हा घ्या पुरावा ! धारावीत आरएसएसच्या ८०० स्वयंसेवकांमुळेच कोरोना नियंत्रणात

    12-Jul-2020
Total Views |

chitra wagh_1  





मुंबई :
देशातील एकूण कोरोना रुग्णांपैकी महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. पण, या संकटात आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतील कोरोना रोखण्यात यश आले आहे. जागतिक आरोग्यसंघटनेने ही याचे कौतुक केले. मात्र, धारावीच्या कौतुकानंतर तेथील श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांमुळेच धारावीतील परिस्थिती नियंत्रणात आली असल्याचे सेवाकार्य करणाऱ्या स्वयंसेवकांचे फोटो शेअर करत म्हंटले आहे.




भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंसह माहिती देताना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ८०० स्वयंसेवकांच्या अविरत कार्यामुळेच धारावीतील कोरोना नियंत्रणात आल्याचे त्यांनी यात म्हंटले आहे. तसेच, या स्वयंसेवकांनी लक्षणीय काम केले असून धारावीतील लोकांना कोरोनाबद्दल जागृत करणे, अन्नधान्य पुरविणे, स्क्रीनिंग यांसारखी महत्वाची कामे केली आहे. या कामादरम्यान काहींना कोरोनाची लागणही झाल्याचे चित्र वाघ यांनी नमूद केले.






दरम्यान, भाजप नेते नितेश राणे यांनीही हे राज्य सरकारचे एकट्याचे श्रेय नसून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व संबंधित संस्था आणि अन्य सेवाभावी संस्थांनी धारावीच्या अनेक भागांत दिवसरात्र काम केले. त्यांनी कोणताही गाजावाजा केला नाही. त्यांच्या मेहनतीमुळे धारावी आज कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे त्याचे श्रेय हे महाराष्ट्र सरकारला देणे हे त्या संस्थांवर अन्याय करण्यासारखे आहे,अशा आशयाचे ट्विट केले होते.त्याचबरोबर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही धारावीचे श्रेय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे असल्याचे म्हंटले होते.