सागरकन्या उज्ज्वला दांडेकर-पाटील

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jul-2020   
Total Views |
ujwala_1  H x W



‘संयुक्त राष्ट्रा’च्या अन्न व कृषी संघटनेमध्ये मच्छीमार समाजाचे प्रतिनिधित्व करणार्‍या उज्ज्वला पाटील यांच्या कार्याचा सविस्तर परिचय करुन देणारा हा लेख...


मी डोलकर डोलकर
डोलकर दर्याचा राजा
भर पाण्यामंधी
बंदरावर करतो येजा

हे गीत ऐकताना अगदी भारी वाटते. पण, समुद्र किनारी राहणारे कोळी बांधव, त्यांचे दैनंदिन जगणे, त्यांचे प्रश्न याबद्दल मागोवा घेतला की, जाणवते अरे डोलकर ‘दर्याचा राजा’ आहे हे खरेच, पण त्याच्याही जगण्यात असंख्य प्रश्न आणि मर्यादा आहेत. ते प्रश्न कोण सोडवणार? तर सातपाटी-पालघर भागातल्या समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी सागरकन्या उज्ज्वला पाटील सज्ज आहेत. उज्ज्वला दांडेकर-पाटील या सातपाटी गावच्या. सध्या उज्ज्वला ‘नॅशनल फिश वर्कर फोरम’ (NFF) या संघटनेत काम करीत आहे. ४० राष्ट्रांच्या जागतिक संघटनेने (WFFP) त्यांची ‘मच्छीमार प्रतिनिधी’ म्हणून ‘संयुक्त राष्ट्रा’च्या अन्न व कृषी संघटनेवर नियुक्ती करण्यात आली आहे.


उज्ज्वला या स्वातंत्र्यसेनानी व सन १९४४ रोजी मच्छीमार सहकारी संस्थेची स्थापना करणारे नारायण दांडेकर व रतन दांडेकर यांच्या कन्या. महाराष्ट्रातील सगळ्या ग्रामपंचायतींमध्ये पहिल्या महिला सदस्या म्हणून रतन यांची ओळख. सहकारी संस्थांमधीलही त्या पहिल्या महिला पदाधिकारी होत्या. उज्ज्वला यांचे वडील नारायण दांडेकर यांनी तर समाजाच्या उन्नतीचा ध्यासच घेतलेला. कोळी बांधवांनी मासेमारी करताना आधुनिक संसाधनांचा वापर करावा, त्यांच्या कामातील धोकादायक स्थिती कमी व्हावी, यासाठी नारायण दांडेकर सातत्याने संशोधन करत. नवनवीन तंत्रज्ञान शिकण्यासाठी ते मोठमोठ्या कंपन्यांसोबत सल्लागार म्हणून कामही करायचे. काम करता करता मासेमारीसंबंधीचे आंतरराष्ट्रीय ज्ञान अवगत करून ते त्या ज्ञानाचा वापर समाजासाठी करत. दांडेकर कुटुंब तसे सधन. पण, नारायण यांनी आपली अवघी संपत्ती समाजाच्या उत्कर्षासाठी वाहून टाकली, असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही.


उज्ज्वला यांनी दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर ठरवले की, आयटीआयमध्ये मेकॅनिकचा कोर्स करावा. पण, मुलींना तिथे प्रवेश नव्हता. उज्ज्वला यांना मुलगी म्हणून प्रवेश नाकारण्यात आला. १९७०चे दशक होते ते. पुढे उज्ज्वला यांनी कलाशाखेत प्रवेश घेतला. सातपाटीमधल्या आपल्या कोळी समाजाची दैनंदिनी, प्रश्न त्यांना विचारमग्न करत. समाजाच्या स्त्रियांचे अपार कष्ट शब्दातीत होते. बोट समुद्रात जाण्यापासून ते परत येऊन मासे बाजारात नेण्यापर्यंत ते घरचे आटपेपर्यंत समाजातील महिलांचा संघर्ष, कष्ट मोठेच होते.


पुढे उज्ज्वला यांचा विवाह सामजिक वारसा जपणार्‍या जयकिसन पाटील यांच्याशी झाला. उज्ज्वला यांचे सासरे राम पाटील हे महाराष्ट्र मच्छीमार कृती समाजाचे अध्यक्ष होते. उज्ज्वला यांच्या घरी संघटनेच्या बैठका होत. त्यावेळी ‘नॅशनल फिश वर्कर फोरम’चे (NFF) अध्यक्ष थॉमस कोचर हे बैठकीला येत. बैठकीमध्ये समाजाचे प्रश्न, सद्यस्थिती यावर चर्चा होई. पुढे उज्ज्वलाही ‘महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती’च्या मुंबई अध्यक्षा झाल्या. २०१० साली ‘चित्रा’ आणि ‘खलिजिया’ ही दोन रसायन आणि तेलवाहू जहाजे मुंबई जवळच्या समुद्रकिनारी एकमेकांवर धडकली. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी मासे खरेदी न करण्याचे आवाहन जनतेला केले. पण, मुंबईचे कोळीबांधव तर या समुद्रकिनार्‍यातील मासे खरेदी करत नव्हते. काही जणांनी दुसर्‍या किनारपट्टीतून जास्त पैसे देऊन मासे खरेदी केले होते. प्रशासनाच्या नियमानुसार, त्या माशांवरही ‘डीडीटी’ची पावडर टाकण्यात आली. त्यामुळे कोळीबांधवांचे अतोनात नुकसान झाले. उज्ज्वला यांनी याबाबत आवाज उठवला. ७०० कोळी भगिनींचा मोर्चा काढला. उज्ज्वला यांच्या प्रयत्नांना यश आले. मासेमारी आणि मासेविक्रीबाबतचा निर्णय प्रशासनाला बदलावा लागला. पुढे २०११ साली पालघर जिल्ह्याचे प्रारुप किनारा व्यवस्थापन आराखडे (CZMP) प्रसिद्ध करण्यात आले. यावर उज्ज्वला यांनी सहकार्‍यांसोबत या विषयावर अभ्यास करून हरकत घेतली. अधिसूचना १९८१ च्या डेव्हलपमेंट प्लाननुसार निर्देशित केलेले कोळीवाडे आणि मासेमारांची गावे आणि वस्त्याचे मॅपिंग -मोजमाप-सीमांकन करुन त्याना CRZ-III म्हणून जाहीर करणे आवश्यक आहे. त्यामुळे कोळीवाडे आणि मच्छीमारांच्या वस्त्यांना नगर विकास नियमांच्या अंतर्गत त्यांची घरे दुरुस्ती किंवा विकसित करणे शक्य होईल. मात्र, सदर प्रारुप आराखड्यातील पालघर जिल्ह्यातील किनारपट्टीसह इतर कोळीवाडे आणि मच्छीमारांच्या वस्त्यांची नोंद किवा सीमांकन करण्यात आलेले नाही.


उज्ज्वला म्हणतात, “२०१४ साली नगर विकास विभाग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होता. तेव्हा त्यांनी २०१४ ते २०३४च्या नियोजित विकास आराखड्यात कोळीवाड्यांसाठी स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावली तयार केली जावी, हा ऐतिहासिक निर्णय घेतला. तेव्हा, सध्या विरोधी पक्षात असूनही देवेंद्र फडणवीस कोळी समाजाच्या प्रश्नाला न्याय मिळवून देतील, अशी आशा आहे.”


कोरोनाच्या संकटात उज्ज्वला यांनी मुंबईतील ४१ कोळीवाड्यातील ४५०० कुटुंबांना संस्थेच्या माध्यमातून मदतीचा हात दिला आहे. उज्ज्वला पाटील या सागरकन्येचे कर्तृत्व समाजाला नक्कीच सामर्थ्य आणि दिशा देणारे आहे. त्यांना पुढील प्रवासासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे शुभेच्छा.





@@AUTHORINFO_V1@@