या नाव बद्ध...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jul-2020
Total Views |

Jakhadi Article _1 &



मूर्ख लक्षणात वर्णन केलेला माणूस हा ईश्वराला विसरणारा व पैसा आणि स्त्रिया यांना सर्वस्व मानणारा असतो. तीच गत ‘बद्ध’ माणसाची असते. देहबुद्धी प्रबळ असल्याने तो आयुष्यात फक्त पैसा व स्त्रिया यांना सर्वस्व मानतो. सत्संगती त्याला आवडत नाही. ईश्वराचे ध्यान करणे, हाती जपमाळ घेऊन नामस्मरण करणे त्याला कसे आवडेल? कारण त्याचा जप आणि ध्यानवस्तू निराळेच असतात.
समर्थांनी दासबोधात नरदेहाचे गुणवर्णन करून इतर स्तवनाबरोबर नरदेहाचेही स्तवन केले आहे, हे आपण मागील लेखात पाहिले. साधकाने नरदेहाचे यथायोग्य मूल्यमापन करून त्याला परमार्थाकडे लावावे व प्रपंच नेटकेपणाने सांभाळून जीवनाचे सार्थक करून घ्यावे, असा विचार समर्थांनी दासबोधात मांडला आहे. प्रत्येक माणसाने आपल्या अंतरंगातील चैतन्याचा साक्षात्कार करून घेऊन त्याचा अनुभव घ्यावा, असे दासबोधाचे सांगणे आहे. परंतु, उत्तम प्रकारचा देह मिळूनही जर त्या देहात परमार्थबुद्धीचा विचार नसेल, तर असा माणूस मूर्खच म्हणावा लागेल. त्याचा मूर्खपणा हा की, तो सारखा, ‘माझा देह, माझा देह’ असे म्हणत मायेच्या कचाट्यात अडकत जातो. आत्मबुद्धीचा त्याला विसर पडतो.

सांग नरदेह जोडले। आणि परमार्थबुद्धी विसरलें।
ते मूर्ख कैसे भ्रमले। मायाजळी ॥ (दा. १.१०.३३)


‘माझा देह’ असे आपण म्हणतो, पण असे म्हणणे हा एक भ्रम आहे. कारण, वस्तुस्थिती तशी नाही. यावर स्वामींनी दासबोधात, माणूस घर बांधतो व ते माझे समजतो या घटनेचा दृष्टान्त दिला आहे. स्वामी सांगतात, जमीन खणून माणूस घर बांधतो व ते माझे घर असे म्हणतो. पण, ते घर फक्त त्याचे नसून विंचू, साप, झुरळे, कुत्रा, मांजर अशा अनेक प्राण्यांचेही असते. तसेच ढेकूण, डास, माशा असे अनेक कीटक तेथे राहत असतात. ते घर त्यांचे समजून ते तिथे राहत असतात. त्याचप्रमाणे दासदासी, नोकरचाकर, पाहुणेरावळे, एवढेच कशाला चोरसुद्धा ते घर आपलेच समजतात! तद्वत आपण ‘माझा देह’ म्हणतो, तो तरी आपला कसा समजायचा. त्या देहातही केसांच्या मुळाशी उवा राहतात. शरीरावर गळू झाले, जखम चिखळली तर त्यात किडे होतात. पोटात जंत होतात. ते या देहाच्या आश्रयाने राहत असतात. अगदी अलीकडील उदाहरण द्यायचे तर कोरोनाचा विषाणू चुकून शरीरात शिरला तर तेथे तो आपला संसार थाटतो. त्यालाही हा देह त्याच्यासाठी आहे, असे वाटत असते. अशी ही देहाची एकंदरीत स्थिती आहे. म्हणून दासबोध सांगतो की, हा देह चांगला धडधाकट असतानाच परमार्थी लावला तर त्याचे सार्थक होते.
प्रापंचिक अज्ञानी लोकांना आत्मज्ञान कळत नाही. तेव्हा त्यांची जी लक्षणे आपण पाहतो, ती मुर्खांची लक्षणे होत. काही लोक शहाणे असूनही मूर्ख असतात. स्वामी त्यांना ‘पढतमूर्ख’ म्हणतात. मूर्खाची व पढतमूर्खाची लक्षणे दासबोधात वाचताना ती आपल्याला जवळची वाटतात. कारण, ते प्रत्येकाचे अनुभव असतात. ल. रा. पांगारकर सहज विनोदाने म्हणतात की, “ही लक्षणे वाचताना वाचकास वाटते की, माझे चरित्र समर्थांना इतक्या बारकाव्यानिशी कोणी जाऊन सांगितले!” पूर्ण प्रापंचिक माणसे देहबुद्धीच्या बाहेर पडत नाहीत म्हणून ते मूर्ख, ‘पढतमूर्ख’ असतात. आत्मज्ञानाकडे प्रवासाला सुरुवात केल्याशिवाय देहबुद्धी कमी होत नाही. ‘ज्ञानाशिवाय मोक्ष नाही’ हा सिद्धांत फार पूर्वीपासून आहे. आता ज्ञानाचा अधिकार समजण्यासाठी ‘बद्ध’, ‘मुमुक्षू’, ‘साधक’ व ‘सिद्ध’ अशा अवस्था कल्पिल्या आहेत. त्यांचे विवरण दासबोधात वाचायला मिळते. आपण सर्वसाधारण माणसे ‘बद्ध’ या गटात मोडतो. ‘बद्ध’ याचा अर्थ बांधला गेलेला किंवा बंधनात अडकलेला असा आहे. ‘बद्ध’ हा अविद्येने बांधला गेला आहे. अशा ‘बद्धा’चे वर्णन दासबोधात सविस्तरपणे केलेले आढळते.

‘बद्ध’ माणूस मी देहच आहे, असे समजून वावरत असतो. त्याला प्रपंचाची खूप माहिती असते. जीवन जगण्यासाठी आत्मज्ञानाची गरज त्याला वाटत नाही. समाधान कसे असते, याचा त्याला अनुभव नसतो.
परमार्थविषई अज्ञान। प्रपंचाचे उदंड ज्ञान।
नेणे स्वयें समाधान। या नाव बद्ध॥



जे प्रपंचात पूर्णपणे बुडालेले असतात आणि ज्यांना आत्मज्ञान कळत नाही, ते केवळ अज्ञानी असतात, असे समर्थांनी म्हटले आहे. अशा अज्ञानी माणसांची लक्षणे मूर्खलक्षणात व पढतमूर्खच लक्षणात सांगितली आहेत. याचा अर्थ बद्धाची लक्षणे व मूर्ख-पढतमूर्ख लक्षणे यात साम्य आहे. मूर्ख लक्षणात वर्णन केलेला माणूस हा ईश्वराला विसरणारा व पैसा आणि स्त्रिया यांना सर्वस्व मानणारा असतो. तीच गत ‘बद्ध’ माणसाची असते. देहबुद्धी प्रबळ असल्याने तो आयुष्यात फक्त पैसा व स्त्रिया यांना सर्वस्व मानतो. सत्संगती त्याला आवडत नाही. ईश्वराचे ध्यान करणे, हाती जपमाळ घेऊन नामस्मरण करणे त्याला कसे आवडेल? कारण त्याचा जप आणि ध्यानवस्तू निराळेच असतात.

हाती द्रव्याची जपमाळ। कांताध्यान सर्वकाळ।
सत्संगाचा दुष्काळ। या नाव बद्ध॥



‘बद्धा’चे भजन-पूजन, मनन-चिंतन सर्वकाही वेगळेच असते. भक्ताला सदैव ईश्वर दिसत असतो. पण, ‘बद्धा’चा प्रकार वेगळाच असतो. त्याला वाटत असते की, आपण डोळ्यांनी फक्त पैसा आणि स्त्रिया यांनाच पाहावे. कानांनी फक्त द्रव्य आणि दारा यांच्याच गोष्टी ऐकाव्या. मनात चिंतन करायचे झाले, तर पैशाचे आणि स्त्रियांचेच चिंतन करावे. काया, वाचा, मन, चित्त, जीव प्राण सर्वकाही द्रव्य आणि दारा. त्यांचेच तो सदैव भजन करीत असतो. पैसा व स्त्रिया हाच त्याचा परमार्थ असतो. तेच त्यांचे तीर्थ आणि त्यांच्यासाठी धडपड ही त्याची तीर्थयात्रा. द्रव्य आणि दारा त्याचे सर्वस्व झालेले असते. त्यांच्या व्यतिरिक्त तो एक क्षणही वाया जाऊ देत नाही. ज्या ज्या गोष्टी परमार्थात करायला सांगितले आहे, त्या सर्व त्याला द्रव्य आणि दारा यांच्यात दिसतात.

तीर्थयात्रा दान पुण्य। भक्ति कथा निरूपण।
मंत्रपूजा जप-ध्यान। सर्वही द्रव्य दारा॥


दिवस, रात्र, सर्वकाळ त्याला विषयध्यास लागलेला असतो. तो द्रव्य आणि दारा यांच्या सुखाच्या कल्पनेतून बाहेर येऊ शकत नाही. त्यातच तो बांधला गेलेला म्हणून ‘बद्ध’ असतो. बद्धाचे वर्णन करताना स्वामींनी त्याला ‘अंधारीचा अंध’ म्हटले आहे.



आता बद्ध तो जाणिजे ऐसा। अंधारीचा अंध जैसा।
चक्षुवीण दाही दिशा। सुन्याकार ॥


अंधारात सर्वांना चाचपडावे लागते. डोळस अंधारातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. परंतु, अंध कशाला प्रयत्न करील? त्याला सर्व दिशा अंधकारमयच. तद्वत ‘बद्ध’ हा बद्धपणात लिप्त असल्याने आत्मज्ञानाच्या प्रकाशाची तो कल्पना करू शकत नाही आणि त्याला आत्मज्ञानाची आवश्यकताही वाटत नाही. बद्धापुढे कोणी भक्त, ज्ञानी, तपस्वी, योगी, संन्यासी आले तरी तो त्यांची महानता जाणत नाही. सर्व प्रकारचे दोष बद्धांच्या ठिकाणी वास्तव्याला आलेले असतात. काम, क्रोध, मोह, दंभ, लोभ, मत्सर, तिरस्कार, ताठा, अहंकार, वादविवाद, कुतर्क, निंदा, अभिलाषा अशा अनेक दोषांचे त्याच्या ठिकाणी अधिक्य जाणवते. तो सदा संतनिंदा करीत असतो.



सत्संगाची नाही गोडी। संतनिंदेची आवडी।
देहबुद्धीची घातली बेडी। या नाव बद्ध॥


परर्थमार्गात प्रगती करण्यासाठी ‘बद्धा’ची अवस्था नीट समजली पाहिजे. ती समजल्यावर बद्वावस्था सोडून पुढे जाण्याची इच्छा होते. मोक्षाची इच्छा धरणार्‍या ‘मुमुक्षेेक्षू’कडे वाटचाल सुरू होते.


- सुरेश जाखडी 
@@AUTHORINFO_V1@@