वनवासी महिलांना ‘आत्मनिर्भर’ करण्यासाठी ‘केशवसृष्टी’चा अभिनव उपक्रम : ‘बांबूच्या राख्या’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jul-2020
Total Views |

Keshavsrushti_1 &nbs



‘केशवसृष्टी ग्रामविकास योजने’अंतर्गत विक्रमगड तालुक्यातील नऊ गावांतील ३०० महिलांना जानेवारी २०२० मध्ये ‘प्रोजेक्ट ग्रीन गोल्ड’च्या माध्यमातून बांबू हस्तकलेचे प्रशिक्षण देण्यात आले व त्यामधून स्वायत्तपणे चालणारे १० उद्योगसमूह बनविण्यात आले. त्यांना ५० हजार राख्या बनविण्याचे आवाहन करण्यात आले. त्यांनीही हे आव्हान म्हणून स्वीकारले व ५० हजार राख्या बनविल्या. या राख्या म्हणजे चीनमधून आयात होणार्‍या राख्यांना एकप्रकारे सडेतोड उत्तर आहे. वनवासी महिलांनी ‘आत्मनिर्भर’ होण्यासाठी उचलेले पहिले पाऊल आहे.




‘केशवसृष्टी’च्या अनेक समाजाभिमुख प्रकल्पांपैकी ‘केशवसृष्टी ग्रामविकास योजना’ हा एक प्रकल्प. ही योजना दि. १ मे २०१७ पासून पालघर जिल्ह्याच्या वाडा, विक्रमगड व जव्हार या तालुक्यातील ४२ गावांमध्ये बहुआयामी विकास करीत आहे. यामध्ये पाणी, शेती, पर्यावरण, शिक्षण, संस्कार, उद्योग, रोजगार, महिला सबलीकरण, सौरऊर्जा आणि सरकारी योजनांचा लाभ ग्रामस्थांपर्यंत पोहोचविणे इ. विषयांवर हे ग्रामविकासाचे काम चालू आहे. वरील विषयातील विशेष उल्लेखनीय गोष्टी म्हणजे पाणी. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी गेल्यावर्षी १२ गावांचे ‘जलपरीक्षण’ करण्यात आले व त्यापैकी पाच गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविला.


शेती- शेतीविषयक प्रश्न सोडविण्यासाठी कृषी समिती बनवून त्याद्वारे आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल मार्गदर्शन करण्यात आले व शेतजमिनीचे ‘परीक्षण’ करण्यासाठी लवकरच प्रयोगशाळा उपलब्ध करुन देण्यासाठी समिती कार्यरत आहे.


पर्यावरण- या ४२ गावांत पहिल्या वर्षी १५०० झाडे लावण्यात आली. दुसर्‍या वर्षी १५ हजार झाडे लावली व आता १ लाख, ५०हजार झाडे लावण्याचा संकल्प आहे.


शिक्षण - संस्कार - यापैकी ३२ गावांमध्ये ‘माधव संस्कार केंद्र’ चालविले जाते, तर ९,१३८ स्कूल किट, १२ ई-लर्निंग व स्पोर्ट्स किट आणि १३ हजार विद्यार्थ्यांना गणवेष वाटपही करण्यात आले.


उद्योग-
रोजगाराच्या बाबतीत सांगायचे झाले तर पालघर जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी तरुणांना ‘अटल इनक्युबेशन सेंटर’ व ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’च्या माध्यमातून मार्गदर्शन करुन ‘उद्योगी’ बनण्याची प्रेरणा देणे व त्यासाठी सर्वतोपरी साहाय्य करणे यासाठी ग्रामविकास योजना प्रयत्नशील आहे.



महिला सबलीकरण -
या परिसरातील २१२ हून अधिक महिलांना घेऊन, त्यांच्या बचत गटांना सोबत घेऊन कापडी पिशव्या बनविण्याचा कारखाना सुरु करण्यात आला आहे.


सौरऊर्जा -
डोंगरीपाडा व घायपातपाडा येथे सौरऊर्जेच्या माध्यमातून घराघरात जलवाहिन्यांद्वारे पाणी पोहोचविण्यात आले.


सरकारी योजना
- सरकारी योजनांचा फायदा सर्व गावांना व शेतकर्‍यांना मिळावा, यासाठी ग्रामविकास योजना प्रयत्न करीत असून तिला पालघर जिल्हा प्रशासनचा पूर्ण प्रतिसाद मिळत आहे. अशा तर्‍हेने या ‘केशवसृष्टी ग्रामविकास योजने’ची यशस्वी वाटचाल चालू आहे. या यशामागील रहस्य म्हणजे या योजनेतील शहर-गाव संबंध! ज्याला ‘अर्बन-रुरल कनेक्शन’ अर्थात ‘युआरसी’ म्हणतात. ज्या गावांना या योजनेअंतर्गत निवडण्यात आले, त्या गावातील एक हरहुन्नरी तरुण जो आपल्या उराशी आपल्या गावाच्या विकासाचे स्वप्न बाळगून आहे व शहरातील असाच एक तरुण, जो स्वत:च्या उद्योग-व्यवसायात स्थिर आहे व ज्याला एखाद्या खेड्याचा विकास व्हावा, अशी तळमळ आहे, अशा दोघांची जोडी बनविण्यात आली आहे. अशा दोघांचे एकत्र येणे, त्यांची तार जुळणे ही या ग्रामविकास योजनेची ‘गुरुकिल्ली’ आहे.


rakhi_1  H x W:


असाच एक विरारमधील तरुण गौरव श्रीवास्तव ज्याच्यावर टेटवली गावाची जबाबदारी देण्यात आली होती. ‘साप्ताहिक विवेक रूरल डेव्हलपमेंट’तर्फे भालीवली गावात एक ग्रामविकास केंद्र चालविण्यात येते. हे गाव विरारजवळच आहे. गौरवने या केंद्रापासून प्रेरणा घेतली. तेथे बांबूपासून विविध गोष्टी कशा बनविल्या जातात, हे त्याने जवळून पाहिले. त्यानंतर आपल्या टेटवली गावासाठी तो ‘बांबू हस्तकला प्रशिक्षक’ घेऊन आला व त्याने गावातील महिलांना प्रशिक्षण दिले. त्याच्या लक्षात आले की, ग्रामीण महिलांच्या हातात कला आहे. डोक्यात कल्पना आहेत. बस्स! प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. त्या महिलांनी निरनिराळ्या वस्तू बनविल्या. त्याचा प्रसार गौरवने सोशल मीडियाद्वारे केला, ऑनलाईन ऑर्डर्स येऊ लागल्या. लोक टेटवली गावाच्या या केंद्राला भेट देऊ लागले. वस्तूंची विक्री होऊ लागली. ग्रामीण महिलांना चार पैसे मिळू लागले. त्यांच्या चेहर्‍यावर आत्मविश्वासाचे हास्य खुलले.



हे टेटवली गावचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून ‘केशवसृष्टी ग्रामविकास योजने’अंतर्गत विक्रमगड तालुक्यातील नऊ गावांतील ३०० महिलांना जानेवारी २०२० मध्ये ‘प्रोजेक्ट ग्रीन गोल्ड’च्या माध्यमातून बांबू हस्तकलेचे प्रशिक्षण देण्यात आले व त्यामधून स्वायत्तपणे चालणारे १० उद्योगसमूह बनविण्यात आले. सर्व गावांतील अनुभव हा की, या महिला अत्यंत मेहनती आहेत. त्यांच्या हातात उपजत कला आहे. त्यांना ५० हजार राख्या बनविण्याचे आवाहन करण्यात आले. त्यांनी ही हे आव्हान म्हणून स्वीकारले व ५० हजार राख्या बनविल्या. या राख्या म्हणजे चीनमधून आयात होणार्‍या राख्यांना एकप्रकारे सडेतोड उत्तर आहे. वनवासी महिलांनी ‘आत्मनिर्भर’ होण्यासाठी उचलेले पहिले पाऊल आहे. या महिलांच्या या प्रयत्नांना साथ देण्यासाठी पाड्यातील ‘उत्कर्ष मंडळ’ ही संस्था पुढे आली. ‘उत्कर्ष मंडळा’च्या आजवरच्या इतिहासाला हे साजेसेच झाले. ‘उत्कर्ष मंडळ’ हे या बांबूच्या राख्या प्रकल्पाचे मुंबईतील प्रमुख केंद्र बनले. ‘उत्कर्ष मंडळा’च्या शानभाग सभागृहात या राख्यांचे प्रदर्शन व विक्री केंद्र भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवार, दि. १० जुलै रोजी स्थानिक आमदार पराग अळवणी यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन करुन करण्यात आले. कार्यक्रमास स्थानिक नगरसेविका ज्योती अळवणीही उपस्थित होत्या. उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष सुहास जोशी व ‘केशवसृष्टी’चे विश्वस्त विमलजी केडिया हे आवर्जून उपस्थित होते.



स्वामीनारायण संप्रदायाच्या विलेपार्ले केंद्राचे पूज्य स्वामी श्री परब्रह्मस्वामी, श्रीसत्यस्वरूप स्वामी व त्यांचे १० शिष्य यांनी सोमवार दि. १३ जुलै रोजी उत्कर्ष मंडळातील बांबूच्या राख्यांच्या प्रदर्शनास भेट दिली. वनवासी भगिनींचे कौतुक केले व ग्रामविकास योजनेला भरभरुन आशीर्वाद दिले. तसेच पाड्यातील आपल्या भक्तगणांसाठी ६०० राख्या घेऊन गेले. अशा थोरामोठ्यांच्या आशीर्वादाने व कार्यकर्त्यांच्या मेहनतीने योजनेला यश मिळू लागले आहे. सर्व देशातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. राख्यांची उत्तम विक्री सुरु आहे. मुंबई सोडून देशातील सुदूर त्रिपुरापासून अहमदाबादपर्यंत, तर चंदिगढ, जयपूर, दिल्ली, नोएडा, गुरुग्राम (हरियाणा) आझमगड, प्रयागराज (उत्तर प्रदेश), रोहतास (बिहार) पासून तेलंगण, चेन्नईपर्यंत वेगवेगळ्या शहरांतून ऑर्डर्स येत असून त्यांना स्पीड-पोस्टद्वारे राख्या पाठविण्यात येत आहेत.


आज मुंबई-ठाणे परिसरात ४० ठिकाणी या राख्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. उदा. गोकुळधाम (गोरेगाव पूर्व) बांगूर नगर (गोरेगाव पश्चिम), ठाकुर कॉम्लेक्स (कांदिवली पूर्व), जे. बी. नगर (अंधेरी पूर्व), श्रीकृष्ण नगर (बोरिवली पूर्व) इ. या राख्यांसाठी आपण ‘केशवसृष्टी ग्रामविकास योजने’च्या खालील दोन कार्यकर्त्यांना संपर्क करु शकता.
मुकेश पाध्या- मो. ९८२१३४३१२५
किशोर पटेल- मो. ७०२१६३३४१५
या वर्षी या योजनेला मिळत असलेल्या हा उत्तम प्रतिसाद लक्षात घेऊन पुढील वर्षासाठी ‘केशवसृष्टी ग्रामविकास योजने’ने १० लाख राख्यांचे लक्ष्य ठेवले आहे. चला तर मग, या राखीपौर्णिमेसाठी विक्रमगडच्या वनवासी भगिनींनी बनविलेली राखी खरेदी करुया आणि आपल्या वनवासी बहिणीला ‘आत्मनिर्भर’ होण्यासाठी प्रोत्साहन देऊया! स्वदेशी राखी घेऊन चीनला सडेतोड उत्तर देऊया!



- मिलिंद करमरकर
@@AUTHORINFO_V1@@