मुंबई : कोरोना रुग्णांवर उपचार करताना अनेकदा टीकेचे लक्ष ठरलेल्या केईएम रुग्णालयाने आता त्यांची माहिती संकलित करण्यासाठी एक डिजिटल ऍप कार्यान्वित केला आहे. या ऍपमध्ये रुग्णाची संपूर्ण माहिती ठेवली जाणार आहे.
रुग्णांवर उपचार करता करता अनेकदा उपचार करणाऱ्यांना सुद्धा त्याची लागण होते. त्यामुळे आरोग्य खाते अनेक उपाययोजना करत आहे. या ऍपमुळे डॉक्टर किंवा रुग्णालय प्रशासनाला यापुढे कोविड -१९ रुग्णांच्या वैद्यकीय नोंदणीचे कागदपत्र हाताळण्याची गरज राहणार नाही. कागदपत्रे हाताळताना विषाणूचा प्रसार होण्याची भीती असते. या ऍपमुळे कुठल्याही प्रकारची कागदपत्रांची देवाण-घेवाण न करता रुग्णाला तपासता येईल. कारण त्या रुग्णाची सर्व माहिती या ऍपमध्ये नोंद केलेली असेल. के. जे. सोमय्या महाविद्यालयाच्या प्रोग्रामरद्वारे हा अॅप विकसित करण्यात आला आहे. रुग्णाची तपासणी होताच त्याचा ओळख क्रमांक अॅपवर अपलोड केला जातो. त्यामुळे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचार्यांच्या आवश्यकता भासेल तेव्हा केवळ एका क्लिकवर माहिती उपलब्ध होणार आहे.
रुग्णाच्या आजाराच्या माहितीबरोबरच, आजाराशी संबंधित इतर कोणत्याही माहितीच्या तपशिलाशिवाय रुग्णाला त्या त्या वेळेत दिली जाणारी औषधे देखील या ऍपमध्ये दर्शविली जाऊ शकतात. अॅपमध्ये रुग्णाच्या आरोग्याविषयी आणि त्याला उद्भवणाऱ्या धोक्यांची माहिती देखील अपद्वारे मिळू शकते. त्यामुळे डॉक्टरांनी रुग्णाच्या नातेवाईकांना संभाव्य माहिती देणेही आता शक्य होणार आहे. केईएम रुग्णालयाच्या मानसोपचार विभागालाही यात सहभागी करून घेण्यात आले आहे. मानसोपचार विभागामुळे रुग्णाच्या एकूण स्थितीबाबत त्याच्या कुटुंबाला माहिती देणे सोपे जाणार आहे. या ऍपमुळे रुग्णालयाबाबत रुग्णाच्या किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या मनात विश्वासार्हता निर्माण होणार आहे.