राष्ट्रवादीच्या नेत्यांवर ‘सीआयडी’ उदार!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jul-2020
Total Views |

Palghar Sadhu Murder Case





पालघर साधू हत्याकांड - काशिनाथ चौधरीचा आरोपपत्रात उल्लेखच नाही; भाजप नेते संतोष जनाठे यांचा आरोप


 
मुंबई (रामचंद्र नाईक) : राज्यासह संपूर्ण देशात खळबळ माजवणार्‍या पालघर जिल्ह्यातील बहुचर्चित साधू हत्याकांड प्रकरणात गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) करण्यात येणार्‍या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. सीआयडीने या प्रकरणात नुकतीच हजारो पानांची दोषारोपपत्रे न्यायालयात सादर केली. मात्र ही आरोपपत्रे दाखल करताना या प्रकरणात समावेश असलेल्या सत्ताधारी पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची नावे सीआयडीने वगळल्याचा खळबळजनक आरोप भाजपचे पालघर जिल्हा सरचिटणीस संतोष जनाठे यांनी शुक्रवारी केला.


जनाठे यांनी शुक्रवारी ‘दै. मुंबई तरुण भारत’शी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “पालघर साधू हत्याकांड प्रकरणात सीआयडीने आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याप्रकरणी पत्रकार परिषद घेत हे हत्याकांड अफवेतून घडल्याचा सांगितले. सीआयडीच्या तपासातून हेच सत्य समोर आल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. मात्र गृहमंत्र्यांचे हे म्हणणे कितपत खरे मानायचे,” असा प्रश्न यावेळी जनाठे यांनी उपस्थित केला.



ते म्हणाले, “या प्रकरणात ज्या चित्रफीती समोर आल्या त्यात तेथील राष्ट्रवादी काँग्रेसचा स्थानिक नेता काशिनाथ चौधरी हा अनेकांना मारहाण करतानाचे पहायला मिळत आहे. याप्रकरणात त्याचा सहभाग असल्याचा आधीपासूनच आरोप होत आहे. मात्र तीन महिने तपास केल्यानंतरही सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात काशिनाथ चौधरीसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांची नावे नाहीत. ही नावे आरोपपत्रातून वगळण्यात आल्याने सीआयडीच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे,” असे ते म्हणाले.


पुढे त्यांनी सांगितले की, “या साधू हत्याकांडातील प्रकरणातील सत्य शोधून काढण्यासाठी विवेक विचार मंचच्या माध्यमातून एक विशेष सत्य शोधन समितीची स्थापना करण्यात आली होती. निवृत्त न्यायमूर्ती अंबादास जोशी यांच्या अध्यक्षतेखालील सात सदस्यांच्या या समितीने जो अहवाल तयार केला, त्यात काही गंभीर बाबी समोर आल्या होत्या. हा अहवालदेखील आम्ही राज्य सरकारकडे सुपूर्द करून या प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) किंवा राष्ट्रीय तपास संस्थेकडून (एनआयए) करण्याची मागणी केली होती.




मात्र सरकारने त्याची दखल घेतली नाही. याप्रकरणात पोलिसांवर आधीच संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनीच साधूंना आरोपींच्या हवाली केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस दलातील आरोपींचीही चौकशी करण्याची मागणी होत आहे. मात्र सीबीआयचा तपास याबाजूने होताना दिसत नाही. राष्ट्रवादीच्या काही नेत्यांचीही नावे घेण्यात येत होती. मात्र काशिनाथ चौधरीसह काही जणांची नावेच आरोपपत्रात नसल्याने या प्रकरणात कुणाला तरी पाठिशी घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय होत आहे, असे त्यांनी सांगितले.

तपास सीबीआय किंवा एनआयएकडे सोपवा

साधू हत्याकांड हा एक आतंरराज्य विषय आहे. ज्या दिवशी हा प्रकार घडला त्यादिवशी दादरा-नगरहवेली येथेही पोलिसांवर हल्ला केल्याचा प्रकार घडला होता. महाराष्ट्रातून गेलेल्या गाड्यांना तेथे अडविण्यात आले होते. अनेक वर्षांपासून या भागात हिंदुत्वविरोधी वातावरण तयार करण्यात येते. यासाठी तेथे अनेक मिशनरीज आणि काही माओवादी संघटनाही कार्यरत असल्याचा आरोप होत आहे. हिंदुत्वाला विरोध करण्यासाठीच्या वातावरणातूनच साधू हत्याकांड घडल्याचा आरोप होत आहे. माओवादी आणि मिशनरीजच्या चौकशीसाठी हे प्रकरण सीबीआय किंवा एनआयएकडे सोपवलि पाहिजे असे जनाठ म्हणाले.












@@AUTHORINFO_V1@@