पर्यावरण : ‘कोरोना’पूर्वीचे आणि पश्चात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jul-2020   
Total Views |

covid and environment_1&n


कोरोनापूर्व माऊंट एव्हरेस्टची खालावणारी पातळी, तेथे साचणारा कचरा, वैश्विक तापमान वाढीमुळे समुद्राच्या पातळीत होणारी वाढ, बर्फाच्छादित प्रदेशात विरघळणारा बर्फ हा कायमच चिंतेचा विषय ठरत असे. आजही एका वृत्तानुसार सायबेरियात सातत्याने वाढणारे तापमान हे भीषण पर्यावरणीय आपत्तीची नांदी आहे काय? अशी शंका जागतिक स्तरावर व्यक्त करण्यात येत आहे.



जागतिक पटलावर कायमच चर्चेत राहणारा मुद्दा म्हणजे जागतिक तापमान वाढ आणि वैश्विक पर्यावरणाला असणारा मानवी धोका. कोरोनापूर्वी जेव्हा जगातील सर्व व्यवहार सामान्य होते, तेव्हा पर्यावरणाचा होणारा र्‍हास यावर अनेक चर्चा रंगत. कोरोनामुळे जगाची एक प्रकारे टाळेबंदी झाल्यावर, वर्दळीचे रस्ते निर्मनुष्य झाल्यावर वातावरणात सुधारणा होत असल्याचे दिसून आले. कोरोनापूर्व माऊंट एव्हरेस्टची खालावणारी पातळी, तेथे साचणारा कचरा, वैश्विक तापमान वाढीमुळे समुद्राच्या पातळीत होणारी वाढ, बर्फाच्छादित प्रदेशात विरघळणारा बर्फ हा कायमच चिंतेचा विषय ठरत असे. आजही एका वृत्तानुसार सायबेरियात सातत्याने वाढणारे तापमान हे भीषण पर्यावरणीय आपत्तीची नांदी आहे काय? अशी शंका जागतिक स्तरावर व्यक्त करण्यात येत आहे.



आर्क्टिक महासागराच्या परिसरात असलेल्या भागाचे तापमान जून महिन्यात ३१अंश सेल्सिअसपर्यंत गेल्याचे नोंदविले गेले आहे. एरवी या मोसमात तेथील परिसर हा बर्फाने वेढलेला असतो.पर्यावरणीय समस्या अजूनही संपलेल्या नाहीतच. मात्र, या समस्या ‘लॉकडाऊन’मुळे थोड्याफार कमी झाल्या आहेत. भारतातील विविध शहरात या काळात नदीप्रदूषण, हवाप्रदूषण यात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तसेच, अनेकदा आवाहन करूनदेखील पर्यावरणाच्या र्‍हासातील मानवी हस्तक्षेप कमी होत नव्हता. ‘लॉकडाऊन’ काळात घराबाहेर जाण्यास अनुमतीच नसल्याने पर्यावरणीय र्‍हासातील मानवी हस्तक्षेप आपोआप आटोक्यात आला. त्यामुळे आता कोरोना काळात पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी नेमके काय करावयास हवे, तसेच मानवी हस्तक्षेप कसा प्रतिबंधित करावा, हे उमजले आहे, असे दिसून येते. त्यामुळे कोरोनापश्चातचा काळ हा पर्यावरणीय सजगतेचा असण्याचीदेखील शक्यता नाकारता येत नाही.



जगातील काही मोठ्या शहरातील अनेक भागांमध्ये कारवर बंदी घालण्यात आली आहे. पॅरिसला १ हजार, ४०० किमीची सायकल लेन साकारण्याची तयारी करण्यात येत आहे. ‘लॉकडाऊन’मध्ये अमेरिका, युरोपातील पर्यावरण उत्कृष्ट करण्यासाठी तेथील महापौरांनी पुढाकार घेतल्याचे वृत्त आहे. त्यासाठी हजारो एकर जमिनीवर नवीन उद्यान साकारण्यात येणार आहे. वर्दळीच्या ठिकाणी असणार्‍या वाहनतळाच्या जागा नष्ट करून हवेतील प्रदूषण कमी करण्यावर सध्या भर देण्यात येत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याच्या पार्श्वभूमीवर बर्‍याच मोठ्या शहरांमध्ये बदल सुरू झाले असल्याचे सध्या दिसून येत आहे. त्यात सौरऊर्जेपासून वीजनिर्मितीचे प्रकल्प अधिक संख्येने वाढविणे, इमारतींमध्ये अधिक नैसर्गिक प्रकाश कसा येईल, या दृष्टीने वास्तुरचना करणे, शहरातील अंतर्गत भागात खासगी गाड्यांवर बंदी घालणे व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करणे याकडे सध्या जगातील राष्ट्रे लक्ष देत आहेत. तसेच, हवेतील कार्बनचे अधिक प्रमाण हे कायमच पर्यावरणासाठी डोकेदुखी ठरले आहे. पॅरिसमध्ये फ्रान्समधील सर्वात मोठी सायकलची लेन साकारण्यात येत आहे. यामुळे २०१५ मध्ये कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी झालेल्या जागतिक समझोत्याचे हे फलस्वरूप आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कोरोनामुळे शहरे अक्षरश: बंद होती. त्यामुळे सर्वत्र शांतता होती. रस्त्यांवर वाहने, माणसे यांची वर्दळ अगदी गरजेपुरती होती. त्यामुळे शहरे निरोगी होण्याच्या संदेशाला बळकटी मिळाली आहे.


संयुक्त राष्ट्रसंघाच्या आकडेवारीनुसार, पृथ्वीच्या एकूण क्षेत्रापैकी फक्त दोन टक्के शहरे आहेत. परंतु, ते जगातील ऊर्जेचा ७८ टक्के वापर करतात. ते संपूर्ण कार्बन उत्सर्जनापैकी ६० टक्के पेक्षा जास्त सोडतात. टोरंटो युनिव्हर्सिटीच्या शहरी जीवनाचे तज्ज्ञ रिचर्ड फ्लोरिडा यांच्या मतानुसार शहर औद्योगिक युगाचे अवशेष आहेत. त्यांना निरोगी आणि सुरक्षित बनविण्यासाठी त्यांचे पुन्हा डिझाईन करणे आवश्यक आहे. शहराचे वाढणारे महत्त्व आणि कोरोनामुळे तेथे गर्दी नसल्यास वाढणारे आयुष्य हे लक्षात घेता लंडन मध्य शहरातील अंतर्गत भागात येणार्‍या मोटारीवरील टोल टॅक्समध्ये वाढ करण्यात आली आहे. इस्तंबूलदेखील हरित आणि प्रदूषणमुक्त केले जात आहे. संकट हे सज्ञान बनवते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कोरोना हे नक्कीच एक मोठे संकट आहे. मात्र, या संकटाने पर्यावरणासारख्या महत्त्वाच्या विषयाचा आरसाच जणू मानवाला दाखविला आहे. असेच सध्या जगभारत सुरु असलेल्या उपाययोजनांवरून दिसून येते.

@@AUTHORINFO_V1@@