भळभळत्या जखमेचा अस्वस्थ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jul-2020
Total Views |

Sharad Pawar_1  


अपवादाने वा अपघातानेही किंवा पुन्हा एकदा पावसात भिजल्यानेही पवार आता पंतप्रधान होऊ शकत नाहीतच आणि अर्थातच ‘जाणते’ नेते असल्याने याची जाणीव पवारांनाही असणारच, पण पद न मिळाल्याच्या भळभळत्या जखमेचे काय? म्हणूनच ते न मिळालेल्या पवारांनी फडणवीसांवर टीका करण्याऐवजी स्वतःच अस्वस्थतेच्या चिपळ्या वाजवलेल्या बर्‍या!


“सत्ता गेली, पण अस्वस्थता नाही,” अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना दिलेल्या मॅरेथॉन मुलाखतीमध्ये ते बोलत होते. संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत शरद पवार इतरही अनेक विषयांवर बोलले, पण अस्वस्थतेचा मुद्दा खुद्द त्यांनाच लागू पडतो.


कारण, शरद पवार राजकारणात आले आणि अगदी तरुणपणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही झाले. अर्थात, ते मुख्यमंत्री कसे झाले हे राज्याला चांगलेच ठावूक असून सत्ता बळकावण्याचा ‘पवार पॅटर्न’ इथून नावारुपास आला. तद्नंतर पवारांनी सत्तेसाठी काय काय उचापत्या, फोडाफोडी केल्या हेही जनतेला समजले आणि त्याचा अनुभवही सर्वांनी घेतला. पुढे पवार केंद्रीय राजकारणातही गेले, मंत्री झाले आणि तेव्हापासूनच त्यांनी पंतप्रधानपदाकडे मोठ्या आशेने पाहिले. मात्र, शरद पवार राज्यात मुख्यमंत्री होते, तेव्हा कधीही आपला कार्यकाळ पूर्ण करु शकलेले नाहीत.


अध्ये-मध्ये कधीही पवारांच्या हातातून मुख्यमंत्रिपद निसटलेले भूतकाळात डोकावून पाहिले की दिसते. आता ज्या ज्या वेळी शरद पवार सत्तेतून बेदखल झाले, त्या त्या वेळी ते कमालीचे अस्वस्थ झालेले असतील, यात कसलीही शंका नाही. एखादे पद भूषवले आणि ते गमावले की, होणारे दुःख पवारांइतके कोणीही समजू शकत नाही. शरद पवारांनी तीनवेळा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची खुर्ची पटकावली आणि तिन्ही वेळा पवारांची पंचवार्षिक अधुरीच राहिली.


अशा परिस्थितीत अस्वस्थता नक्कीच येते, शरद पवारांनाही अस्वस्थ नक्कीच वाटले असेल, किंबहुना अस्वस्थ होण्यासारखाच तो घटनाक्रम असेल आणि म्हणूनच आपली तेव्हाची सत्तेतून बाहेर गेल्याची अस्वस्थता शरद पवारांनी फडणवीसांचे नाव घेऊन संजय राऊत यांना आता सांगितली असावी. म्हणजे तेव्हाची बेचैनी पवारांच्या मनात अजूनही घर करुन आहे आणि तीच या मुलाखतीतून जाहीर झाली.


पुढचा मुद्दा म्हणजे शाहू, फुले, आंबेडकरांचे नाव घेऊन जातीयवादी राजकारण करण्यात शरद पवार नेहमीच अग्रेसह राहिले. एका समाजासमोर दुसरा समाज उभा राहील, अशाप्रकारचे राजकारण काँग्रेसमध्ये असताना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची वेगळी चूल मांडल्यानंतरही पवारांनी केले. अगदी अलीकडच्या काळात ‘पेशवे-छत्रपती’ असा वाद लावून पवारांनी आपला खरा चेहराही दाखवून दिला होता. तसेच पवारांनी अनेकदा काँग्रेसमध्ये फोडाफोडी केली. नंतर शिवसेनेतूनही माणसे फोडली, नव्हे आताचा त्यांचा अख्खा पक्षच फोडाफोडीतून जन्मलेला आहे.


मात्र, सारी हयात अशाप्रकारचे उद्योग करुनही पवारांना मिळाले काय? तर क्षमता असूनही केवळ चार-पाच जिल्ह्यांपुरते मर्यादित असलेले पुढारपण! त्यापुढे पवारांचे नाव निवडणुका जिंकण्यात उपयोगी पडत नाही, हे महाराष्ट्राचे आजचे वास्तव आहे. पण, फडणवीसांचे तसे नाही, त्यांनी पवारांनंतर राजकारणात येऊन स्वतःच्या नेतृत्वात अन्य सहकार्‍यांच्या साथीने १२२ (२०१४ साली) आणि १०५ (२०१९ साली) जागा जिंकून दाखवल्या आहेत. पण, पवार अजूनही ५०-६०च्याच घरात फिरत आहेत. यावरही पवार अस्वस्थच असतील नाही?


तीच गत शिवसेनेचीही आणि दोन अस्वस्थांचा मेळा जमला नि अस्वस्थांच्या गप्पा रंगल्या. दरम्यान, देवेंद्र फडणवीस कोरोनाच्या संकटकाळात राज्यभर दौरे करत आहेत, ते सत्ता गेल्याने आलेल्या अस्वस्थतेमुळे नव्हे. सत्तेत असलो काय आणि नसलो काय जनतेची काळजी, चिंता करणे हा त्यांचा स्थायीभावच आहे. पवारांसारखे त्यांनी कधी निवडणुकीआधी बांधावर जाऊन शेतकर्‍यांना विविध आश्वासने देऊन नंतर ती पूर्ण न करण्याचे काम केलेले नाही. फडणवीसांनी सत्तेत येण्याआधी, सत्तेत असताना आणि आता विरोधी पक्ष नेता असतानाही राज्यातली जनता आपली आहे, हे मानूनच काम केले. त्यामुळे पवारांनी देवेंद्र फडणवीसांबाबत अस्वस्थतेचा उच्चार न केलेलाच बरा!


सर्वात महत्त्वाचा मुद्दा शरद पवारांच्या आणि त्यांच्या आशावादी कार्यकर्त्यांच्या अगदी जिव्हाळ्याचा. तो म्हणजेच ‘अब की बार शरद पवार’च्या कितीही घोषणा केल्या तरी हाती न लागलेले पंतप्रधानपद. १९९१ सालापासून पवार सदैव ‘भावी पंतप्रधान’ राहिलेले आहेत. कोणतीही लोकसभा निवडणूक आली रे आली की, शरद पवारांच्या पक्षाचे नेते-कार्यकर्ते हरबर्‍याच्या झाडावर चढायाला आतुर होतात आणि पुन्हा पुन्हा तीच ती घोषणा देऊ लागतात. पवारांनाही पंतप्रधानपदाचे वेध लागलेले होतेच, त्यामुळे त्यांनाही ते पद मिळावे, अशी अपेक्षा होती वा असतेच. पण, राजकारणाच्या मैदानातले कितीही कसलेले पहिलवान असले तरी शरद पवारांना दरवेळी पंतप्रधानपदाने हुलकावणीच दिली.


पवारांनी अनेक डाव-प्रतिडाव किंवा कोलांटउड्याही मारुन पाहिल्या, पण पंतप्रधानपदाने त्यांना नेहमीच वाकुल्या दाखवल्या. आज तर अशी परिस्थिती आहे की, पवारांच्या मागे ५० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीनंतरही केवळ पाच खासदार आहेत. तरीही त्यांना वा त्यांच्या कार्यकर्त्यांना पंतप्रधानपदाचे स्वप्न पडत असते. मात्र, आता आघाड्यांचा काळ संपला, म्हणजेच देवेगौडा होण्याची पवारांकडे संधी नाहीच. त्यामुळे अपवादाने वा अपघातानेही किंवा पुन्हा एकदा पावसात भिजल्यानेही पवार आता पंतप्रधान होऊ शकत नाहीतच आणि अर्थातच ‘जाणते’ नेते असल्याने याची जाणीव पवारांनाही असणारच, पण पद न मिळाल्याच्या भळभळत्या जखमेचे काय? सुमारे ३० वर्षांपासून जे पद मिळावे यासाठी कसले का होईना पण परिश्रम घेतले, ते मिळणारच नाही, हे नक्की झाल्यावर पवार अस्वस्थ झालेच असतील!


आता ती अस्वस्थता, ती वेदना पवार अशाप्रकारे देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करुन बाहेर काढत आहेत का? असेलही तसे, कारण पवार जे बोलतात, ते नेमके त्याच्या उलटे असते ना! मग पवार फडणवीसांबद्दल बोलले ते उलटे त्यांच्या स्वतःबद्दलही असूच शकेल की! म्हणूनच प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत ज्याचा अट्टाहास केला, ते न मिळालेल्या पवारांनीच फडणवीसांवर टीका करण्याऐवजी स्वतःच अस्वस्थतेच्या चिपळ्या वाजवलेल्या बर्‍या!



@@AUTHORINFO_V1@@