काँग्रेसमधील युवानेत्यांची फरफट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jul-2020
Total Views |


agralekh_1  H x


आपण केलेल्या मेहनतीमुळे राज्यात पक्ष सत्तेपर्यंत पोहोचला आणि आता आपल्याच गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडेल, याची खात्री सचिन पायलट यांनाही होती. पण झाले उलटेच, काँग्रेसश्रेष्ठींनी राहुल गांधींना प्रतिस्पर्धी नको म्हणून सचिन पायलट यांचे पंख छाटले व अशोक गेहलोत यांना मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर आणून बसवले. इथूनच सचिन पायलट यांनी नाराजी वाढत गेली व ती पक्षाविरोधात बंड करण्यापर्यंत गेली.



कोणताही राजकीय पक्ष आपल्या प्रतिस्पर्धी पक्षाला चितपट करुन सत्ता मिळवण्यासाठीच राजकारणाच्या आणि निवडणुकीच्या रिंगणात उतरत असतो. मैदानात उतरले की, समोरच्या पक्षाशी दोन हात करण्यासाठी संबंधित पक्षाकडे ज्येष्ठ, अनुभवी आणि तरुण, तडफदार अशा दोन्ही नेतृत्वाची आवश्यकता असते. मात्र, लढाईत युवकांचा वापर करुन घेऊन नंतर सत्ता स्थापनेवेळी पक्षातील ज्येष्ठांसाठी तरुणांकडे दुर्लक्ष केले की, त्यांचा हिरमोड होत असतो. नंतर असे युवा नेतृत्व आपल्यावरील अन्याय सहन न होऊन आपल्याच पक्षाशी भांडू लागते, संघर्ष करते, बंड करते. असाच प्रकार देशातील १३५वर्षे जुन्या काँग्रेस पक्षात होत असून संपूर्ण देश कोरोनाशी लढत असताना काँग्रेस मात्र काँग्रेसशीच झगडत असल्याचे दिसते. अर्थात, काँग्रेसला असा संघर्ष नवा नाही, त्या पक्षात वेळोवेळी अनेकांनी बंड केले, त्यातले काही थंड झाले तर काहींनी आपल्या जुन्या पक्षालाच आपापल्या प्रभावक्षेत्रात थंड्या बस्त्यात नेले.

मात्र, या प्रत्येकवेळी काँग्रेसमधील युवा नेतृत्वाची फरफट झाली आणि युवकांनी काम करुनही सत्तेची फळे मात्र ज्येष्ठांनी चाखली. आताचे ताजे प्रकरण राजस्थानमधील असून त्याचा संबंध टोंक मतदारसंघाचे आमदार, माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्याशी आहे. इथे लक्षात घेण्याजोगा मुद्दा म्हणजे, राजस्थानमध्ये अशोक गेहलोत या बुजुर्ग मुख्यमंत्र्याशी सचिन पायलट यांचा संघर्ष आहेच, पण त्याहीपेक्षा तो राहुल गांधी यांच्याशी तर नाही ना, असाही प्रश्न उपस्थित होतो. कारण, पात्रता असूनही काँग्रेसमध्ये गांधी घराण्यापेक्षा अन्य कोणीही सर्वोच्च स्थानी जाऊ शकत नाही. तसा कोणी प्रयत्न केला वा काँग्रेसच्या मालकांना असा काही अंदाज आला तरी संबंधिताकडे दुर्लक्ष केले जाते, त्याला पक्षाच्या निर्णयप्रक्रियेतून बाजूला केले जाते. परिणामी, काँग्रेसमधील युवा नेत्यांवर स्वपक्षविरोधातच बंड करण्याची वेळ येते आणि त्याचाच दाखला सचिन पायलट यांच्या रुपात पाहायला मिळतो. तसेच अशा युवा नेत्यांच्या एकामागोमाग काँग्रेस त्यागातून वा नाराजीतून, राहुल गांधींच्या एकछत्री अंमलासाठी जनाधार असलेल्या युवा नेत्यांकडे दुर्लक्ष केले जाते का, जनाधार असलेल्या युवा नेत्यांना राहुल गांधींसमोरचे आव्हान मानले जाते का, हे प्रश्नही उपस्थित होतात.


वस्तुतः गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी राजस्थानमधील काँग्रेसच्या विजयात सचिन पायलट यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. पाच वर्षे राज्यभरात पायाला भिंगरी लावून ते फिरत होते आणि पक्षसंघटना बांधत होते. त्यातूनच २०१९मध्ये काँग्रेसला राजस्थानमध्ये एकहाती सत्ता स्थापन करण्याइतके बहुमत मिळाले. आपण केलेल्या मेहनतीमुळे राज्यात पक्ष सत्तेपर्यंत पोहोचला आणि आता आपल्याच गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडेल, याची खात्री सचिन पायलट यांनाही होती. पण झाले उलटेच, काँग्रेसश्रेष्ठींनी राहुल गांधींना प्रतिस्पर्धी नको म्हणून सचिन पायलट यांचे पंख छाटले व अशोक गेहलोत यांना मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर आणून बसवले. इथूनच सचिन पायलट यांनी नाराजी वाढत गेली व ती पक्षाविरोधात बंड करण्यापर्यंत गेली. असाच प्रकार मध्य प्रदेशातही घडला. इथेही ज्योतिरादित्य सिंधिया या लोकप्रिय, जनाधार असलेल्या आणि विधानसभा निवडणुकीवेळी पक्षासाठी कष्ट उपसलेल्या नेत्याला निकालानंतर बाजूला सारले गेले. मुख्यमंत्रिपद तर मिळाले नाहीच, पण पक्षाने त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष केले. सिंधिया मोठे झाले तर गांधी लहान होतील, या भयाने त्यांना राज्याच्या, सत्तेच्या पटलावर काँग्रेसकडून बेदखल करण्यात आले. परिणामी भविष्यातला अंधार पाहून ज्योतिरादित्य काँग्रेस सोडून भाजपवासी झाले. तसेच त्यांच्याबरोबर अनेक आमदार आणि अन्य युवा नेतेही भाजपत आले, मात्र, यामुळे राज्यातली काँग्रेस दुबळी झाली. म्हणजे पक्ष गलितगात्र झाला तरी चालेल, पण गांधींपेक्षा कोणी वरचढ होऊ नये, यातून इथे काँग्रेसचाच घात झाला. सचिन पायलट यांची नाराजी आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांचे यशस्वी बंड या अगदी अलीकडच्या घटना आहेत, पण त्याआधीही असे प्रकार घडलेले आहेतच व अजूनही सुरु आहेत.



आसामचे लोकप्रिय नेते हेमंत बिश्व शर्मा २००१ ते २०१५ सालापर्यंत काँग्रेसचे आमदार होते. पण नंतर राज्यातील ज्येष्ठ नेते तरुण गोगोई यांच्याशी असलेल्या मतभेदांमुळे हेमंत बिश्व शर्मा यांच्याकडेही काँग्रेसने दुर्लक्ष केले आणि अखेर २०१६ साली त्यांनी भाजपत प्रवेश केला. इथे झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून त्यांनी काँग्रेसशी झुंज दिली आणि त्या पक्षाला पराभूत केले. आज ते आसाम सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत. आणखी एक उदाहरण म्हणजे, आंध्र प्रदेशाचे विद्यमान मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी. जगन मोहन रेड्डी यांचे वडील वाय. एस. राजशेखर रेड्डी यांचे २००९ साली हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले आणि त्यानंतर जनतेने जगन मोहन रेड्डी यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी केली. पण, काँग्रेस नेतृत्वाने त्याकडे सपशेल दुर्लक्ष केले आणि अखेर जगन मोहन रेड्डी यांनी पक्षातून बाहेर पडत स्वतःचा नवा पक्ष स्थापन केला. आता ते स्वबळावर आंध्र प्रदेशात सत्तेवर आहेत, मात्र तिथेही मूळचा काँग्रेस पक्ष आता पार खिळखिळा झालेला आहे. अशाप्रकारे काँग्रेसकडून दुर्लक्ष झाल्याने पक्ष सोडलेल्यांची यादी मोठी आहे.



पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यादेखील पूर्वाश्रमीच्या काँग्रेसीच, पण पक्षाकडून पुरेशी रसद न मिळाल्याने त्या काँग्रेसमधून बाहेर पडल्या आणि मुख्यमंत्रीही झाल्या. आणखी अन्य युवा नेते ज्यांनी काँग्रेस पक्ष सोडला, त्यात गुजरातच्या अल्पेश ठाकोर आणि मुंबईतील प्रियांका चतुर्वेदी यांचा समावेश होतो, तर नाराजांमध्ये मिलिंद देवरा, अदिती सिंह, जितन प्रसाद, कुलदीप बिष्णोई, संदीप दीक्षित, दीपेंदर हुडा हे युवा नेते आहेत. नेहमीच ज्येष्ठांना दिला जाणारा सत्तेतला अधिकचा वाटा, पक्षाची सर्जिकल स्ट्राईकसारख्या विविध राष्ट्रीय विषयांबाबतची विचित्र भूमिका, महत्त्वाकांक्षांची पूर्तता न होण्यासारखी परिस्थिती, दुर्लक्ष-बेदखल करणे, अशा अनेक कारणांमुळे काँग्रेसमध्ये ही बंडाळी वा नाराजी सुरु असल्याचे दिसते. पण, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी वा राहुल गांधी वा गांधी घराण्याचे हुजरे याबाबत ठोस निर्णय घेत नाहीत. परिणामी, काँग्रेसमध्ये राहिलो तर आयुष्यभर गांधी घराण्याची गुलामी करावी लागेल आणि इथून बाहेर पडलो तर आपल्यालाही कर्तृत्व गाजवता येईल, या विचाराने फरफटीतून बाहेर पडत काँग्रेसमधले युवा नेतृत्व आपापला मार्ग निवडताना दिसते.
@@AUTHORINFO_V1@@