दुर्गा माता की है हुंकार, कोरोना पर होगी मात!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jul-2020   
Total Views |

arpanamastu_1  


दुर्गा माता की है हुंकार 
कोरोना पर होगी मात!

असा आशावाद स्वीकारत ३० स्वयंसेविका रा. स्व. संघाच्या आरोग्य शिबिरात सेवाकार्य करण्यास सिद्ध होत्या. ३ जुलै ते ११ जुलै या काळात मालाडच्या विविध वस्त्यांमधील १६ हजार, ४४२ लोकांची त्यांनी दारोदारी जाऊन कोरोना तपासणी केली. यामध्ये काहीजणी वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थिनी होत्या, तर काहीजणी रा. स्व. संघाच्या विविध आयामांमध्ये काम करणार्‍या स्वयंसेविका होत्या.


पावसाची रिपरिप सुरू होती, नेहमीप्रमाणे मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षमतेचा परिचय देणारे खड्डे, त्यात साचलेले घाण पाणी, कोंदट वातावरण, अरूंद गल्ल्या. कोरोनाच्या भीतीने गल्लीबोळातही भयाण शांतता. पण, ही शांतताही विचित्र. कारण, त्यात लोकांचे कोरोनाबद्दलचे भय, कमालीचे अज्ञान भरलेले. या अशा परिस्थितीमध्ये ‘पीपीई किट’ घालून ‘त्या’ सगळ्याजणी खड्डे चुकवत, निसरड्या वाटांवरून तोल सावरत घरोघरी जात होत्या. बिल्कूल न घाबरता लोकांची आरोग्य तपासणी करत होत्या. लोकांच्या प्रश्नांना उत्तरं देत होत्या. लोकांची परिस्थिती पाहून डोळ्यात आलेेले अश्रू हलकेच पुसत होत्या. या परिस्थितीतही घरातल्या आयाबायांनी सावरलेले संसार आणि घरातल्या लहानग्यांची लगबग पाहून यांच्या चेहर्‍यावर समाधानही फुलत होते. या मुलींनी ‘उत्तर मुंबई’च्या मालाडमधल्या उत्तुंग टॉवर्स, रो हाऊसमध्ये गेल्या. तेथील लोकांचीही आरोग्य तपासणी केली. या कोण होत्या? देवदूत होत्या का? हो नक्कीच! समाजाच्या कठीण परिस्थितीमध्ये समाजाला मायेने ममतेने धीर देत, ’आलेल्या परिस्थितीशी हिंमतीने लढा, काळजी घ्या,’ असे सांगणार्‍या त्या सगळ्या होत्या. रा. स्व. संघाच्या विविध सेवाकार्यात सहभागी असलेल्या स्वयंसेविका. ‘हम दिन चार रहे ना रहे तेरा वैभव अमर रहे माँ’ सांगणार्‍या या सगळ्या वीस-पंचवीस वयोगटातल्या तरुण मुली.


सगळ्याजणी कोरोनाच्या विरोधात लढण्यास एकवटल्या होत्या. २ जुलैला या सार्‍याजणी मालाडला आल्या. दुसर्‍या दिवसापासून त्यांचे सेवाकार्य सुरू होणार होते. अर्थात, सगळ्याजणींना कोरोना तपासणीचे ‘स्क्रीनिंग’ कसे करावे, थर्मलगन, ऑक्सिमीटर कसे वापरावे, लोकांच्या प्रश्नांना उत्तरे कशी द्यावी, हे सेवाकार्य करत असताना आपली स्वत:ची काळजी कशी घ्यावी, हे शिकवले गेलेच होते. या उपक्रमाची प्रमुख जबाबदारी ओंकार विचारे यांच्यावर होती. ते रा. स्व. संघाचे स्वंयसेवक आणि मर्चंट नेव्हीमध्ये नेव्हिगेशन ऑफिसर आहेत. कोरोनाच्या संकटकाळात समाजाची बांधिलकी जपत ते या अभियानात सामील झाले. ते म्हणतात, ”मालाड येथे ‘स्क्रीनिंग’ कॅम्पमध्ये सहभागी झालेल्या सर्व दुर्गाशक्तींचे कार्य उल्लेखनीय म्हणावे लागेल. जवळ जवळ ५५००कुटुंबांचे ‘स्क्रीनिंग’ या सगळ्या भगिनींनी केले. काही ठिकाणी यांचे स्वागत झाले, पण एक-दोन ठिकाणी दरवाजा धाडकन बंद करणे किंवा ‘तुम्ही आमच्या खासगी जीवनावर बाधा आणता, तुम्ही कोण आमचे ‘स्क्रीनिंंग’ करून आरोग्याची माहिती घेणारे’ असे वाद घालणारे लोकही भेटले. पण या भगिनींनी सगळी परिस्थिती हाताळली.” ओंकार म्हणतात, ”या सगळ्या जणी वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेल्या, भाषा, प्रांत वगैरेच्या सीमा ओलांडून त्या फक्त भारतीय नागरिक आणि आपल्या हातून काही समाजकार्य घडावे, यासाठी आल्या होत्या.”


रा. स्व. संघसंबंधित ‘अंकुर स्वयंसेवी संस्थे’च्या विश्वस्त मधुरा भोंदेही या उपक्रमात सहभागी झालेल्या. मधुरा सांगतात, “कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या सुरुवातीच्या काळात समाजात सर्वत्र एक हतबलता आली होती. हे काहीतरी भयंकर आहे, याला आपण कसे नियंत्रित करणार असे वाटले होते. पण, रा. स्व. संघाने नेहमीप्रमाणे पुढाकार घेतला. वाटले की, कोरोना नियंत्रणामध्ये आपणही सहभागी व्हायलाच हवे. सेवावस्तीमध्ये ‘स्क्रीनिंग’ करताना एक अनुभव मनाला भिडला. काही लहान मुलं तपासणीला आली. त्यांना हात कसे धुवावे, स्वत:ची काळजी कशी घ्यावी हे शिकवले आणि आम्ही पुढे गेलो. परत माघारी आलो तर पाहिले की ही लहान मुले आपल्या सवंगड्यांना आणि बाहेर उभ्या असलेल्या काही आयाबायांना शिकवत होते की, हात कसे धुवावेत, कोरोना होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी. हे दृश्य अजूनही मनात कोरले गेल. छोटी मुलं, पण त्यांच्यामध्ये जागृती आली आणि त्यांनी जागृतीसाठी पुढाकार घेतला होता.” या कॅम्पमध्ये काही मुस्लीम भगिनीही सामील झाल्या होत्या. काही जणींशी बोलले. या सगळ्यांचे म्हणणे की, हे काम करताना अत्यंत ऊर्जा मिळाली. वाटले आपण काही तरी असे करतोय जे प्रत्येक माणसाने आपल्या समाजासाठी करायला हवे. खबरदारी म्हणून मालाड स्क्रीनिंग शिबिराची सांगता झाल्यानंतर या सगळ्या जणींची कोरोना चाचणी करण्यात आली. या सगळ्या जणींचे अहवाल ‘निगेटिव्ह’ आले. १६हजारांच्यावर लोकांची तपासणी, तेही भरपावसात करताना या माताभगिनींनी सगळ्यांसमोर आदर्श ठेवला की, स्वत:ची काळजी घेत समाजाचे काम कसे करायचे. या मातृशक्तीला, आदिशक्तीला आणि त्यांच्या प्रेरणादायी कार्याला अभिवादन...

रा.स्व.संघासंबंधित विविध संस्था, संघटनांमध्ये कार्यरत असलेल्या भगिनींनी सांगितले की, समाजाच्या या आपत्तीकाळात आम्हालाही समाजासाठी काम करायचे आहे. तसेही संघ आणि समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात मातृशक्तीचे योगदान महत्त्वाचे आहेत. त्यामुळे मग मालाडच्या स्क्रीनिंग शिबिरासाठी केवळ मातृशक्तीच सहभागी होतील, असे ठरवले गेले. त्यातूनच मग ही 30 जणींची बॅच तयार झाली.
-संदीप नेवे, पालक, स्क्रीनिंग कॅम्प, रा.स्व.संघ


श्रेय लाटण्याची विकृती


अरे हो, एका गोष्टीचा उल्लेख तर करायलाच हवा. या मुली ‘पीपीई किट’ घालून पाण्यापावसात, चिखलात लोकांची आरोग्य तपासणी करत होत्या. यांचे फोटो काही वृतपत्रांनी छापले, आणि वर त्या फोटोला मथळा दिला होता की, ‘मुंबई महानगर सज्ज, आशा सेविकांनी घेतला वस्तीचा ताबा.’ वैद्यकीय विद्यार्थी असलेल्या, रा. स्व. संघाच्या विविध संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या या संघभगिनींना मात्र अजूनही कळले नाही की, या वृत्तपत्रांनी आपल्याला न विचारता आपला फोटो महानगरपालिकेच्या ‘आशा कर्मचारी’ म्हणून का छापला असेल? अर्थात, त्या संघसंबंधित असल्याने अशा फाटक्या प्रसिद्धीची त्यांना गरज नाही. पण, श्रेय लाटण्याची विकृती कुठपर्यंत पोहोचली आहे, हे सांगणे गरजेचे होते.
@@AUTHORINFO_V1@@