कोरोना कहर (भाग-१७) - ‘ग्रिंडेलिया’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jul-2020
Total Views |

SBL _1  H x W:

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव हा प्रामुख्याने श्वसनसंस्थेवर होत आहे, असे रुग्णांच्या रोग लक्षणांवरून दिसून येते. जेव्हा प्रामुख्याने ताप येऊन मग श्वसनमार्ग व फुफ्फुसे यांना विषाणूंचा संसर्ग होतो. त्यावेळेस या लक्षणातून त्वरित आराम मिळण्यास काही होमियोपॅथीक औषधे फार उपयुक्त आहेत. या औषधांच्या उपयोगाने रुग्ण आजाराच्या गुंतागुंतीमधून लवकर बाहेर येतो. या औषधांपैकी एक महत्त्वाचे औषध म्हणजे ‘ग्रिंडेलिया’ (Grindelia)

‘ग्रिंडेलिया’ हे औषध मुख्यत्वे श्वसनसंस्थेवर कार्य करते, त्याचबरोबर पचनक्रियेवरही कार्य करते. यात न्यूमोगॅस्ट्रिक नसेवर परिणाम होऊन तिचे कार्य मंदावते व पर्यायाने श्वसनावर त्याचा परिणाम होऊन रुग्णाला दम लागू लागतो. श्वसननळी व फुप्फुसातील अंतर्भागात खूप सारा कफ व श्लेष्मा जमू लागतो. त्यामुळे जराही आडवे पडले असता किंवा झोपले असताना रोग्यास घुसमटायला होते. झोपताना व झोपेत प्रचंड त्रास होतो. रात्रीच्या वेळेस मुख्यत्वेकरून रुग्णाला दम लागू लागतो.

फुफ्फुसांना व श्वसननलिकेला संसर्ग झाल्यामुळे अस्थमा व एमफायसिमासारख्या आजाराची लक्षणे रोग्यामध्ये दिसू लागतात. त्यामुळेच मग हृदयावरचा ताण वाढू लागतो व या ताणामुळेच हृदयाचा आकार वाढू लागतो. (Cardiac Hypertrophy) रुग्ण अडखळत श्वास घेतो. घशाला खवखवते, कडक व सफेद असा कफ बाहेर पडतो. झोपलेले असताना किंवा आडवे पडलेले असताना रुग्णाला श्वास घेण्यास अतिशय त्रास येऊ लागतो. पोटाच्या डाव्या बाजूस वेदना होतात व त्या कंबर व मांडीपर्यंत पसरतात.

श्वसनक्रिया ही फार अनियमित होते. हळूहळू श्वसनाचा वेग वाढत जातो व त्यानंतर तो कमी होत जातो. मध्येच श्वसन थांबल्यासारखे होते व परत जोरात सुरू होते. थोड्याशा श्रमाने व थोड्याही चालण्याने रुग्णाला खूप धाप लागते. तापात रुग्णाला खूप डोकेदुखीचा त्रास होऊ लागतो. तापात डोळेसुद्धा प्रचंड दुखू लागतात. पोटही दुखू लागते. वेदना सहन होत नाहीत. रुग्णाला झोपल्याने वा पडून राहिल्याने त्रास होत असल्यामुळे रुग्णाला झोपायची भीती वाटू लागते. दमट ओलसर वातावरणात दम्याचा त्रास सुरू होतो. तापामध्ये त्वचेवरही परिणाम होतो. शरीरावर लालसर पुरळ येतात. त्वचेची खूप आग होते व खूप खाजही येते.


‘ग्रिंडेलिया’ हे औषध वैद्यकीय अनुभवामध्ये श्वसनरोगांवर फार उपयुक्त असे औषध आहे. श्वसनाचे आजार जसे- अस्थमा, ब्रॉन्कायटीस, एमफायसेमा, तसेच हृदयरोगाशी निगडित दम्याकरिताही हे औषध अत्यंत उपयुक्त असे आहे. श्वसनाच्या लक्षणांव्यतिरिक्त त्वचारोगावरही हे औषध उपयुक्त आहे. परंतु, हे त्वचारोग किंवा पुरळ हे बहुतांश वेळा श्वासाच्या आजाराशी निगडित असतात. ‘नागीण’ या त्वचा व नसांच्या आजारावरही हे औषध उपयुक्त ठरते. (जर लक्षणे मिळतीजुळती असतील तरच.)

‘कोविड-१९’च्या साथीच्या आजारात जेव्हा रुग्णाला तापानंतर किंवा तापामध्ये फार दम लागतो व न्यूमोनियासदृश बदल चाचण्यांमध्ये, जसे सीटीस्कॅनमध्ये दिसून येतात. अशावेळी आणि जर वर दिल्याप्रमाणे लक्षणे रुग्णामध्ये दिसत असतील, तर ‘ग्रिंडेलिया’ योग्य मात्रेमध्ये दिल्याने फुफ्फुसाचे हे विकार पूर्ण बरे होऊन रुग्ण बरा होतो. पुढील भागात आपण कोरोनाच्या उपचारांबद्दल अजूनही काही माहिती पाहूया.


- डॉ. मंदार पाटकर

(लेखक एम.डी. होमियोपॅथी आहेत.)
@@AUTHORINFO_V1@@