'क्लीनचिट'नंतरही सोमण यांना त्रास देण्याचा प्रयत्न

    11-Jul-2020
Total Views |

yogesh soman_1  


मुंबई
: मुंबई विद्यापीठाच्या अकॅडमी ऑफ थिएटर आर्टसचे संचालक योगेश सोमण पुन्हा मुंबई विद्यापीठाच्या सेवेत रुजू झाले असून त्यांनी आपल्या विभागाची सूत्रे हाती घेतली आहेत. योगेश सोमण हजर असलेल्या ७ जुलै रोजीच्या विद्यापीठातील विभागप्रमुखांच्या झूम मिटिंगचे स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले. विद्यापीठाच्या अंतर्गत कार्यालयीन कामकाजाचे  हे स्क्रिनशॉट कोणी व्हायरल केले याबाबत चौकशी करून विद्यापीठ प्रशासन कडक कारवाई करणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले.



याबाबत विद्यापीठ प्रशासनाकडून माहिती देताना,"ही मिटिंग संपूर्णतः कार्यालयीन होती. विद्यापीठांच्या सर्व विभागांचे विभागप्रमुख ऑनलाईन या मीटिंगला हजर होते. हे स्क्रिनशॉट कोणी शेअर केले याची चौकशी करणार असून संबंधितांना कडक निर्देश देण्यात येतील." अशी माहिती मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी 'महाएमटीबी'शी बोलताना दिली.



योगेश सोमण यांच्या चौकशीसाठी नियुक्त केलेल्या सत्यशोधन समितीने सोमण यांना क्लीन चिट दिली आहे. यामुळे योगेश सोमण पुन्हा मुंबई विद्यापीठाच्या सेवेत रुजू झाले असून त्यांनी आपल्या विभागाची सूत्रे हाती घेतली आहेत. याबाबत बोलताना डॉ. पाटील म्हणाले, "योगेश सोमण हे रजेवर गेले होते. ते पुन्हा विभागाच्या सेवेत रुजू झाले आहेत. त्यांच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीने त्यांना निर्दोष ठरवले असून त्याप्रमाणे विद्यापीठाची कार्यवाही सुरू आहे."


सत्यशोधन समितीचा अहवाल विद्यार्थ्यांना न कळवताच विद्यापीठाने निर्णय घेतल्याने काही विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली तसेच हा अहवाल विभागातील विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन सादर करावा अशी मागणी अशी मागणी विद्यार्थांनी विद्यापीठ प्रशासनाने केली आहे. यावर माहिती देताना डॉ. पाटील यांनी सांगितले कि, "या मागणीचा विचार करून विद्यापीठाचा जो निर्णय होईल तो लवकरच विद्यार्थ्यांना कळवला जाईल."


दरम्यान मुंबई विद्यापीठातील अकॅडमी ऑफ थिएटर आर्टस् या विभागात जानेवारी महिन्यात विद्यार्थ्यांच्या एका आपल्या मागण्यांसाठी नाट्यमय आंदोलन सुरू केले होते. यात प्रामुख्याने संचालक योगेश सोमण यांच्या विरोधात कुलपतींनी कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली होती. योगेश सोमण यांना हटवण्याच्या बातमीला केवळ राजकीय रंग देण्याचे काम या माध्यमातून करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा योगेश सोमण पदभार स्वीकारताच हे वातावरण तापण्याचा प्रयत्न सुरु झाला  आहे.