मुंबई : मुंबई शहर व उपनगरातील सर्व खाजगी व पालिकेच्या मालकीच्या इमारतींच्या सर्वेक्षणामध्ये धक्कादायक बाब समोर आली. महापालिकेच्या मालकीच्या असलेल्या ४४३ इमारती धोकादायक असल्याचे समोर आले आहे. दरवर्षी पावसापूर्वी धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून त्यातील धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली जाते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धोकादायक इमारतींची संख्या कमी झाली असली तरी घाटकोपरध्ये पालिकेच्या मालकीच्याच ५६ इमारती धोकादायक आहेत. दरम्यान, यंदा केलेल्या सर्वेक्षणात ४४३ इमारती धोकादायक असून गेल्या वर्षी धोकादायक इमारतींची संख्या ४९९ होती. यापैकी काही इमारती पाडून टाकण्यात आल्या आहेत.
दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर पालिकेतर्फे मुंबईतील धोकादायक इमारतींची यादी जाहीर करण्यात येते. त्यात ज्या इमारती तत्काळ पाडून टाकणे आवश्यक आहे अशा इमारती अतिधोकादायक म्हणून जाहीर केल्या जातात. दोन वर्षांपूर्वी तब्बल ६१९ अतिधोकादायक इमारती आढळून आल्या होत्या. गेल्यावर्षी ही संख्या ४९९ झाली होती. तर यंदा धोकादायक इमारतींचा आकडा ४४३ वर आल्याचे इमारत प्रस्ताव विभागातील अधिकाऱ्याने सांगितले. पालिकेच्या धोरणानुसार ३० वर्षे जुन्या इमारतींची संरचनात्मक तपासणी केली जाते. त्यात ज्या इमारती धोकादायक आढळतात, अशा इमारतींना घरे रिकामी करण्यासाठी ३५४ ची नोटीस बजावली जाते. त्यानुसार ही नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र काही रहिवाशांचे वाद असतील तर न्यायालयात धाव घेतात किंवा त्यांना इमारत धोकादायक वाटत नसेल तर ते पालिकेच्या तांत्रिक सल्लागार समितीकडे जातात. त्यामुळे त्या इमारती तशाच अवस्थेत राहत आहेत. पालिका नोटीस बजावूनही रहिवासी इमारत खाली करत नाहीत, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. धोकादायक इमारतींच्या यादीत ए विभागातील बेस्टच्या मालकीची मेहेर मेन्शन, ताडदेव येथील गंगा जमुना चित्रपटगृह, लालबागचे गणेश टॉकीज, सायन येथील पंजाबी कॉलनीतील सर्व २५ इमारती अशा इमारतींचा गेल्या अनेक वर्षांपासून धोकादायक इमारतींच्या यादीत समावेश आहे. भायखळा, डोंगरी, गिरगाव या भागात सर्वात जुन्या इमारती असल्या तरी त्या उपकरप्राप्त इमारती असल्यामुळे पालिकेच्या यादीत या भागातील खासगी धोकादायक इमारतींची संख्या सर्वात कमी आहे.
धोकादायक इमारती
एन विभागात (घाटकोपर) - ५२
एच वेस्ट (वांद्रे पश्चिम) - ५१
टी (मुलुंड) – ४९
के/पश्चिम (अंधेरी व जोगेश्वरी पश्चिम) – ३७
के पूर्व – अंधेरी व जोगेश्वरी पूर्व – ३१
पी उत्तर - (मालाड) – २८
एच इस्ट – (वांद्रे पूर्व) – २७