चर्चचे मशिदीत रुपांतर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jul-2020   
Total Views |
Hagia Sophia - Istanbuls



तुर्कस्तानचे राष्ट्रपती रसिप तय्यप एर्दोगान यांनी शुक्रवारी ऑटोमन साम्राज्याचे वैभव दाखवून देण्यासाठी इस्तंबूलमधील दीड हजार वर्षे जुने ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन कॅथेड्रल हागिया सोफियाला मशिदीत रुपांतरित करण्याची घोषणा केली.



तत्पूर्वी तुर्कस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने एर्दोगान यांच्या दबावानंतर तत्संबंधी आदेश दिला होता, मात्र, चर्चचे मशिदीत रुपांतर करण्याचा हा निर्णय जगभरातील मुस्लीम व ख्रिश्चनांमधील नवसंघर्षाचे कारणही ठरत आहे. कारण, आधुनिक तुर्कस्तानचे निर्माते केमाल अतातुर्क यांच्या निर्णयानुसार, १९३४ साली हागिया सोफियाचा मशिदीच्या रुपातील वापर थांबवण्यात आला होता. 


तसेच ‘युनेस्को’च्या निर्देशानुसार हागिया सोफिया यापुढे संग्रहालयाच्या रुपात ओळखले जाईल, असे जाहीर केले होते. परंतु, केमाल अतातुर्क यांचा सुमारे ८५ वर्षांपूर्वीचा निर्णय एर्दोगान यांनी उलटवला. “युनेस्कोने घोषित केलेल्या जागतिक वारसा स्थळाचे मशिदीतील रुपांतरण तुर्कस्तानच्या सार्वभौम अधिकारांतर्गतच केले आहे. आता हागिया सोफियाच्या परिसरात दि. २४ जुलै रोजी पहिल्यांदा नमाज पढली जाईल. तसेच ही ऐतिहासिक वास्तू स्थानिक नागरिकांसह बिगरमुस्लीम आणि परकीयांनादेखील खुली राहील,” असे एर्दोगान यांनी सांगितले, तर तुर्कस्तानमधील प्रशासकीय अधिकार्‍यांनी, चर्चच्या सोनेरी घुमटावरील व्हर्जिन मेरीचे माोझाईक हटवले जाणार नाही, असे स्पष्ट केले.


तथापि, तुर्कस्तानातील वाढता राष्ट्रवाद वा कट्टरपंथी इस्लाम आणि हागिया सोफियाबाबतचा निर्णय जगभरातील ख्रिश्चन देशांना आवडलेला नाही. पूर्वेकडील परंपरावादी चर्च, ग्रीस आणि रशियातील चर्चने तुर्कस्तानच्या या निर्णयावर टीका केली आहे. सोबतच तुर्कीशी या मुद्द्यावर चर्चा करण्याचा निर्णय ‘युनेस्को’ने घेतला आहे. हागिया सोफियाबाबतच्या घोषणेतून एर्दोगान यांनी आपली नजर मुस्लीम जगताचा पुढचा खलिफा होण्यावर असल्याचे दाखवून दिल्याचे दिसते. कारण, सध्या मुस्लीम जगतात सौदी अरेबियाचा बोलबाला आहे आणि एर्दोगान यांना मात्र सौदी अरेबियापेक्षाही तुर्कस्तानचे व स्वतःचे स्थान वरचढ असावे, असे वाटते. तसे प्रयत्न त्यांनी याआधीच सुरु केलेले असून आताच्या निर्णयातून देशातील कट्टरपंथीय मुस्लिमांसह जगभरातील मुस्लीमही खूश होतील, असे त्यांना वाटते. तसेच तुर्कस्तानातील कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीवरुनही जनतेचे लक्ष दुसरीकडे वळेल.


दरम्यान, दरवर्षी सुमारे ३७ लाखांपेक्षा अधिक पर्यटक भेट देत असलेल्या हागिया सोफियाचा इतिहास अनेक शतकांपासूनचा आहे. ही वास्तू सन ५३७ मध्ये बायझन्टाईन सम्राट जस्टिनियन पहिला याच्या आदेशाने उभारण्यात आली. भव्य वास्तुरचनेमुळे हागिया सोफियाला जगातील सर्वात मोठे चर्चदेखील म्हटले जाई. तद्नंतर जवळपास ९०० वर्षांपर्यंत हागिया सोफियाला पूर्वेतील ख्रिश्चनांचे एक तीर्थस्थळ मानले गेले. इथे ठेवलेल्या कलाकृतींमध्ये येशूच्या मूळ क्रॉसचाही समावेश होता. अनेक शतकांपर्यंत ख्रिश्चन तीर्थयात्री इथे येऊन आत्मिक शांती प्राप्त करत असत. मात्र, काळ बदलला, इस्लामचा उदय झाला. 


सर्वत्र इस्लामी टोळ्या तलवारीच्या जोरावर धर्मप्रसारासाठी उधळल्या. इथूनच इस्लाम व ख्रिश्चनांमधील रक्तरंजित व हिंसक संघर्षाला सुरुवात झाली. हा संघर्ष गेल्या १४०० वर्षांपासून सुरुच आहे. मात्र, दरम्यानच्या काळात बायझन्टाईन साम्राज्य लयाला गेले आणि १४५३ साली ऑटोमन साम्राज्याच्या काळात हागिया सोफियाचे रुपांतर एका मशिदीत करण्यात आले. इथे लक्षात घेण्यासारखे म्हणजे जगात जिथे जिथे इस्लामी आक्रमक गेले वा इस्लामाधिष्ठित साम्राज्ये निर्माण झाली, तिथे तिथे तिथल्या पूर्वाश्रमीच्या प्रार्थनास्थळांची हीच गत झालेली आहे. त्याला हागिया सोफियादेखील अपवाद नव्हतेच.
सुलतान मेहमेद दुसरा यांनी इस्तंबूलवर कब्जा केला, पण त्यांच्याआधी या शहराला ‘कॉन्स्टॅन्टिनोपल’ असे म्हटले जाई. सुलतान मेहमेद यांनी कॉन्स्टॅन्टिनोपल बळकावले आणि हागिया सोफिया चर्चमध्ये जुम्माच्या नमाजाला सुरुवात केली. तद्नंतर चर्चचे मशिदीत रुपांतरित करण्यासाठी इथे चार मिनार उभारले गेले व ते चर्चच्या मूळ आराखड्याला जोडण्यात आले. इतकेच नव्हे तर ख्रिश्चन मोझाईक इस्लामी चित्रकलेद्वारे झाकले गेले, जेणेकरुन ती मशीद वाटावी. नंतर अनेक शतके या वास्तूचा वापर मशीद म्हणून केला गेला. मात्र, केमाल अतातुर्क यांनी विसाव्या शतकात वास्तूचा मशीद म्हणून वापर संपवला आणि तिला संग्रहालयाचा दर्जा दिला, तर आता रसिप एर्दोगान यांच्या सत्तेत इथल्या सगळ्याच गोष्टी बदलण्याची तयारी सुरु झाली आहे. 



@@AUTHORINFO_V1@@