एका डॉलरची गोष्ट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jul-2020
Total Views |


Doller_1  H x W



सकाळी सकाळी रियो ग्रँडजवळील जिल्ह्याचे न्यायमूर्ती डरवंट यांना टपालातून धमकीची चिठ्ठी आली. चार वर्षांपूर्वी त्यांनी ‘रॅटलस्नेक’ नावाच्या गुंडाला तुरुंगवास ठोठावला होता. तो तुरुंगात असताना त्याची आजारी मुलगी मरण पावली होती. शिक्षा पूर्ण होऊन तो गुंड कालच तुरुंगातून सुटला आहे. त्याने न्यायमूर्तींची मुलगी नॅन्सी व तिचा प्रियकर बॉबवर सूड उगवण्याचा निश्चय केला आहे.

 


डरवंटनी ती चिठ्ठी खिशात ठेवली. त्यांना अशा धमक्यांची सवय झाली होती. दुपारी कोर्टात गेल्यावर त्यांनी ती चिठ्ठी डिस्ट्रिक्ट अ‍ॅटर्नी बॉब लिटलफिल्डला दाखवली. काळजी घ्यायला सांगितली.


बॉबकडे आज एक छोटी केस होती. पोलीस अधिकारी किलपॅट्रिकने बॉबला सारी हकीकत सांगितली. ‘राफेल ओर्टिझ’ नावाच्या गुंडाला खोटा डॉलर चालवण्याच्या प्रयत्नात अटक झाली होती. राफेलने औषधाच्या दुकानातून खरेदी केली आणि तो डॉलर दिला. डॉलर खोटा निघाला. या क्षणी राफेल तुरुंगात सिगारेट ओढीत आपली केस सुनावणीला यायची वाट बघत होता. केसच्या संदर्भात राफेलची प्रेयसी जोया ट्रेव्हिना बॉबला भेटायला आली होती. किलपॅट्रिकने बॉबला तो खोटा डॉलर दाखवला. बॉबने तो निरखून पाहिला. खर्‍या डॉलरपेक्षा किंचित जाड आणि जड होता. बॉबने तो खिशात ठेवला आणि आपल्या चेंबरकडे गेला. किलपॅट्रिक जोयाला घेऊन आला.

 


“प्लीज, राफेलऐवजी मला तुरुंगात टाका. मी खूप आजारी होते आणि घरात पैसे नव्हते. म्हणून राफेलने माझ्यासाठी औषधे आणून खोटा डॉलर चालवण्याचा प्रयत्न केला,” जोया रडत म्हणाली.

 


“बॉब, तिच्यासाठी काही करता येईल का?” नॅन्सीने विचारले.

 


“नाही. मात्र, राफेलला कमीत कमी शिक्षा होईल असा मी प्रयत्न करीन. जोया, तू आता जा. ही केस सोमवारी सकाळी सुनावणीला येईल.

 


आमच्या गावातल्या मुली राफेलला खूप मानतात. श्रद्धा ठेवतात. प्रेमात पडलेल्या कोणत्याही मुलीवर संकट आलं तर राफेलचं फक्त स्मरण करणं पुरेसं आहे आणि आज त्याच्या मैत्रिणीमुळे, माझ्यामुळे त्याच्यावर संकट आलं.” डोळे पुसत जोया निघून गेली.

 


रविवारी दुपारी बॉब आणि नॅन्सी उघड्या टपाच्या गाडीतून पिएद्रा खाडीनजीक वनभोजनाला गेले होते. जेवण आणि थोडी विश्रांती झाल्यावर परतीच्या प्रवासात एक अडचण आली.

 

पलीकडच्या डोंगरातील वाटेवरून एक घोडेस्वार दौडत त्यांच्या दिशेने येत होता. त्याच्या हातात बंदूक होती.


“या घोडेस्वाराला मी कुठंतरी पाहिलंय. येस, हा रॅटलस्नेक. चार वर्षांपूर्वी याला तुझ्या वडिलांनी तुरुंगवास ठोठावला होता. त्याने आपल्या दोघांवर सूड उगवण्याची धमकी दिली होती,” बॉब पुटपुटला. तो आणखी काही बोलणार इतक्यात त्यांच्या गाडीजवळून सूं सूं करीत एक गोळी गेली. बॉबने गाडी जोरात दामटण्याचा विचार केला. पण, रॅटलस्नेक आता त्याच्या समोरच्या रस्त्यावरून जवळ येत होता. गाडी रिव्हर्समध्ये नेणं शक्य नव्हतं. बॉबने गाडी थांबवून सीटखालची गन उचलली नि नॅन्सीसह गाडीच्या पिछाडीला गेला. नॅन्सीने आपली एअर गन घेतली.

 


त्याने ती सरसावून दोन गोळ्या झाडल्या. पण, गनची रेंज कमी असल्याने रॅटलस्नेकला इजा झाली नाही. रॅटलस्नेकने झाडलेली एक गोळी पुन्हा त्याच्या कानांजवळून गेली आणि दुसरी गोळी मात्र नॅन्सीच्या दंडाला चाटून गेली. काही क्षणातच रॅटलस्नेक अधिक जवळ आला. या वेळी बॉबने झाडलेल्या दोन गोळ्या अचूक बसल्या. पण, रॅटलस्नेकच्या अंगावरील लेदर जॅकेटने त्याचे रक्षण केले. आणि गनमधल्या गोळ्या संपल्याचं बॉबच्या लक्षात आलं. एकच क्षण तो हताश झाला होता आणि त्याला काल रडत गेलेली जोया आठवली. काय बरं म्हणाली होती ती? प्रेमात पडलेल्या कोणत्याही मुलीवर संकट आलं तर राफेलचं फक्त स्मरण करणं पुरेसं आहे. तो स्वतःशीच हसला. नॅन्सीने भिऊ नये म्हणून गोळ्या संपल्या आहेत, हे तिला न सांगता तो म्हणाला, “फक्त उजवीकडे सरकून बैस आणि तो जवळ आला की एअर गन चालव. तो दचकला की मी काही तरी करतो.

 


नॅन्सी गुडघ्यांवर रांगत उजवीकडे सरकली. रॅटलस्नेक आणखीन थोडा पुढे आल्यावर तिने एअर गन झाडली. एक निरुपद्रवी छर्रा हवेत उडाला. घोडा दचकला रॅटलस्नेकचा तोल गेला. तोल सावरेपर्यंत आणखीन एक धमाका झाला आणि तो खाली कोसळला. त्याच्या गळ्यातून रक्ताची मोठी चिळकांडी उडाली होती.

 


बॉबने स्कार्फच्या साहाय्याने नॅन्सीची जखम बांधली. दोघे सुखरूप घरी पोहोचले. सोमवारी राफेलची केस सुनावणीला येण्यापूर्वी बॉबने किलपॅट्रिकला बोलावून घेतले आणि राफेलविरुद्धची केस मागे घ्यायची सूचना दिली, “राफेलविरुद्धचा मुख्य पुरावा म्हणजे तो खोटा डॉलर माझ्याकडे नाही. बाकीचे पुरावे तितकेसे मजबूत नाहीत. त्याला सोडून द्यावं.
“येस, सर. आणखीन एक. जज डरवंट, तुम्ही आणि नॅन्सी - तिघांना धमकी देणारा रॅटलस्नेक काल समुद्राजवळ मरण पावला आहे. माझी माणसं त्याचं प्रेत शवचिकित्सेसाठी आणत आहेत. त्याच्या गळ्याला मोठी विचित्र आकाराची जखम झाली आहे.

 


ती माझ्यामुळेच झाली आहे. आमच्यावर काल त्याने गोळीबार केला. माझ्या गनमध्ये गोळ्या शिल्लक नव्हत्या. मी राफेलचा खोटा डॉलर नळीत तिरका सरकवला आणि राफेल खूप जवळ आल्यावर बार उडवला. तो खोटा डॉलर - एकाच वेळी मला आणि राफेलला लकी ठरलेला - रॅटलस्नेकच्या गळ्यात शिरला. त्यामुळे राफेलला पुराव्याअभावी सोडावं लागणार आहे.

 

(ONE DOLLAR'S WORTH या कथेवर आधारित)

 

- विजय तरवडे

@@AUTHORINFO_V1@@