कोंबड्याची शान, माझ्या कोंबड्याची शान...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jul-2020
Total Views |

map_1  H x W: 0


आपण मागच्या लेखात काही प्राण्यांनी भारताच्या बाहेर जगप्रवास केल्याचे दाखवून देणारी संशोधने पाहिली. त्याद्वारे भारतीय पूर्वजांचा सुद्धा तसाच प्रवास भारतातून बाहेर जगभरात झाल्याचे अनुमानाने लक्षात येते, हेही पाहिले. प्रामुख्याने उंदीर आणि बैल हे ते दोन प्राणी होत. शेतकर्‍यांच्या सोबतीने राहणे हा या प्राण्यांचा स्वभाव असल्याचे अतिशय जुने निरीक्षण आहे. अशाच पद्धतीने शेतकर्‍यांच्या सोबतीने राहणारा अजून एक प्राणी म्हणजे ‘कोंबडा’. आपले अंगण सोडून फारसे बाहेर सहसा कुठेही न जाणार्‍या या कोंबड्याने कसा बरे केला असेल हा जगप्रवास? पाहूया एक अतिशय ताजे संशोधन.



कोंबड्याचा जगप्रवास


मागच्या लेखात उल्लेख केलेल्या अमेरिकेतील ‘National Center for Biotechnology Information' (NCBI) या संशोधन संस्थेत जगभरातील विविध जनुकांची जी नोंद झालेली आहे, त्या सूचीतील जनुक क्रमांक १११ हा भारतीय रानकोंबड्याच्या जनुकाचा आहे. १४००हून अधिक जनुकांच्या या यादीत असा वरचा क्रमांक याने पटकावला, इतके हे जुने संशोधन आहे. या संशोधनाचा उगम काळाच्या रेषेत मागे जातो तो थेट चार्ल्स डार्विनपर्यंत. जैविक उत्क्रांतीचा सिद्धांत मांडणारा हाच तो शास्त्रज्ञ डार्विन. कोंबड्याच्या बाबतीत डार्विनने अतिशय आग्रहाने ठासून सांगितले, की कोंबडा या प्राण्याचे सर्वात प्राचीन अस्तित्व भारतातच आढळते. 'Red Jungle Fowl' अर्थात ‘लाल रानकोंबडा’ या नावाने सामान्यत: ओळखला जाणारा आणि प्राणीशास्त्रात 'Gallus gallus spadiceus' या नावाने ओळखला जाणारा हा भारतीय प्राणी प्रथम उत्तर पाकिस्तानातल्या हिमालयाच्या रांगांच्या पायथ्यापासून ते आग्नेय आशियातल्या इंडोनेशियापर्यंत पसरलेल्या पट्ट्यात राहत असे, असे डार्विन म्हणतो.  पुढे जाऊन जगभरात झालेल्या विविध उत्खननांपैकी फक्त काही मोजक्याच ठिकाणी कोंबड्याची हाडे मिळाली. त्यावर झालेल्या संशोधनातून पुरातत्त्ववेत्त्यांनी पुढे असा निष्कर्ष काढला, की कोंबड्याचे सर्वात प्राचीन अस्तित्व भारतात नव्हे, तर उत्तर चीनमध्ये सापडते. उत्तर चीनमध्ये सुमारे इ. सनपूर्व ७०००च्या आसपास कोंबडा पाळण्याचे प्रयत्न झाले आणि कोंबडा तेव्हाच प्रथम माणसाळला. त्याउलट उत्तर पाकिस्तानात आणि भारतात इतरत्र मिळालेल्या पुराव्यांवरून कोंबड्याला माणसाळवण्याचे प्रयत्न सुमारे इ. सनपूर्व २०००च्या आधी पूर्ण झाले, असे दिसत होते. या संशोधनाने डार्विनचे म्हणणे खोडून काढले गेले.



परंतु श्री. मुकेश ठाकूर, मिंग-शान वांग (Ming-Shan Wang) आणि इतर अशा सुमारे ६० संशोधकांच्या मोठ्या चमूने सुमारे २०वर्षे चालवलेल्या आणि अगदी अलीकडेच (जून २०२०) प्रकाशित केलेल्या एका संशोधनानुसार, या निष्कर्षाला पुन्हा एक वेगळीच कलाटणी मिळाली आहे. या चमूने जगभरातून १२०विविध ठिकाणांहून कोंबड्यांच्या जनुकांचे ८६३नमुने अभ्यासले. त्यांच्या क्रमिक विकासाची साखळी शोधून काढली आणि त्याद्वारे त्यांनी असे दाखवून दिले की, कोंबड्याचे सर्वात प्राचीन अस्तित्व आशियातच सुमारे १२८०० वर्षांपूर्वी असल्याचे दिसते. त्याला माणसाळवण्याचे काम साधारणपणे त्याच्या नंतरच्या काळापासून ते सुमारे ६२००वर्षांपूर्वी या दरम्यानच्या काळात कधीतरी पूर्ण झालेले असावे. कोंबड्याचे हे सर्वाधिक प्राचीन अस्तित्व दाखवून देणारा भूप्रदेश प्रामुख्याने आहे आग्नेय आशिया! यामध्ये भारताची अतिपूर्वेकडची राज्ये (far east India), बांगलादेश, म्यानमार, लाओस, थायलंड आणि दक्षिण चीनचा समावेश होतो. या निष्कर्षाने डार्विनचा आग्नेय आशियाचा दावा तर बरोबर ठरतोच, पण त्याने दिलेले कालविषयक मतसुद्धा उलट अजून ३८००वर्षांनी मागेच जाते!



या संशोधनाचा प्रकाशित प्रबंध आपण पुढील लिंकवर जाऊन पाहू शकता :
या संशोधनाची ‘सायन्स मॅगझीन’ (ScienceMag.org) या विख्यात विज्ञानपत्रिकेने घेतलेली दखल सुद्धा आपण


पुढील लिंकवर पाहू शकता:



map_1  H x W: 0


प्राण्यांची स्थलांतरे काय सांगतात?


मागच्या लेखात उल्लेख केलेल्या इतर प्राण्यांप्रमाणेच या प्राचीन भारतीय रानकोंबड्याचाही प्रसार पुढे जगभर झालेला दिसतो. त्यात म्हटल्याप्रमाणे एकतर भारताच्या बाहेरचे लोक व्यापार किंवा इतर कुठल्यातरी कारणाने भारतात येऊन परत जाताना असे प्राणी आपल्या सोबत घेऊन गेलेले असावेत किंवा स्वत: आपले भारतीय पूर्वजच अशाच कुठल्यातरी कारणाने भारताबाहेर जाताना त्यांना आपल्या सोबत घेऊन गेलेले असावेत. यातली पहिली शक्यता गृहीत धरली, तरी त्यातून लक्षात येणारी गोष्ट अशी, की जगभर प्रसार होण्याइतके प्राणी परदेशी लोकांच्या सोबत भारतातून बाहेर गेले - याचा अर्थ ते लोक फक्त तात्कालिक कारणापुरतेच भारतात येऊन गेले. त्यांनी भारतात कायमचे स्थलांतर केले नाही. या एका कारणापुरते का होईना, परंतु परकीय लोकांचे भारतात स्थलांतर नाकारणारे असे एक अनुमान यातून निघते. अथवा दुसरी शक्यता गृहीत धरली, तरी त्यातून लक्षात येणारी गोष्ट अशी की, असे प्राणी भारतीय पूर्वजांच्या सोबतच जगभरात गेले. या प्रवासानंतर ते भारतीय पूर्वज जर आपल्या मायभूमीत परत आले असतील, तर या दुसर्‍या अनुमानातून ना आर्यांच्या भारतातील स्थलांतराला पुष्टी मिळते, ना भारतीयांच्या बाहेर स्थलांतराला. पण, जर ते भारतीय पूर्वज बाहेरच्या त्या प्रदेशातच राहिले असतील, तर मात्र यातून भारतीय पूर्वजांचे भारताच्या बाहेर स्थलांतर सुचवणारे असे तिसरे अनुमान निघते.

‘भारतातून बाहेर’ स्थलांतराचा सिद्धांत नाकारणार्‍या संशोधकांच्या हातात यातल्या दुसर्‍या अनुमानाला पकडून ठेवण्याखेरीज इतर कुठलाही मार्ग उरत नाही, कारण इतर दोन अनुमानांमध्ये त्यांचा वैचारिक पराभव आहे. याचे अगदी मूर्तिमंत उदाहरण पाहायचे असेल, तर अमेरिकेतल्या ‘युनिव्हर्सिटी ऑफ विस्कोन्सिन’चे एक नामवंत पुरातत्त्वज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ आणि सिंधू संस्कृतीचे तिथले गाढे अभ्यासक डॉ. जोनाथन केनोयर (Dr. Jonathan Kenoyer) यांचे विधान पाहावे. या कोंबडाविषयक संशोधनाच्या प्रकाशनानंतर यातून पुढे कोणता अर्थ निघणार आहे, हे त्यांच्यासारख्या चाणाक्ष बुद्धिवंताच्या लगेचच लक्षात आलेच असणार. त्यामुळेच त्यांनी याच ‘सायन्स मॅगझीन’ला आपली जी प्रतिक्रिया दिली, त्यात ते म्हणतात, “हे संशोधन आणि त्याचा निष्कर्ष अतिशय चुकीच्या दिशेत आहेत. यासाठी या संशोधकांनी प्राचीन जनुकांचे नमुनेच अभ्यासायला हवेत!” थोडक्यात, या एका विधानाने त्यांनी आधुनिक ’DNA Sequencing' आणि विज्ञानावर आधारित तत्सम प्रक्रिया एका अर्थी अमान्यच केलेल्या आहेत. परंतु, आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्यांनी स्वत: मात्र सिंधू संस्कृतीवर जे असंख्य शोधनिबंध/ प्रबंध प्रसिद्ध केलेले आहेत, त्यात मात्र याच ’DNA Sequencing' प्रक्रियांवर अतूट विश्वास दाखवला आहे. आर्य स्थलांतराच्या सिद्धांताच्या अभ्यासामध्ये लक्षात येणारा असा हा दुटप्पीपणा पुढे नित्याचाच होऊन जातो आणि त्याचे आश्चर्य वाटेनासे होते. वाचकहो, कोंबड्यांवरचे हे ताजे संशोधन एका वेगळ्याच सूर्योदयाची चाहूल सांगत आहे. हे प्राणी आणि त्यांची स्थलांतरे तर फक्त निमित्त आहेत. अशा संशोधनांचे हे कोंबडे या पाश्चात्त्य संशोधक आणि अभ्यासकांनी कितीही झाकून ठेवले, तरी त्यातून उलगडणार्‍या तथ्यात्मक इतिहासाचा सूर्य उगवल्यावाचून कसा काय राहील?



(क्रमश:)
- वासुदेव बिडवे
(लेखक भारताचा प्राचीन इतिहास, संस्कृती, कला, साहित्य, तत्त्वज्ञान -
अर्थात ’भारतविद्या’ अथवा ’प्राच्यविद्या’ (Indology) विषयाचे अभ्यासक आहेत.)
@@AUTHORINFO_V1@@