उद्धव ठाकरे काय धारावीचे मुख्यमंत्री आहेत का ? : नारायण राणे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jul-2020
Total Views |


Narayan Rane _1 &nbs




मुंबई : भाजप खासदार नारायण राणे यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत कोरोना काळात राज्य सरकारच्या कारभाराचा चांगलाच समाचार घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घरात बसून कारभार करणे थांबवावे, असा सल्ला त्यांनी दिला. देशातील कुठल्याही राज्यात असा प्रकार पाहायला मिळणार नाही, असा कारभार केवळ आपल्याच राज्यात सुरू आहे. 

महाराष्ट्र कोरोना आकडेवारीबद्दल प्रथम क्रमांकावर कसा आला याबद्दल चर्चा करण्यापेक्षा शरद पवार आणि खासदार संजय राऊत यांना राज्यातील राजकारण व भाजपबद्दल चर्चा करावीशी वाटते, असे म्हणत मॅरेथॉन मुलाखतीवरही त्यांनी टीका केली. आदित्य ठाकरे यांनी विरोधी पक्ष नेत्यांबद्दल बोलण्यापूर्वी पर्यटन मंत्रालय काय आहे, विरोधी पक्ष काय आहे याचा अभ्यास करून घ्यायला हवा, असा टोलाही त्यांना लगावला. 


नारायण राणे म्हणाले, "महाराष्ट्र कोरोना आकडेवारीत राज्य क्रमांक एक वर आहे. ते आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न होत नाही. कोरोना टेस्टचे प्रमाण कमी झाले आहे. धारावीत रोज केवळ ४० टेस्ट होतात मग रुग्ण आढळणार कसे. मुख्यमंत्री धारावीचे श्रेय घेतात, इतर महाराष्ट्राचे काय ते फक्त धारावीचे मुख्यमंत्री आहेत का ? त्यांनी राज्यातील इतर मुद्द्यांकडे दुर्लक्ष का केले आहे ?, मंत्रालयात सुरू असलेल्या कारभारावर केवळ पिंजऱ्यात बसून लक्ष ठेवाल तर राज्य सरे चालेल?," असे प्रश्न त्यांनी विचारले.


मुंबईतून कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांवर कुठल्याही प्रकारचे निर्बंध न आणता, त्यांच्या कोरोना चाचण्या करून त्यांच्या प्रवासाची सोय उपलब्ध करून द्यावी, गणेश भक्तांवर अन्याय करू नये, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. याच वेळी एका प्रश्नाला उत्तर देत असातान त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावरही टीका केली आहे. खरंतर 'माझ्यासारख्या व्यक्तीने अशा लोकांची दखल घेऊ नये परंतू विरोधी पक्ष नेत्यांवर टीका करताना ते त्यांचे काम करत आहेत, हे लक्षात घ्यायला हवे, आपल्या मंत्रीपदाची कार्ये, विरोधी पक्ष नेत्यांची कार्ये याचा अभ्यास करून आल्यास आदित्य ठाकरेंवर असे बोलण्याची वेळ येणार नाही, असेही ते म्हणाले.


पवार आणि राऊतांवर टीका


ज्यांच्यावर 'सामना'तून टीका झाली. अग्रलेख लिहीले त्यांच्यासोबत आता मुलाखत घेण्याची वेळ संजय राऊत यांच्यावर आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राऊत यांची मुलाखत म्हणजे कोरोनाच्या काळातील राजकारणच आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. दरम्यान, हे सरकार कौरवांचे सरकार असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. जे लोक म्हणतात, भाजपचे आमदार शिवसेनेमुळे निवडून आले त्यांनी आकडेवारी पहावी, कोणाला जनतेचा किती पाठींबा आहे, ते आपोआप समजले, असेही राणे म्हणाले.





@@AUTHORINFO_V1@@