‘शॅडो कॅबिनेट’ हाजिर हो!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jul-2020   
Total Views |

mns shadow cabinet_1 



मुंबईत मनसेच्या संदीप देशपांडेंनी पालिकेतील गैरव्यवहार चव्हाट्यावर आणलाही, पण, राज्यातील इतर शहरांचे काय? तेथील गैरव्यवहारांना कोण वाचा फोडणार? पालिकेबरोबरच राज्य सरकारच्या स्तरावर अन्नधान्य पुरवठा, खते, कीटकनाशकांच्या बाबतीतही असेच गैरव्यवहार नुकतेच उघडकीस आले आहेत. तेव्हा, त्यांचा पर्दाफाश कोण करणार? सरकारच्या मंत्र्यांना जाब विचारुन त्यांना सळो की पळो कोणी करायचे? तेव्हा, मनसेच्या एक-दोन नेत्यांनीच नव्हे, तर संपूर्ण ‘शॅडो कॅबिनेट’नेच सरकारला आता धारेवर धरायला हवे.



महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ९ मार्च रोजी आपल्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्ताने झेंडाही बदलत एकप्रकारे पक्षाचे ‘रिब्रॅण्डिंग’ केले. तसेच यावेळी राज ठाकरेंच्या ‘शॅडो कॅबिनेट’ अर्थात ‘प्रतिरुप मंत्रिमंडळा’चीही घोषणा करण्यात आली. यामध्ये खुद्द अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शालिनी ठाकरे, अमेय खोपकर आणि इतर मनसे नेत्यांना सरकारवर वचक ठेवण्यासाठी विविध खात्यांची जबाबदारीही देण्यात आली. उद्देश हाच की, ही ‘शॅडो कॅबिनेट’ महाविकास आघाडी सरकारच्या प्रत्येक बारीकसारीक निर्णयांवर गिधाडासारखी नजर ठेवेल आणि जिथे सरकार चुकतयं, त्या त्या वेळी अक्षरश: तुटून पडेल. पण, मार्चनंतर आता जुलै महिना उजाडला तरी या संपूर्ण ‘शॅडो कॅबिनेट’ची ‘शॅडो’ फारशी कुठे दिसली नाही. याचा अर्थ मनसेने महाविकास आघाडी सरकारच्या या कोरोना निष्क्रियतेला विरोधच केला नाही, असे अजिबात नाही.



संदीप देशपांडे, नितीन देसाई आणि मनसेचे इतरही कार्यकर्ते, नेतेमंडळी गरजूंच्या मदतीला धावूनही गेले. प्रसंगी हॉस्पिटलमधील वाढीव बिले असो, पालिकेतील कोरोना साहित्य घोटाळा वा महावितरणचा वीजबिलातील सावळा गोंधळ याविरोधात मनसेने आवाजही उठवला. अमित ठाकरेंनीही आशा सेविकांंचे, विद्यार्थ्यांचे प्रश्न सरकार दरबारी मांडले. राज ठाकरेंनीही सर्वपक्षीय बैठकीत सरकारला महत्त्वपूर्ण सूचनाही केल्या. पण, मनसेच्या एकूणच ‘शॅडो कॅबिनेट’ची अपेक्षित असलेली सक्रियता, आक्रमकता मात्र अभावानेच दिसून आली. कोरोनाकाळातही ‘सरकार’ म्हणून महाविकास आघाडीचे काम प्रशासकीय पातळीवर सुरुच होते. यादरम्यानही सरकारने अधिकार्‍यांच्या बदल्यांपासून ते विविध क्षेत्रातील वादग्रस्त निर्णय घेतले. त्यामध्येही आर्थिक गैरव्यवहार, अफरातफरीचे प्रकार घडले. मुंबईत संदीप देशपांडेंनी हा गैरव्यवहार चव्हाट्यावर आणलाही, पण, राज्यातील इतर शहरांचे काय? तेथील गैरव्यवहारांना कोण वाचा फोडणार? पालिकेबरोबरच राज्य सरकारच्या स्तरावर अन्नधान्य पुरवठा, खते, कीटकनाशकांच्या बाबतीतही असेच गैरव्यवहार नुकतेच उघडकीस आले आहेत. तेव्हा, त्यांचा पर्दाफाश कोण करणार? सरकारच्या मंत्र्यांना जाब विचारुन त्यांना सळो की पळो कोणी करायचे? तेव्हा, मनसेच्या एक-दोन नेत्यांनीच नव्हे, तर संपूर्ण ‘शॅडो कॅबिनेट’नेच सरकारला आता धारेवर धरायलाच हवे.


‘इंजिना’ची दिशा कुणीकडे?


विरोधी पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष आपली भूमिका अगदी चोख बजावतोय. दैनंदिन बातम्यांमधून त्याची प्रचितीही जनतेला येतेच. रुग्णांच्या व्यवस्थापनातील घोटाळे असो अथवा पालिकेतील भ्रष्टाचार, भाजपनेही तो वेळोवेळी चव्हाट्यावर आणून शिवसेनेला पळता भुई थोडी केली. पण, या दरम्यान हाच प्रश्न पडतो की, 2019च्या निवडणुकीच्या पूर्वी ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत भाजपवर तुटून पडलेले राज ठाकरे या निष्क्रिय सरकारच्या विरोधात आपली आक्रमकता, आपला रोष का व्यक्त करत नाहीत? की फक्त निवडणुकांपूर्वीच राज ठाकरे गरजणार, बरसणार, असा प्रश्न आज जनतेलाही पडलेला दिसतो. महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेने राज्यातील युती-आघाडीची प्रस्थापित समीकरणे एकाएकी बदलली. मित्र शत्रूबरोबर गेले आणि कोणेएकेकाळी एकमेकांना पाण्यात पाहणारे, शिव्या देणारे हातात हात घालून मिरवू लागले. महाराष्ट्राच्या राजकारणाने बदललेली ही कूस लक्षात घेता, मनसेनेही हिंदुत्वाची वाट धरली.



भाजप-मनसेची आगामी काळात युती होईल अथवा नाही, झाली तर का, नाही तर का नाही, याची स्पष्टताही फडणवीसांनी नुकत्याच एका मुलाखतीत केली. पण, या विचित्र राजकीय चित्रामुळे मनसेसमोर मात्र काही प्रश्न निश्चितच उभे ठाकले आहेत. राज्यात एकहाती सत्तेचे राज ठाकरेंचे स्वप्न असले तरी मनसेसाठी हे आव्हान पेलणे आजघडीला शक्य दिसत नाही. आगामी काळात हे विरोधाभासाने भरलेले तिघाडी सरकार टिकेल अथवा नाही, यावरही पुढची काही राजकीय गणितं घडतील-बिघडतील. त्यामुळे निवडणुकीविषयी आज भाकीत करणे नकोच. पण, राज ठाकरेंसमोर सध्या तरी सत्ताधारी म्हणून समोर काँग्रेस-राष्ट्रवादी आहे, ज्यांच्यावर कायमच त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि आता तर त्याच गटात शिवसेनाही आहे, जिच्याशी जुळवून घेण्याचे कित्येक प्रयत्नही विफल ठरले. राहता राहिला प्रश्न भाजपचा, तर २०१९च्या लोकसभा, नंतर विधानसभा निवडणुकांपूर्वी राज ठाकरेंनी भाजपला लक्ष्य केले. तेव्हा राज ठाकरेंना तर भाजप-सेना युतीची सत्ता आल्यास काँग्रेस-राष्ट्रवादी सक्षम विरोधी पक्षही होऊ शकत नाहीत, असे वाटले होते आणि त्यांनी मनसेला विरोधी पक्षात बसवण्यासाठी मतदानाचे आवाहन केले. हे पाहता, आगामी काळात मनसेचे हे इंजिन नेमके कोणत्या दिशेने धावते, ते पाहणे रंजक ठरेल.
@@AUTHORINFO_V1@@