बालकुमारांसाठी प्रतिभेचे पंख लावून आलेली कविता...

    11-Jul-2020
Total Views |
Eknath awad_1  





बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांनी बालकांच्या अंतरंगाचा शोध घेत बालकवितांचे लेखन केले असून यशाचे उंच उंच शिखर गाठण्यासाठी बालकांना गगनभरारी घेता यावी म्हणून प्रतिभेचे पंख मुलांना देऊ केले आहेत, असे त्यांची कविता वाचल्यानंतर मला वाटते. एकनाथ आव्हाड यांचे बालसाहित्यात मोठे योगदान असून त्यांचे बालकविता संग्रह, काव्यकोडी संग्रह प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्र शासनाच्या बालसाहित्य पुरस्कारासह इतरही साहित्य संस्थांचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

बालकांच्या मनात आनंदाचे झुले झुलवत झुलवत अनुभवांच्या बोलातून निसर्ग, माया आणि जगण्याची कला शिकवण्याचा ध्यास घेऊन लिहिणारा हा बालकवी बालमनात एकरुप होऊन जातो आणि मग निर्मळ, स्वच्छ, संस्कारमय अशी आव्हाडांची कविता बालकांच्या मनात उतरते. त्यांची पहिलीच कविता ही संस्काराची तिजोरी असलेली ‘आई’ या विषयावर आहे. दिव्यासारखी तेजाळत ती इतरांना प्रकाश देते. त्या आईचा सहवास कितीही संकटे आली तरी दूर करणारा आहे. आई सोबत आहे, एवढे मला पुरेसे आहे असे कवी लिहितो.


तू उचलून घेताच
मी आनंदाने झुलतो
तुझ्या सहवासात मी
फुलासारखा फुलतो


मुलांनाही कविता लिहाव्या वाटतात, पण शब्द काही केल्या सुचत नाहीत. कविता माझ्यावर रुसली की काय, असे बालकाला वाटते. मेघासारखे शब्द अलगद यावे आणि माझी कविता लिहून व्हावी, ही बालमनाची भावना कवी लिहितो.



शब्द ताठर, निष्ठुर
आज बसले रुसून
वाटे मेघांपरी त्यांनी
यावे अलगद बरसून



बालमन रानावनात भटकंती करताना त्यांना झाडांच्या खांद्यावर पाखरांची गाणी भेटतात, आभाळांच्या गळ्यात सावळ्या मेघांची माळ दिसते आणि बालमनात शब्द आपोआप येऊ लागतात.


त्याच वेळी ओले गच्च
आले आभाळ भेटाया
माझ्या व्याकूळ मनात
लागे कविता रुजाया


जगण्याची नवी कला ही आपणास निसर्गाकडून शिकता येते. धरणीकंप, ज्वालामुखी, वादळवारा, जलप्रलय या वाटेवरील अडचणींवर मात करता आली पाहिजे, हे कवी लिहितो.



असाध्यासी साध्य
तो करितो जिद्दीने
जगण्याची कला
निसर्ग शिकवी सिद्धीने


निसर्गाची लीला ही वेगळी असते. हे पाहताना भान हरपून जाते. निसर्ग कृपेचा बरसात करतो. निसर्गाच्या चैतन्य रुपाचे दर्शन कवी बालमनाला करुन देतो. कवी हा आपल्या मातीशी नाते जोडायला सांगतो. या मातीच्या कथा, व्यथा तिची महानता, कर्म, वर्ण, धर्म, रंग, रुप मुलांना उलगडून दाखवतो.



याच मातीत वाढलो
तिचं ऋण फेडायचंय
या मातीच्या कणांशी
नवं नातं जोडायचंय
या मातीच्या अनेक कथा
या मातीच्या अनेक व्यथा
या मातीच्या महानतेच्या
लिहू चला दिव्य गाथा
या मातीच्या वेदनेला
दूर दूर धाडायचंय..



आपला सोबती चांगला असावा, तरच आपणास अवघड वाटेचा डोंगर पार करता येतो, असेही कवी सुचवितो. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी नवा संकल्प केला पाहिजे. म्हणून कवी मुलांना जागे करु पाहत आहेत. तुमच्यात धमक असेल तर वाळवंटी नंदनवन फुलवता येते. निराश न होता ऊठ मुला, असे आई मुलाला सांगते. कवी लिहितो....



श्रमाची बांधून पुजा
कर प्रयत्न सत्वर
निराशेच्या काळोखाला
दे लखलखते उत्तर



खरे नागरिक होऊन सदा नेक राहू. सत्य हाच श्वास आहे. देश हाच देव आहे. हे सांगणे कवी विसरत नाही. देशाविषयीचा अभिमान सांगतो, तर पुढे कवी म्हणतो की, पाऊस मला खूप आवडतो, पण गरिबांचे हाल करणारा पाऊस नको. जलप्रलय करणारा नको, तर पशू, पक्षी, माणसांना जीवदान देणारा पाऊस मला हवा, असे कवी म्हणतो.



मला आवडतो पाऊस
रिमझिम बरसणारा
जीवनगाणे हलकेच
माझ्यात रुजवणारा



गरीब मुलांची जाणीव गुरुजीला असते. गुरुजी कविता शिकवताना मुलांचे आणि गुरुजींचे डोळे भरून वाहतात. ‘कहाणी एका कवितेची’ या कवितेतून कवी लिहितो-



वडील नाहीत त्याला
तो काम करुन शिकतो
शाळेत येण्यापूर्वी
तो उदबत्ती विकतो

मास्तरांची कविता मग
मग बाजूलाच राहिली
त्यांच्या डोळ्यांतली कविता
वर्गाने वाहताना पाहिली


पावसाने हजेरी नाही लावली की वसुंधरेचा श्रृंगार गळून पडतो. हे दयाघना, तू तृप्त करुन टाक अशी विनंती कवी करतो.



धाव दयाघना
अश्रू डोळ्यात
गाणे गळ्यात
आळवू किती

वाट पाहूनी
झाडेही थकली
कमरेत वाकली
डोळे मिटुनी


कधी कधी कवींची विनंती हा मेघराजा ऐकतो आणि आनंदाने बरसून जातो, तेव्हा वसुंधरेला आनंद होतो. इंद्रधनुष्य सप्तरंगांची उधळण करतो. पानाफुलात पाखरांची शीळ घुमू लागते. भिजल्या मातीचा गंध दरवळत राहतो आणि मग गर्द हिरव्या फांदीवर आनंदाचे झुले झुलतात. नयनमनोहर वर्णन कवी बालकांसमोर करतो.



पाऊसधारा भिजला वारा
सजली पानेफुले
कुणी बांधिले झाडांवरती
आनंदाचे झुले

चिंब भिजल्या मातीचा
गंध दरवळे मना
अमृत शिंपीत हसरा पाऊस
साद घालितो पुन्हा


स्पर्धेत सहभाग नोंदवून बक्षीस कसं मिळवायचं? त्यासाठी खूप खूप प्रयत्न आणि सराव कसा करायचा आणि बक्षीस कसं मिळवायचं त्या वितरण सोहळ्याचे वर्णन, पाहुण्यांसोबत काढलेल्या फोटोचा आनंद कवी ‘खरंच सांगतो दोस्तांनो’ या कवितेतून करतो.


मुलांनी शब्दांशी मैत्री करावी असे कवी ‘शब्द’ कवितेतून सांगतो. प्रत्येक कवीने आपल्या वेगवेगळ्या शब्दांत श्रावण उभा केला आहे. तशाच शब्दांत एकनाथ आव्हाड यांनी श्रावण महिना मुलांसमोर उभा केला आहे.श्रावण मनाला कसा भुरळ घालतो ते लिहितात –



थेंबाथेंबांनी बरसे
आसमंत सारा
भुरळ घालितो
मृदगंध वारा

साजिरा गोजिरा
आला श्रीरंग श्रावण
आकाशी बांधितो
इंद्रधनूचे तोरण



‘घे उंच भरारी’ या कवितेतून कवी कर्तृत्वाचे पंख लावुनी यशाची, प्रकाशमान होण्याची, माणुसकी जपण्यासाठी गगनभरारी घ्यावयास सांगतो, तर चुल्ह्यासाठी जळतण गोळा करणारी मुलगी गुरुजीला ‘माझ्यावरबी कविता लिवा की!’ असं सहज सांगते. तेव्हा गुरूजींचे डोळे भरून येतात. ‘तुझ्यावर काय कविता लिहू पोरी. तूच तर एक जितीजागती कविता आहेस.’ कष्ट करणार्‍या आणि शाळेची ओढ लागलेल्या पोरींची व्यथा कवी मांडतो आहे. शिक्षणाला महत्त्व खूप आहे. खूप शिकले तर अनुभवही चांगला येतो. शिक्षणाचं गाणं मुलांच्या ओठात असलं पाहिजे.



म्हणूनच शिक्षणाला
जप जिवापाड
मग तुझ्या आयुष्याचं
बहरेल झाड


आयुष्यभर आनंदी आणि सुखी राहायचं असेल तर ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान व मनोरंजनाबरोबरच प्रतिभेचे पंख लावून मुलांनी उंच उंच भरारी घ्यायला हवी, असे कवीला वाटते. ‘छत्रपती शिवाजी राजे’, ‘नवा प्रकाश’, ‘निसर्गगुढी’, ‘आनंदाच्या गाठीभेटी’, ‘माझा गाव’, ‘गवताची पाती’, ‘आईस पत्र’ इत्यादी कविता वाचनीय आहेत. शालेय मुलांच्या मनात घर करून बसणारी एकनाथ आव्हाड यांची ही कविता आहे. आतील सुंदर चित्रे अर्चना गोळे, तर मुखपृष्ठ नंदू गवांदे यांनी रेखाटले आहे. प्रकाशक संगीता चव्हाण यांनी उत्तम निर्मिती केली आहे. कवी मंगेश पाडगावकर व मेधा पाटकर यांच्या पुस्तकाला शुभेच्छा लाभल्या आहेत.



पुस्तकाचे नाव : खरंच सांगतो दोस्तांनो..
(बालकुमार कवितासंग्रह)
कवी : एकनाथ आव्हाड
प्रकाशन : पाणिनी प्रकाशन, ठाणे
पृष्ठे : ५२
मूल्य : १२० रु.
- प्रा. रामदास केदार