नमो नमो ‘शंकरा’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jul-2020
Total Views |

mansa_1  H x W:


अल्पावधीतच क्रिकेट रसिकांच्या मनात घर करणार्‍या विजय शंकरने संपूर्ण जगात नावलौकिक मिळविले आहे. त्याच्या आयुष्याचा प्रवास सांगणारी ही गोष्ट...


भारतात क्रिकेट या खेळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतीयांच्या रक्तातील खेळ म्हणून क्रिकेट ओळखला जातो. क्रिकेटमधील भारतीय खेळाडूंनी जगभरात आपले स्थान निर्माण केले आहे. गोलंदाज असो किंवा फलंदाज, क्षेत्ररक्षक अथवा अष्टपैलू खेळाडू ते यष्टीरक्षक या सर्व खेळाडूंच्या प्रकारांमध्येही इतर खेळाडूंच्या तुलनेत भारतीय खेळाडूंचे पारडे हे नेहमीच जड मानले जाते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणार्‍या एखाद्या नवख्या भारतीय खेळाडूवरही संपूर्ण जगाच्या नजरा एकवटलेल्या असतात. भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूच्या कामगिरीची दखल घेतली जाते. उदाहरण घ्यायचेच झाले तर भारताचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकर याचे घेता येईल. एका जगप्रसिद्ध क्रिकेट समीक्षकाने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विजय शंकर याचे संघात स्थान निश्चित होत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. गेल्या वर्षी पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेमध्ये कट्टर पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात भारताचा मुख्य जलदगती गोलंदाजास दुखापतीमुळे काही काळ मैदानाबाहेर व्हावे लागले.



अशा परिस्थितीत संघापुढे गोलंदाजीचा पेच निर्माण झाला होता. मुख्य तेज गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर गेल्याने प्रतिस्पर्धी संघाच्या गोटात आनंदाचे वातावरण होते. पाकिस्तानच्या संघाचा एकही फलंदाज माघारी परतलेला नसताना मुख्य जलदगती गोलंदाज मैदानाबाहेर होणे हे भारतीय संघासाठी मोठा धक्का मानला जात होता. मात्र, अशा संकटसमयीदेखील कर्णधार विराट कोहलीने या नवख्या अष्टपैलू विजय शंकरच्या हातात चेंडू सोपवत गोलंदाजी करण्यास सांगितले. विश्वचषकासारख्या महत्त्वपूर्ण सामन्यात कोणतेही दडपण न घेता विजय शंकरने उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन केले. अवघ्या दुसर्‍याच चेंडूत त्याने पाकिस्तानच्या सलामीवीर फलंदाजाला पायचीत करत तंबूत धाडण्यात यश मिळवले. मध्यम गतीच्या या गोलंदाजाने जी कमाल केली, ती तेज गोलंदाजांनाही जमली नव्हती. त्यामुळे विजय शंकर त्यावेळी जगभरात प्रसिद्ध झाला. विश्वचषक स्पर्धेदरम्यान त्याला देखील दुखापतीमुळे बाहेर जावे लागले. विश्वचषक स्पर्धेला जवळपास वर्ष उलटत आले. विजय शंकर दुखापतीतून सावरला आणि पुन्हा तंदुरुस्तही झाला. मात्र, या खेळाडूची संघात पुन्हा एकदा जागा होत नसल्याने त्याला बाहेर राहावे लागत आहे. इतका चांगला खेळाडू असूनही संघात त्याला स्थान मिळत नसल्याची खंत नुकतीच एका जगप्रसिद्ध क्रिकेट समीक्षकांनी व्यक्त केली. अल्पावधीतच संपूर्ण जगातील क्रिकेट रसिकांच्या मनात घर करणार्‍या या खेळाडूने आजच्या घडीला संपूर्ण जगात नावलौकिक मिळविले असले तरी येथपर्यंत पोहोचण्यात त्याने जीवापाड मेहनत केली आहे.




विजय शंकर हा मूळचा तामिळनाडूचा. २६ जानेवारी, १९९१ रोजी एका सर्वसामान्य कुटुंबात त्याचा जन्म झाला. प्रजासत्ताक दिनीच जन्मलेल्या विजय शंकरने देशासाठी काहीतरी करावे, अशी कुटुंबीयांची फार इच्छा होती. विजयचे वडील एच शंकर हे स्वतः एक क्रिकेटचे खेळाडू होते. तामिळनाडूसाठी अनेक रणजी सामने त्यांनी खेळले आहेत. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत विजय यानेही क्रिकेटमध्येच करिअर करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातील वडिलांनीच त्याला क्रिकेटचे धडे देण्यास सुरुवात केली. पावसादरम्यान मैदानावर पाणी साचत असल्याने सरावादरम्यान खंड पडू नये यासाठी विजयच्या वडिलांनी आपल्या घरावरील गच्चीवरच एक छोटेखानी क्रिकेटचे मैदान तयार केले होते. लहानपणी घराच्या गच्चीवर विजय शंकर क्रिकेटचा सराव करत असे. काही वर्षे वडिलांसोबत क्रिकेटचे धडे गिरवल्यानंतर त्याने क्लबमध्ये जाऊन प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. प्रारंभी अगदी विसाव्या वर्षापर्यंत तो ऑफस्पिन गोलंदाजी करत होता. त्याचे वडील आणि भाऊ त्याच्या पाठीशी समर्थपणे उभे होते. ते स्वतः तामिळनाडूसाठी खेळलेले असल्यामुळे त्यांनी शंकरच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान दिले.


सुरुवातीला फिरकी गोलंदाजी करणारा शंकर नंतर मध्यमगतीकडे वळला. एकविसाव्या वर्षी त्याने नागपुरात विदर्भविरुद्धच्या लढतीतून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तिथे दोन बळी आणि ६३ धावांची खेळी करून अष्टपैलूत्व सिद्ध केले. यानंतर त्याला आयपीएलमध्येही खेळण्याची संधी मिळाली. चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना त्याला एकाच सामन्यात कौशल्य दाखविण्याची संधी मिळाली. पण, २०१६ मध्ये त्याला सनरायझर्स हैदराबादने आपल्या ताफ्यात घेतले. येथे उत्तम प्रदर्शन केल्यानंतर त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळाली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसर्‍या वनडे सामन्यात भारताला एक रोमहर्षक विजय मिळवून देण्यात अष्टपैलू खेळाडू विजय शंकरचा मोठा वाटा होता. फलंदाजी आणि गोलंदाजीत त्याने चमकदार कामगिरी करत शतकवीर विराटपाठोपाठ सिंहाचा वाटा उचलला. आज भारतीय संघाला अष्टपैलू खेळाडूंची गरज असताना विजय शंकरने ती जागा घेण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे, असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरू नये.


- रामचंद्र नाईक
@@AUTHORINFO_V1@@