तुमचं म्हणणं चुकीचंच राव!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jul-2020
Total Views |

Nasser Hussain Sourav Gan



भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने कर्णधारपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतरच भारतीय क्रिकेटचा खर्‍या अर्थाने विकास सुरु झाला, असे विधान इंग्लंड संघाचा माजी कर्णधार नासिर हुसैन याने केले आणि क्रिकेटविश्वातील वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले. नासिर हुसैन यांच्या या विधानाचा भारताचे माजी क्रिकेटपटू आणि ‘लिटल मास्टर’ म्हणवले जाणारे सुनील गावस्कर यांनी चांगलाच समाचार घेतला. सौरव गांगुलीप्रमाणेच अनेक खेळाडू भारतीय संघात प्रतिभावंत आणि कणखर होते. क्रिकेट हा एक सांघिक खेळ आहे. सर्व खेळाडूंच्या जोरावरच सामने जिंकले जातात. त्यामुळे केवळ गांगुलीने कर्णधारपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतरच भारतीय क्रिकेटचा खर्‍या अर्थाने विकास सुरु झाला हे म्हणणे पूर्णपणे चुकीचे असल्याचे मत गावस्कर यांनी मांडले. गावस्कर यांच्या या भूमिकेचे अनेक क्रिकेट समीक्षकांनीही समर्थन केले. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे भारतीय क्रिकेट संघ आधीपासूनच एक महत्त्वाच्या क्रिकेट संघांपैकी एक मानला जात होता. क्रिकेटविश्वात १९७५ सालापासून विश्वचषक स्पर्धांना सुरुवात झाली. १९७५ आणि १९७९ असे दोन्ही विश्वचषक वेस्ट इंडिज संघाने जिंकले. वेस्ट इंडिजसारख्या बलाढ्य संघाला कोणीही पराभूत करू शकत नव्हते. त्यामुळे १९८३ सालीही विश्वचषक जिंकून वेस्ट इंडिज हॅट्ट्रिक करेल असेच सर्वांना वाटत होते. परंतु, असे झाले नाही. तत्कालीन कर्णधार कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील संघाने बलाढ्य अशा वेस्ट इंडिज संघाला पराभवाची धूळ चारत विश्वचषकावर आपले नाव कोरले. वेस्ट इंडिज संघाला नमवल्यानंतर संपूर्ण विश्वातून भारताचे कौतुक करण्यात आले. विश्वचषकानंतरही अनेक महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये भारताने आपला दबदबा कायम राखत क्रिकेटविश्वातील आपले वर्चस्व कायम राखण्यात यश मिळवले होते. सौरव गांगुलीचे आगमन भारतीय क्रिकेटमध्ये १९९६ साली झाले. २००० साली त्याची कर्णधारपदी नियुक्ती झाली. गांगुलीच्या आक्रमकपणाचा भारतीय फायदाच झाला. २००४ साली भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेचा उपविजेताही ठरला. एक यशस्वी कर्णधार म्हणून गांगुलीचे नाव नक्कीच आहे. मात्र, तो कर्णधार झाल्यानंतरच भारतीय संघाचा खर्‍या अर्थाने विकास झाला असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे असल्याचे मत समीक्षक नोंदवतात.
 
 

हाच मुहूर्त मिळाला का?



नासिर हुसैन यांच्या आधी भारतीय संघाचा विद्यमान कर्णधार विराट कोहलीसह अन्य काही भारतीय खेळाडूंनीही अशाच प्रकारची विधाने करत क्रिकेटविश्वातील वातावरण तप्त केले होते. सौरव गांगुली यांनी संघाच्या कर्णधारपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतरच भारतीय संघ यशस्वीपणे सामने जिंकत होता, असे विधान त्यावेळी कोहली यानेही केले होते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदी सौरव गांगुलीची नियुक्ती झाल्यानंतरच कोहलीने हे विधान केल्याबद्दल अनेक तर्क-वितर्क लढविण्यात आले होते. गांगुली कर्णधारपदी विराजमान असतानाच भारतीय संघ यशस्वीपणे सामने जिंकत होता, असे जर कोहलीला वाटते, तर मग कोहलीने याआधी कधीच असे विधान का केले नाही. गांगुलीची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतरच कोहलीला हे शहाणपण का सुचावे, असा प्रश्न अनेक क्रिकेट समीक्षकांनी त्यावेळी उपस्थित केला होता. नवनियुक्त बीसीसीआय अध्यक्षांना खूश करण्यासाठीच कोहलीने हे विधान केले असल्याच्या वावड्याही उठल्या होत्या. समीक्षकांच्या या ‘अरे’ला ‘कारे’ न करण्यातच भलाई मानत कोहलीने त्यावेळी मौन बाळगले आणि हा वाद निवळला. मात्र, आता इंग्लंडचे माजी कर्णधार नासिर हुसैन यांनी पुन्हा एकदा गांगुलीने कर्णधारपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतरच भारतीय क्रिकेटचा खर्‍या अर्थाने विकास सुरु झाला, असे विधान करत जुने मढे उकरण्याचा उद्योग चालविला आहे. यामागे कारणही तसेच आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या परिषदेच्या (आयसीसी) अध्यक्षपदासाठी सध्या सौरव गांगुली यांच्या नावाची चर्चा आहे. पुढील काही महिन्यांसाठी सौरव गांगुली यांची या पदासाठी निवड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याबाबत अद्याप अधिकृत निर्णय झालेला नाही. मात्र, असे झाल्यास आयसीसीची सर्व सूत्रे गांगुलीच्या हाती येतील. अशा परिस्थितीत गांगुलीला खूश ठेवणे हे सर्वात महत्वाचे आहे. हे ओळखूनच नासिर हुसैन यांनी विधान केले असावे, असा कयास क्रिकेट समीक्षकांकडून बांधला जात आहे. नासिर हुसैन यांनी याआधी गांगुलीची कधी इतकी मोकळेपणाने स्तुती केली नव्हती. मात्र, त्यांनाही गांगुली यांची स्तुती करण्यासाठी नेमका हाच मुहूर्त का मिळाला, याचा विचार करणे गरजेचे असल्याचे मत येथे समीक्षक नोंदवतात.
 
- रामचंद्र नाईक
@@AUTHORINFO_V1@@