प्राण्यांचा सुद्धा ‘भारतातून बाहेर’ प्रवास

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jul-2020
Total Views |

oti_1  H x W: 0


मागच्या लेखात आपण ‘Out of India Theory’ (OIT), अर्थात ‘भारतातून बाहेर’ सिद्धान्त काय सांगतो, त्याची तोंडओळख करून घेतली. हा सिद्धांत ‘आर्यांनी भारताच्या बाहेरून भारतात स्थलांतर केले’, असे सांगणाऱ्या सिद्धांताच्या बरोबर उलट प्रक्रिया घडल्याचे दाखवून देतो. या दोन सिद्धांतांमधील या मूलभूत फरकाशिवाय अजून एक मूलभूत फरक असा - ‘आर्य स्थलांतर’ सिद्धांत म्हणजे पाश्चात्त्यांच्या श्रेष्ठत्वगंडातून आणि ‘फोडा व राज्य करा’ या राजकीय प्रेरणेतून तयार झालेले नुसतेच एक कपोलकल्पित परंतु कारस्थानी गृहीतक आहे. संशोधनाच्या क्षेत्रात असले पितळ सहजपणे उघडे पडते. परंतु ‘भारतातून बाहेर’ सिद्धान्त मात्र शास्त्रीय संशोधनातून जन्माला आलेला आहे. विविध ज्ञानशाखांमधून प्रत्यक्ष व ठोस पुराव्यांची जोडणी त्यामध्ये झालेली आहे. तर्काच्या बळाने आणि बुद्धीच्या निकषावर सिद्ध झालेले हे संशोधन आहे. यापैकी काही संशोधनांची ओळख आज करून घेऊया.



उंदरांचा सुळसुळाट : अमेरिकेतील National Center for Biotechnology Information (NCBI) या संशोधन संस्थेत मे २००७ मध्ये एक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण संशोधन प्रकाशित झाले. फ्रांस्वा बॉनहोम (François Bonhomme), एरिक रिव्हाल्स (Eric Rivals), अॅनी ऑर्थ (Annie Orth) आणि त्यांचे अन्य काही सहकारी अशा काही अमेरिकन संशोधकांनी हे प्रसिद्ध केले. जगभरातील उंदरांच्या विविध प्रजाती, त्यांची जनुके (Genomes), त्या जनुकांचे विविध गट या मुद्द्यांवर आधारित असंख्य निरीक्षणे त्यात नोंदविली आहेत. जनुकांच्या विविध गटांचा जगभरातील आढळ त्यामध्ये प्रामुख्याने अभ्यासण्यात आला. यातून समोर आलेले जे निष्कर्ष आहेत, त्यात त्या संशोधकांच्या चमूचा उद्देश तर त्यांनी मांडलाच आहे. पण आत्ता आपल्या दृष्टीने अतिशय चित्तवेधक असा त्यातला एक निष्कर्ष इथे पाहूया.

या निष्कर्षानुसार उंदरांची घरगुती प्रजाती (Mus - domestic mouse) पूर्वी फक्त उत्तर भारतातच अस्तित्वात होती. हा काळ होता साधारणपणे ९,००,००० (नऊ लाख) वर्षांपूर्वीचा! पुढे उत्क्रांतीमध्ये त्याच्या तीन मुख्य प्रजाती बनल्या. Mus Musculus Domesticus, Mus Musculus Musculus आणि Mus Castaneus या त्या तीन प्रजाती भारतातच उत्क्रांत झाल्या. हा काळ होता साधारणपणे ५,००,००० (पाच लाख) वर्षांपूर्वीचा. हे घरगुती उंदिर अतिशय सहजपणे उपलब्ध होणाऱ्या अन्नपदार्थांमुळे तत्कालीन मानव वस्तीच्या जवळपासच राहत असत. त्या काळातला जो ‘मानव’ प्राणी होता, त्याला Homo Erectus (उभा राहू शकणारा मानव) अशी शास्त्रीय संज्ञा आहे. पुढे उत्क्रांतीमध्ये हा मानव अजून बुद्धिमान झाला. त्याला Homo Sapiens Sapiens (बुद्धिमान मानव) अशी संज्ञा आहे. ही स्थिती सुमारे ५,००,००० (पाच लाख) वर्षांपूर्वी ते १,००,००० (एक लाख) वर्षांपूर्वी या दरम्यान कधीतरी तयार झाली. हा मानव आपल्या बुद्धीचा वापर करून जगभरात भटकू लागला. उत्तर भारतातील अशा भटक्या मानवाच्या सोबतच असे घरगुती उंदिर सुद्धा नकळतपणे जगभर पसरले. या संशोधनाचा एक संक्षिप्त लेख आपण पुढील लिंकवर पाहू शकता:
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC1929145/



या संशोधनावर आधारित अजूनही काही मुद्द्यांचे संकलन करणारा प्रेमेंद्र प्रियदर्शी यांचा अजून एक दीर्घलेख आपण पुढील लिंकवर पाहू शकता:
https://priyadarshi101.wordpress.com/2011/05/08/mice-migration-and-human-migration-two-linked-journeys/



OTI_2  H x W: 0



NCBI मधील या संशोधनात हे घरगुती उंदिर भारतातून जगभरात कुठल्या काळात कुठे कुठे स्थलांतरित झाले, त्याचा एक आलेख दिला आहे. त्यामधील एक नकाशा इथे आपण पाहू शकता. काय सांगतो हा निष्कर्ष? उत्क्रांतीच्या प्रवासातला अप्रगत मानव त्या अवस्थेतही जगभर भटकत होता. प्रामुख्याने भारतीय उपखंडातून जगात इतरत्र असा प्राचीन मानवाचा जो प्रवास झाला, त्याला जोडूनच या घरगुती उंदरांचा प्रवास सुद्धा घडला. अर्थातच त्या मानवाने आपल्या एखाद्या पाळीव प्राण्याप्रमाणे या उंदरांना आपल्या सोबत मुद्दाम नेले नाही. पण अन्नपदार्थांचा शोध घेण्याच्या बाबतीत अतिशय आळशी असलेला आणि म्हणूनच शक्यतो दुसऱ्याच्या कष्टावर स्वत:चे पोषण करणारा उंदिर हा प्राणी अशा मानवाच्या सोबतच जगभर गेला.



भारतीय बैलाचा जगप्रवास :
होलोसीन (Holocene) नावाने ओळखल्या जाणाऱ्या चालू हिमोत्तर काळात जेव्हा मानव शेती आणि व्यापार करू लागला, तेव्हा शेतमालाच्या वाहतुकीच्या सोबतच असे घरगुती उंदरांच्या सारखे इतर प्राणीही अत्यंत स्वाभाविकपणे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करू लागले. शेतीतील आणि वाहतुकीतील उपयुक्त प्राणी म्हणजे भारतीय बैल, म्हणजेच Zebu अथवा Bos Taurus Indicus. याच पद्धतीने याचेही भारतातून बाहेर जगभरात स्थलांतर झालेले दिसते. हे भारतीय बैलाचे स्थलांतर आणि सोबत भारतीय धान्यांचा जगभरातील प्रवास दाखवणारा अजून एक नकाशा सोबत दिला आहे.



OTI_1  H x W: 0


पिंजऱ्यातील माकड : मे २०१९ मध्ये दक्षिण इराणच्या बलुचिस्तान परगण्यात ‘शहर-इ-सुख्तेह’ (‘Shahr-E-Sukhteh’ - The Burnt City) या ठिकाणी एक उत्खनन झाले. तिथे पिंजऱ्यात ठेवलेले एक माकड दफन केलेल्या स्थितीत आढळून आले. त्याच्या अवशेषांचा सखोल अभ्यास केल्यावर लक्षात आले, की माकडाची ही प्रजाती इराणमध्ये आढळत नाही, तर ती उत्तर भारतातील भारत-चीन सीमाप्रदेशात आढळते. इ. स. पूर्व सुमारे ३०००च्या आसपास ते माकड इराणमध्ये आणले गेले असावे. त्याच्या निधनानंतर त्याच्या मालकाने त्याला पिंजऱ्यासकट पुरलेले दिसले. या माकडाचा मालक इराणमधून भारतात येऊन हे माकड सोबत घेऊन परत गेलेला जरी असला, तरी त्याने भारतात येऊन कायमचे वास्तव्य केले नाही, हे लक्षात येते. किंवा एखादा भारतीय मनुष्य भारतातून हे माकड घेऊन इराणला गेलेला असला, तरीही भारतातून बाहेर होणारी तत्कालीन स्थलांतरे आणि भारताच्या समृद्धीचा त्याच्या मागचा तर्क कुणीही नाकारू शकत नाही. अशा पद्धतीने पाच हजार वर्षांपूर्वी सुद्धा भारतीय लोकांचे भारतातून बाहेर व्यापार आणि इतर विविध कारणांनी स्थलांतर चालत असल्याचे दिसते.



स्थलांतराची दिशा आणि बुद्धिवाद्यांची दशा :
अत्यंत प्राचीन काळापासून भारतीय पूर्वजांची भारतातून बाहेर स्थलांतरे होत असल्याची निदर्शक, अशी ही सगळी संशोधने आहेत. घरगुती उंदिर असो, शेतीचे उपयुक्त बैल असोत किंवा पाळलेल्या माकडासारखे हौसेचे प्राणी असोत - प्राचीन भारतीय पूर्वज वेगवेगळ्या कारणांनी भारताच्या बाहेर जात राहिले, त्यांच्या सोबतच या प्राण्यांचीही स्वाभाविक स्थलांतरे झाली. त्यातले अनेक जण तात्पुरते प्रवासाला गेले असतीलही, पण Homo Sapiens Sapiens च्या उत्क्रांतीपासून भारतातून बाहेरच्या दिशेने मुख्य स्थलांतरे झाल्याचेच ही संशोधने मूकपणे सांगतात. तथाकथित आर्य-वंशाच्या तथाकथित स्थलांतराच्या सिद्धांतामधला फोलपणा आपण यापूर्वी अनेक लेखांमधून पाहिला आणि यापुढेही पाहत राहूच. पण त्याच्या उलट प्राचीन भारतीय पूर्वजच वेगवेगळ्या कारणांनी भारताच्या बाहेर जात राहिले, याचीही नोंद वाचकांनी घेणे गरजेचे आहे. भारतातील बुद्धिजीवी हे गोष्ट कधी स्वीकारतील, देव जाणे! परंतु आपण मात्र यातून अस्सल शास्त्रीय गोष्ट कोणती आणि भ्रामक कहाण्या कोणत्या, हे ओळखायला शिकले पाहिजे.


- वासुदेव बिडवे 
@@AUTHORINFO_V1@@