बालिश बहु...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jul-2020
Total Views |

aditya thackeray_1 &



पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी नुकतीच विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर ‘हेल्थ’ आणि ‘डिझास्टर टुरिझम’साठी फिरत असल्याची टीका केली. मात्र, आदित्य ठाकरेंची विधाने त्यांच्या मागे फिरणार्‍या पेंगूसैनिकांना कदाचित आवडतही असतील, पण यातून मंत्रीपदावर असतानाही त्यांचा बालिशपणा सुरु असल्याचेच स्पष्ट होते.



बालिश बहु... अशी मराठीत एक म्हण आहे आणि ती सत्य ठरवत राज्याचे युवा पर्यटनमंत्री व शिवसेनेचे युवराज आदित्य ठाकरे यांनी नुकतीच विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोरोनाकाळात राज्यभरात केलेल्या दौर्‍यांवर टीका केली. विरोधी पक्ष नेते ‘हेल्थ’ आणि ‘डिझास्टर टुरिझम’साठी फिरत असल्याचे विधान आदित्य ठाकरे यांनी केले. अर्थात शिवसेनेकडून देवेंद्र फडणवीस आणि फडणवीसांनी केलेल्या दौर्‍यावर टीका होणे नैसर्गिकच! कारण, देवेंद्र फडणवीस यांनी कोरोना महामारीसारख्या भीषण आपत्तीत सत्ताधार्‍यांनी जे करायला हवे, ते स्वतः घराबाहेर पडून, जमिनीवर उतरुन, जनतेत जाऊन केले. कोरोनाविरोधात जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रात नेमक्या काय उपाययोजना करण्यात आल्या, रुग्ण आणि रुग्णालयांची स्थिती कशी आहे, रुग्णांवर उपचार होत आहेत अथवा नाही, कोरोना संशयितांच्या पुरेशा चाचण्या होत आहेत अथवा नाही आणि कोणत्या सोयीसुविधांची आवश्यकता आहे, वैद्यकीय कर्मचारी व इतरांना कोणत्या समस्या भेडसावत आहेत, याचा आढावा घेण्यासाठी त्यांनी अनेक जिल्ह्यांना भेटी दिल्या. लोकांत मिसळून त्यांच्या अडी-अडचणी, वेदना, दुःख समजून घेण्याच्या या कृतीमुळे ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, नाशिक, जळगाव, औरंगाबाद अशा प्रत्येक ठिकाणी ‘कोरोना योद्धा’ म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे शानदार स्वागत झाले. देवेंद्र फडणवीस आज विरोधी पक्ष नेता आहेत आणि सत्तेत नसला तरी हा माणूस आपल्या पाठीशी उभा राहिला, हा विश्वास यावेळी जनतेच्या मनामध्ये होता. सत्तेच्या बाहेर असतानाही लोकांच्या गराड्यात राहण्याचे गोपीनाथ मुंडे यांना लाभलेले भाग्य अशाप्रकारे देवेंद्र फडणवीस यांच्या वाट्याला आले आणि त्याचीच पोटदुखी शिवसेनेला झाली व ती आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यांतून बाहेर पडली.




राजकारणामध्ये दोन प्रकारच्या व्यक्ती असतात. एक म्हणजे, कर्तृत्व, नेतृत्व व त्याला कष्टाची जोड देणारे तर दुसर्‍या प्रकारात घराण्याचा वारसा, खुशमस्कर्‍यांच्या टोळ्या, तडजोडी व कपट कारस्थाने करुन सत्ता मिळवणारे. महाराष्ट्रात आज नेमके कोणत्या प्रकारातल्या राजनेत्यांचे सरकार सत्तेवर आहे, याचे वेगळे उदाहरण देण्याची गरज नाही. कारण सध्या राजकारणातील पहिल्या प्रकारातल्या व्यक्तिमत्त्वाचा जीवंत दाखला विरोधी पक्ष नेत्यांतून पाहायला मिळतो तर दुसर्‍या प्रकारातील व्यक्तिमत्त्वाचा अनुभव राज्यातील प्रत्येकजण घेत आहे. अशा परिस्थितीत, मुख्यमंत्र्यांच्या मनाला आले आणि पुत्राला मंत्री केले, अशी अवस्था असलेल्या आदित्य ठाकरे यांना आपली ओळख दाखवण्याची सुरसुरी आली आणि ते बडबडले. आदित्य ठाकरेंची विधाने त्यांच्या मागे फिरणार्‍या पेंगूसैनिकांना कदाचित आवडतही असतील, पण यातून मंत्रीपदावर असतानाही त्यांचा बालिशपणा सुरु असल्याचेच स्पष्ट होते. म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांनी केलेले, ‘नया है वह’ आणि ‘मंत्री केल्याने शहाणपण येतेच, असे नाही’, हे आदित्य ठाकरेंबाबतचे विधान इथे तंतोतंत खरे ठरते. पुढचा मुद्दा म्हणजे आदित्य ठाकरे यांनी ‘हेल्थ’ आणि ‘डिझास्टर टुरिझम’ अशी शब्दावली वापरत ज्याची टवाळी उडवण्याचा उद्योग केला, ते त्यांच्याच पर्यटन खात्यांतर्गत येते. पर्यटनक्षेत्रात ‘हेल्थ’ आणि ‘डिझास्टर’चेही निराळे असे महत्त्व आहे, पण त्याचीच चेष्टा पर्यटनमंत्री करत असेल तर त्याचे विपरित परिणाम राज्याच्याच पर्यटन विभागाला भोगावे लागू शकतात. आणि हे न समजू शकणारा पर्यटनमंत्री महाराष्ट्राच्या ललाटी आला, हे इथल्या जनतेचेही दुर्भाग्यच. अर्थात ज्यांना फक्त स्वतःच्या सत्तेची आणि विरोधी पक्षनेत्यांवरील टीकेची चिंता लागून राहिलेली असते, त्यांना जनतेच्या दुर्दैवाशी कसले आलेय कर्तव्य? ते त्यांना दुःख-दैन्याच्या दशेत खितपत ठेवून टीका-टिप्पण्या वा मुलाखतींची मौजच करत राहणार!


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या घरात बसून केलेल्या फेसबुक गप्पांतून ‘लॉकडाऊन’ लागू करणे आणि ते उघडणे कला असल्याचे सांगितले होते. राज्यातील आताच्या कोरोना स्थितीवरुन मुख्यमंत्र्यांची कला कितपत यशस्वी झाली, याची प्रचिती येतच आहे. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, पुणे, औरंगाबाद अशा ठिकाणी कोरोनारुग्णांची वाढ चिंताजनक अवस्थेत पोहोचलेली आहे. अनेक ठिकाणी रुग्णसंख्या वाढती दिसू नये म्हणून संशयितांच्या चाचण्याच न करणे, अहवाल उशिरा येणे, रुग्णांचे आणि मृतांचे आकडे दडवून ठेवणे, असे प्रकारही घडत आहेत. राज्यातील रुग्णसंख्या आता अडीच लाखांकडे झेपावत आहे आणि मृतांची संख्याही १० हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचली. मुंबई महानगर परिक्षेत्रात एकूण रुग्णसंख्येच्या ६० टक्के रुग्ण आणि ७३ टक्के मृत्यू झाले, तरीही ठोस उपाययोजना करण्याऐवजी मुख्यमंत्री, आमचा कारभार आदर्श असल्याचे अभिमानाने सांगतात. तर राज्यात सारीकडे भकास वातावरण असताना महाविकास आघाडी सरकारचे मुख्य सुत्रधार मात्र मुलाखती देतात.




मुलाखतकार संजय राऊतही राजकारण आणि राजकारणालाच महत्त्व देतात. भाजपला १०५ जागा मिळूनही महाराष्ट्रात त्यांची सत्ता का आली नाही, या प्रश्नाला शरद पवारही या जागा शिवसेनेमुळेच मिळाल्याचे सांगत पाठ खाजवण्याचे प्रकार करतात. अशा प्रकारे यांचे सरकार सुरु आहे आणि तरीही राज्यात सगळे कसे आलबेल असल्याचे जनतेने व विरोधकांनीही म्हणावे, ही यांची अपेक्षा! यातून वाईट होणार ते महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेचेच, त्रास सोसावा लागणार तो इथल्या मराठीजनांनाच. मात्र, जनतेचा हाच त्रास कमी व्हावा आणि त्यांना किमान सुविधा तरी मिळाव्यात म्हणून देवेंद्र फडणवीस झटत आहेत. काही सूचना करताहेत, काही सल्ले देत आहेत आणि कधी राजकारण करावे, कधी करु नये, याची जाणीव नसणारे आदित्य ठाकरे त्यावरही टीका करत आहेत. सर्वकाही आयते मिळाल्याने राजकारणातही कष्ट उपसावे लागतात, याचाच पत्ता नसल्याने आदित्य ठाकरे असे करणारच. पण त्यांचा हा बालिशपणा किती दिवस टिकेल? कारण जनतेला मनोरंजन करणारा सत्ताधारी नको असतो, तर सामान्य आणि संकटकाळातही धडाडीने काम करणाराच नेता हवा असतो.
@@AUTHORINFO_V1@@