यातील महत्त्वाचे आहे ते अयोध्येचे स्थान - शरयू नदीच्या काठावर. नकाशात आपल्याला दिसते की, उत्तर प्रदेशमधील अयोध्यानगरी शरयू (घगर) नदीच्या काठावर आहे. नेपाळमधील ठोरी गाव शरयूच्या काठावर नाही. तसेच ठोरी गाव दुसर्‍या कोणत्या मोठ्या नदीच्या काठावर देखील नाही. यामुळे ठोरी ही शरयू तीरावरील अयोध्या असूच शकत नाही. ‘वाल्मिकी रामायण’ पुढे सांगते, की, श्रीराम-लक्ष्मण-सीता जेव्हा वनवासासाठी निघाले, तेव्हा अयोध्येचे नागरिक त्यांच्या मागे गेले. अयोध्यावासीयांच्या सोबतीने श्रीरामाने वनवासाची पहिली रात्र तमसा नदीच्या काठावर घालवली. पहाट उजाडताच श्रीराम-लक्ष्मण-सीता यांनी अयोध्यावासीयांना मागे सोडून झरझर वाहणारी तमसा नदी ओलांडली. (आता फैजाबाद जिल्ह्यातील या नदीला नाल्याचे स्वरूप आले आहे. वाळलेल्या नदीच्या पात्रात ठिकठिकाणी अतिक्रमणदेखील झाले आहे.) पुढे तिघांनी गोमती नदी पार केली व कोसल देशाची सीमा असलेली स्यांदिक नदीदेखील पार केली.


कदा अहम् पुनर् आगम्य सरय्वाः पुष्पिते वने ।
मृगयाम् पर्याटष्यामि मात्रा पित्रा च सम्गतः ॥ २१५-४९
मातृभूमीची सीमा ओलांडताना श्रीरामाला गहिवरून आले. श्रीरामाने खेदाने म्हटले, “आता मी कधी परत येऊन आईवडिलांना सोबत घेऊन शरयू नदीच्या काठी असलेल्या अरण्यात शिकार करायला येईन? मला शिकारीची हौस नाही, पण आईवडिलांना पुन्हा कधी पाहीन, या विचारानेच मन व्याकूळ होत आहे.” या नंतर तिघेजण गंगेच्या तीरावर पोहोचले व तिथून निषादराज गुहाने त्यांना गंगा पार नेले. वाल्मिकी रामायणात अजून एका प्रसंगी अयोध्येचे स्थान कळते. श्रीराम-लक्ष्मण-सीता वनवासात गेल्यावर लवकरच दशरथाचा मृत्यू झाला. त्यावेळी भरत व शत्रुघ्न केकय राज्यात त्यांच्या आजोळी होते. वशिष्ठ ऋषींनी दूतांना भरत व शत्रुघ्नला घेऊन येण्यासाठी पाठवले. अयोध्येतून पाच दूत द्रुतगतीने निघाले. उत्तरेला कूच करून हस्तिनापूर येथे त्यांनी गंगा नदी पार केली.



ते हस्तिनापुरे गङ्गाम् तीर्त्वा प्रत्यङ्मुखा ययुः ।
पाञलदेशमासाद्य मध्येन कुरुजाङ्गलम् ॥ २१३ -६८
अयोध्या शरयूच्या पश्चिम तीरावर वसली आहे. त्यामुळे पश्चिमेला जाताना शरयू पार करावी लागत नाही. अयोध्येच्या पश्चिमेला मोठी नदी आहे - गंगा. अर्थात, गंगा आणि शरयू या दोन्ही नद्यांच्या मधील भागात अयोध्या वसली आहे. नकाशात पाहिले असता कळेल की, नेपाळमधील ठोरी गाव गंगा आणि शरयूच्या मध्ये नक्कीच नाही. पुढील प्रसंगात, दूतांकडून निरोप मिळताच, भरत आजोळहून म्हणजे केकयहून अयोध्येला निघाला. हा परतीचा मार्ग थोडा दक्षिणेकडून होता. भरत एकसारखा आठ दिवस प्रवास करून अयोध्येस पोहोचला. ‘वाल्मिकी रामायण’ सांगते की, या प्रवासात त्याने सतलज, सरस्वती, यमुना व गंगा नदी ओलांडली. त्यावर एकशाला येथे गोमती नदी ओलांडली आणि दुसर्‍या दिवशी पहाटे तो अयोध्येस पोहोचला.



एक साले स्थाणुमतीम् विनते गोमतीम् नदीम् ।
... अयोध्याम् मनुना राज्ञा निर्मिताम् स ददर्श ह । २ .७१ .१८
या प्रवासमार्गावरून कळते की, अयोध्या गोमती व शरयूच्या मधील भागात आहे. नेपाळमधील ठोरी गाव या दोन्ही नद्यांपासून खूप दूर आहे. जर ‘अयोध्या’ खरोखरच नेपाळच्या ठोरी या ठिकाणे असती, तर भरताला अयोध्येत पोहोचण्यासाठी शरयू नदी व नंतर गंडकी नदीसुद्धा ओलांडावी लागली असती. या सर्व वर्णनातून अयोध्येचे ठिकाण नक्की कुठे होते, हे लक्षात येते. तमसा नदी व शरयू नदीच्या मधील भूभागात अयोध्या वसली होती. आज फैजाबाद जिल्ह्यातील अयोध्या नगरी म्हणून आपण जी ओळखतो, तिच्या पूर्वेला शरयू आणि पश्चिमेला ओळीने - तमसा, गोमती व गंगा या नद्या आहेत.

आता नेपाळचे पंतप्रधान ओली यांनी केलेल्या वक्तव्याविषयी काही प्रश्न -


१. ओली यांनी म्हटले की, त्या काळात प्रवासाची साधने नव्हती. भारतातील अयोध्येपासून नेपाळमधील जनकपुरी हा लांबचा प्रवास शक्य नव्हता. म्हणून अयोध्या नेपाळमध्येच होती. पण, ‘वाल्मिकी रामायणा’त भरताने केलेला केकय ते अयोध्या प्रवास किंवा श्रीरामाने केलेला अयोध्या ते लंका प्रवास हा अयोध्या ते जनकपुरी प्रवासाच्या कितीतरी पट जास्त होता. मग ओली यांच्या या मताला काय किंमत द्यायची?



२. जर ठोरी ही श्रीरामाची जन्मभूमी आहे, तर तिथे श्रीरामाचे जन्मस्थान दाखवणारे मंदिर का नाही? नेपाळमधील जनकपुरी हे सीतेचे जन्मस्थान मानले जाते व त्या ठिकाणी एक भव्य मंदिर अस्तित्वातही आहे. जर सीतेच्या जन्मस्थानी मंदिर आहे, तर तसे श्रीरामाच्या जन्मस्थानी का नाही?


३. २०१८मध्ये अयोध्या ते जनकपुरी अशी थेट बससेवाही सुरु करण्यात आली होती. ही बससेवा रामजन्मभूमी ते सीताजन्मभूमी अशी होती. त्याचे उद्घाटन ओली यांनीच केले होते. मग दोन वर्षांपूर्वी श्रीरामाचे जन्मस्थान भारतात होते आणि आता अचानक ते नेपाळमध्ये आहे, असे समजायचे का?


४. ठोरी येथे उत्खनन केले आहे का? त्या ठिकाणी प्राचीन वस्तीचे पुरावे मिळाले आहेत का? पूर्वी त्या ठिकाणी मंदिर होते का?


५. आजपर्यंत कोणत्या रामभक्तांनी, संतांनी तिथे जाऊन माथा टेकला आहे? किंवा त्याबद्दल दोहे, अभंग, लोकगीते, पोवाडे वगैरे लिहिले आहेत?


भारत-नेपाळ संंबंध अतिशय जुने आहेत. हे संबंध सांस्कृतिक आहेत, ऐतिहासिक आहेत. रोटी-बेटीचे नातेसंबंधही आहेत. भारतपुत्र श्रीराम हा नेपाळचा जावई खरा. श्रीरामाला भारतात मिळाले नाही इतके प्रेम नेपाळने श्रीरामावर केले. अगदी डोळसपणे प्रेम केले. श्रीरामाचे शब्द - ‘जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी’ हेच तर नेपाळचे ब्रीदवाक्य आहे. यावरुन पंतप्रधान ओली यांच्या वक्तव्याला कोणताही आधार नाही, हे स्पष्टपणे दिसते. मग असा दावा करून भारताशी संबंध बिघडतील असे त्यांनी का करावे? भारत-नेपाळ संबंध बिघडले, तर त्याचा कुणाला फायदा होणार आहे? पंतप्रधान ओली जे बोलत आहेत, त्याला नेपाळच्या नागरिकांचे समर्थन मुळीच नाही. कारण, या दाव्याला पुराव्यांचा आधार नाही. त्यांच्या पक्षाचे पाठबळ नाही आणि विरोधी पक्षदेखील सहमत नाहीत. मग ते कोणाच्या आधाराने बोलत आहेत? खरेच नेपाळचे पंतप्रधान हे बोलत आहेत, की त्यांचा बोलविता धनी कोणी वेगळा आहे?


- दीपाली पाटवदकर


@@AUTHORINFO_V1@@