बासरीचा ‘हरी’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jul-2020   
Total Views |

mansa_1  H x W:



कलियुगात ज्यांच्या बासरीची सुरावट कृष्णाची आठवण करुन देते, असे महान कलाकार पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्याविषयी...

भारतीय शास्त्रीय संगीतात गौरवशाली कामगिरी करणार्‍या अनेक महान कलाकारांप्रमाणे या कलाकाराला कोणतीही कौटुंबिक सांगितीक पार्श्वभूमी नव्हती. संगीताचा हा खडतर मार्ग त्यांनी स्वत: निवडला. सर्व प्रकारच्या अडथळ्यांची शर्यत पार करण्यासाठी खूप धडपड केली. त्यांचा उन्मत्तपणा, प्रामाणिकपणा, कठोर परिश्रम, निष्ठा आणि समर्पणाच्या भावनेमुळे ते सर्वोच्च स्थानावर जाऊन बसले. बासरी म्हटल्यावर आज त्यांचेच नाव सर्वप्रथम डोळ्यासमोर येते. त्यांच्या बासरीची सुरावट ऐकल्यावर या कलियुगातही कृष्णसख्याच्या बासरीचा आनंद रसिकजन अनुभवतात. बासरीचा हा हरी म्हणजे प्रसिद्ध आणि ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया.


पं. हरिप्रसाद यांचा जन्म १ जुलै, १९३८रोजी अलाहाबादमध्ये झाला. चौरसिया कुटुंबाचा दूरपर्यंत संगीताशी काहीही संबंध नव्हता. हरिप्रसाद यांच्या आईचे ते सहा वर्षांचे असतानाच निधन झाले. आपल्या मुलाने कुस्तिपटू व्हावे, अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. वडिलांच्या इच्छेखातर त्यांनी आखाड्यात जाऊन वडिलांसोबत काही काळ प्रशिक्षणही घेतले. मात्र, त्यांचे मन लाल मातीत काही रमेना. त्यांचे सगळे लक्ष होते संगीतात. त्यामुळे संगीतामध्ये रस असलेल्या मित्राच्या घरी जाऊन त्यांनी संगीत शिकणे आणि सराव करणे सुरू केले. वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी हरिप्रसाद यांनी पं. राजाराम यांच्याकडून शास्त्रीय संगीत शिकण्यास सुरुवात केली आणि त्यांनी संगीताची गोडी लागली ती कायमचीच! संगीत शिकवणी सुरू झाल्यास वर्ष उलटत असतानाच, त्यांनी वाराणसी येथील प्रख्यात बासरीवादक पं. भोलानाथ यांचे बासरीवादन ऐकले. या वादनाच्या सुरांनी हरिप्रसादांचे मन मोहून घेतले. त्यांनी पं. भोलानाथ यांच्याकडे बासरीवादनाचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. एकनिष्ठपणे त्यांच्याकडे तब्बल आठ वर्षं बासरीवादनाच्या कलेचे शिक्षण घेतले.


बासरीवादनाचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी १९५७साली ओडिशामधील कटक येथील ‘ऑल इंडिया रेडिओ’मध्ये नोकरी स्वीकारली. याठिकाणी ते वादक-कलाकार आणि संगीतकार म्हणून ते काम करु लागले. पुढे बरेच दिवस ‘ऑल इंडिया रेडिओ’मध्ये काम करत असताना त्यांना बाबा अल्लाउद्दीन खान यांची कन्या अन्नपूर्णा देवी यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी अन्नपूर्णा देवींच्या काही अटीशर्तींसह त्यांच्याकडे शिकण्यास सुुरुवात केली. त्यामधील पहिली अट म्हणजे, अन्नपूर्णादेवींनी शिकवलेल्या सर्व गोष्टी शिकायची तयार ठेवणे आणि दुसरी म्हणजे, उजव्या बाजूने बासरी वादन करणे. त्याकाळी हरिप्रसादजी हे डाव्या बाजूने बासरी वादन करण्यामध्ये पारंगत होते. अशा सगळ्या अटीशर्ती मान्य करुनच त्यांनी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर अनेक शास्त्रीय संगीत महोत्सव हरिप्रसादजी यांनी गाजवले. मात्र, त्यांना खरी ओळख मिळाली ती म्हणजे चित्रपटासाठी दिलेल्या संगीतामुळे आणि त्यासाठी केलेल्या बासरीवादनामुळे. हरिप्रसादजी यांनी शिवकुमार शर्मा यांच्यासमवेत ‘शिव-हरि’ नावाचा एक संगीत गट तयार केला होता. या जोडीने ‘सिलसिला’ आणि ‘चांदनी’ यांच्यासह अनेक लोकप्रिय चित्रपटांसाठी संगीत दिले आणि काही अत्यंत लोकप्रिय गाणी तयार केली. पंडित चौरसिया यांनी ओडिशाचे संगीतकार भुवनेश्वर मिश्रा यांच्यासोबतही संगीतकार म्हणून काम केले. त्यांनी भुवन-हरी (शिव-हरि यांच्या अनुषंगाने) जोडी तयार केली आणि या जोडीने बरीच ओडिया चित्रपटांसाठी संगीत दिले. असंख्य गाणी संगीतबद्ध केली. जी राज्यात प्रचंड लोकप्रिय झाली.



 
हरिप्रसादजींनी पाश्चात्य देशांमध्ये नावलौकिक मिळवला. जॉन मॅक्लॉफलिन, जॅन गरबारेक आणि केन लॉबर यांसारख्या पाश्चात्य संगीतकारांसोबत सहकार्य करुन त्यांनी संगीत दिले. जॉर्ज हॅरिसनने लिहिलेल्या ‘द इनर लाइट’ या अल्बमसाठीही त्यांनी वादन केले. याशिवाय प्रसिद्ध सितारवादक रवी शंकर यांच्यासोबतही अनेक मैफिली आणि अल्बमसाठी त्यांनी बासरी वादन केले. त्यांनी नेदरलँड्समधील ‘रॉटरडॅम म्युझिक कन्झर्व्हेटरी’ येथे जागतिक संगीत विभागाचे कलात्मक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. भारतातील बासरीवादनाची गुरू-शिष्य परंपरा टिकवून ठेण्यासाठी त्यांनी २००२मध्ये मुंबईत आणि २०१०मध्ये भुवनेश्वरमध्ये ‘वृंदावन गुरुकुल’ नावाच्या संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून ते विद्यार्थ्यांना आजही गुरु-शिष्य परंपरेच्या माध्यमातून बासरीवादनाचे धडे देतात. हरिप्रसादजींना आजवर अनेक मानाचे पुरस्कार लाभले आहेत. त्यामधील ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’, ‘पद्मभूषण’, ‘पद्मविभूषण’, ‘दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ आणि उत्तर ओडिशा व उटकल विद्यापीठाकडून ‘डॉक्टरेट’ पदवी मिळाली आहे. याशिवाय गेल्यावर्षी ‘ब्रेथ ऑफ गॉल्ड’ या नावाने त्यांचे आत्मचरित्रही प्रकाशित झाले आहे. आजही पं. हरिप्रसाद चौरसिया राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करत आहेत. अमेरिका आणि युरोपमध्ये नियमितपणे दौरे करुन जगभरातील जवळजवळ सर्व प्रमुख संगीत महोत्सवांमध्ये ते सादरीकरण करतात. बासरीमध्ये आलाप आणि जोडचे अनोखे रुपांतर करण्याचे संपूर्ण श्रेय हे त्यांनाच जाते. अशा महान कलाकाराला दै. ’मुंबई तरुण भारत’चा सलाम!
 
@@AUTHORINFO_V1@@