ममतांच्या सत्ताकाळातले गुंडाराज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jul-2020
Total Views |

agralekh_1  H x



ममता बॅनर्जींनी विरोधकांवर टीका करताना अनेक वर्षांपूर्वी ‘चुन चुन कर बदला लुँगी’ असे म्हटले होते. तद्नंतर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या गुंडाराजला सुरुवात झाली आणि पक्षाचे कार्यकर्ते वेचून वेचून भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या करु लागले. आताच्या भाजप आमदार देवेंद्रनाथ रॉय यांच्या हत्येशी तृणमूल काँग्रेसचा संबंध आहे अथवा नाही, हे तपासानंतर समोर येईलच.


पश्चिम बंगालच्या उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील एका बाजारात सोमवारी सकाळीच भाजप आमदार देवेंद्रनाथ रॉय यांचे शव चहाच्या दुकानापुढे लटकलेल्या अवस्थेत आढळले. एका आमदाराचा मृतदेह अशाप्रकारे टांगलेल्या स्थितीत सापडल्याने खळबळ माजणे स्वाभाविक होते आणि त्याच दिवशी या घटनेची माहिती देशभरात पसरली. तसेच त्यावर चर्चा, आरोप-प्रत्यारोप, हल्ला-प्रतिहल्ला याचे सत्रही सुरु झाले. देवेंद्रनाथ रॉय यांच्या कुटुंबीयांनीही आदल्या दिवशी काय घडले हे सांगितले. त्यानुसार रविवारी रात्री उशिरा देवेंद्रनाथ रॉय यांना कोणीतरी फोन केला आणि त्यानंतर ते बाहेर गेले, ते न परतण्यासाठीच! कारण, देवेंद्रनाथ रॉय यांची त्यानंतर हत्या करण्यात आली आणि घरापासून एक किमी अंतरावरील चौकात त्यांचे शव लटकवले गेले. मात्र, या सगळ्या प्रकारातून पश्चिम बंगालमधील मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या शासन काळात गुंडाराज फोफावल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. राज्यात याआधीही हत्येच्या-खुनाच्या घटना घडलेल्या आहेतच, नाही असे नव्हे. पण, आता कायदा-व्यवस्थेच्या चिंधड्या उडून थेट एका आमदाराचाच तिथे खून करण्यात आला. ही घटना कितीही धक्कादायक असली तरी ममता बॅनर्जी आणि त्यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला याचा किंचितही खेद वाटला नसेल. त्याचे कारण पश्चिम बंगालमधील विद्यमान सत्ताधारी आपल्या पूर्वाश्रमीच्या पक्ष-सरकारांप्रमाणेच मानवी जीवांचे बळी पचवण्यात चांगलेच मुरलेले आहेत.




ममता बॅनर्जींच्या आधी सुमारे ३५ वर्षे पश्चिम बंगालमध्ये कम्युनिस्ट पक्षांच्या डाव्या आघाडीने राज्य केले. जगभरात कम्युनिस्टांच्या सत्तेत जे होते, तेच इथेही झाले आणि डाव्यांनी या ३५ वर्षांत विरोधकांना मारुन टाकून त्यांचा आवाज दाबून टाकला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप आणि अनेक हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांच्या हत्या या काळात केल्या गेल्या. तसेच काँग्रेसच्याही कार्यकर्त्यांना संपवण्यासाठी कम्युनिस्ट सरकार राबले. ममता बॅनर्जी यादेखील सुरुवातीला काँग्रेसमध्येच होत्या मात्र, आपला पक्ष कम्युनिस्टांच्या अन्यायी-अत्याचारी शासनाविरोधात आवाज उठवत नाही, लढत-झगडत नाही, हे पाहून त्यांनी स्वतःचा स्वतंत्र तृणमूल काँग्रेस पक्ष स्थापन केला. डाव्यांच्या दमन व हिंसाचारतंत्राला, अराजकाला, जंगलराजला विरोध म्हणून ममतांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. कम्युनिस्टांच्या हिंसेला वैतागलेल्या, कंटाळलेल्या जनतेलाही कोणीतरी डाव्यांविरोधात उभा ठाकल्याचे ममता बॅनर्जींच्या रुपात दिसले आणि त्या सत्तेवर आल्या. तथापि, कम्युनिस्टांविरोधात झगडून सत्तेवर आल्या तरी ममता बॅनर्जींना आपला लढा नेमका कशाविरोधात होता व जनतेने आपल्याला पाठिंबा का दिला, याचेच विस्मरण झाल्याचे दिसते. म्हणूनच जे कम्युनिस्टांच्या काळात सुरु होते, तसेच हत्यासत्र ममतांच्या सत्तेतही अव्याहत सुरुच राहिले आणि देवेंद्रनाथ रॉय यांची हत्या त्याच हिंसक वारशाचा दाखला.




देवेंद्रनाथ रॉय हे प्रथमतः कम्युनिस्ट पक्षातच होते आणि नंतर त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, ममता बॅनर्जींचा कारभार न आवडल्याने २०१९च्या लोकसभा निवडणुकीवेळी त्यांनी भाजपत प्रवेश केला. दरम्यान, ममता बॅनर्जींनी विरोधकांवर टीका करताना अनेक वर्षांपूर्वी ‘चुन चुन कर बदला लुँगी’, असे म्हटले होते. तद्नंतर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या गुंडाराजला सुरुवात झाली आणि पक्षाचे कार्यकर्ते वेचून वेचून भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या करु लागले. आतापर्यंत राज्यात थोड्याथोडक्या नव्हे, तर सुमारे ७७ भाजप कार्यकर्त्यांचे खून करण्यात आले आहेत. देवेंद्रनाथ रॉय यांच्या हत्येमागे कोण किंवा त्यांची हत्या कोणी केली, याचे तपशील समोर आलेले नाहीत. तपास यंत्रणांच्या नि:पक्ष चौकशीनंतरच यातले सत्य काय ते उघड होईल. पण, राज्यातल्या राजकीय हिंसाचाराचा इतिहास पाहता पक्ष सोडून अन्य पक्षांत गेलेल्यांचे मुडदे पाडण्याचा उद्योग कम्युनिस्ट पक्ष आणि त्यानंतर तृणमूल काँग्रेस सातत्याने केला. त्यामुळे या प्रकरणातही संशयाची सुई तृणमूल काँग्रेस व पर्यायाने ममता बॅनर्जींकडेच जाणार. दरम्यान, दडपशाही आणि अन्यायी कारभार फार काळ चालत नसतो, त्याविरोधात कोणी खंबीरपणे पुढे आले तर जनता त्याला साथ देतच असते, हे ममतांनी लक्षात घ्यायला हवे. तसेच सत्ताधार्‍यांनी आत्महत्येचे लेबल चिकटवत अशा प्रकरणांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला, तर मात्र, त्यांची अवस्था कम्युनिस्टांसारखी व्हायला वेळ लागणार नाहीच.




दरम्यान, ममता बॅनर्जींच्या भ्रष्टाचारी, जातीयवादी, मुस्लिमांचे लांगुलचालन करणार्‍या, रोहिंग्या मुस्लिमांना पायघड्या अंथरणार्‍या आणि आताच्या कोरोना संकटकाळातही राजकारणाचा डाव खेळणार्‍या सत्तेला पश्चिम बंगालमधील मतदार वैतागलेला आहे. त्याला पर्याय हवा आहे आणि तो भाजपच्या रुपाने मतदारासमोर उभाही आहे. त्यामुळेच राज्यात भाजपचा वेगाने विस्तार होत असल्याचे दिसते. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत याची झलकही दिसली आणि भाजपचे १८खासदार निवडून आले, जे २०१४मध्ये केवळ दोनच होते. ममता बॅनर्जी व तृणमूल काँग्रेसला यामुळे हादरा बसला नि बंगाल हातचा जातो की काय, अशी भीतीही त्यांना वाटली. कारण, येत्या वर्षभरात राज्यात विधानसभा निवडणुकाही होणार आहेत आणि त्यात तृणमूलचा पाया उखडून फेकण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. मात्र, सत्ता जाण्याच्या भयाने ग्रासलेल्या ममता बॅनर्जींच्या राज्यात लोकशाही चिरडली जात असल्याचे दिसते. राजकीय मतभेदांना इथे हिंसक पद्धतीने दडपले जात आहे. हे २०११ सालापासून म्हणजे ममता बॅनर्जी सत्तेवर आल्यापासून सुरु आहे. भाजपला वैचारिक नव्हे तर हाणामारीच्या, हत्या आणि खुनाच्या पातळीवर येऊन तृणमूल काँग्रेस शह देण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र, लोकशाहीला पायदळी तुडवण्याचा प्रकार जास्त दिवस सुरु राहू शकत नसतो. कारण, जे काही वेडेवाकडे घडते, त्याची साक्षीदार जनता असते आणि ती मतदानाच्या दिवशी हिंसाचारी सत्ताधीशांना धडा शिकवतच असते.
@@AUTHORINFO_V1@@