एक झलक सत्ययुगाची!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jul-2020
Total Views |

anuradha khot_1 &nbs


या सृष्टीचक्रात कलियुग संपल्यानंतर सत्ययुगाचे येणे हे अटळ आहे. परंतु, ते सत्ययुग काय आहे, कसे आहे, ते येते कसे, हे काही आपण जाणत नाही. या सत्ययुगाचे वर्णन सनातन ज्ञान मिळवणार्‍यांना कळते. तसेच ते अरविंदांसारख्या योग्याला साक्षात्कारातून कळले आहे. सविस्तर, मागच्या पुढच्या सार्‍या गोष्टींसह नाही, इतिहास-भूगोलासह नाही. परंतु, त्याची क्षणिक झलकसुद्धा या योग्याच्या दृष्टीला किती सुखावून गेली आहे. त्यांच्या बुद्धीने, दिव्य दृष्टीने त्याचे मर्म पकडले आहे. प्रतिभेने ते शब्दांत मांडले आहे.



आपला देश हा जगाचा अध्यात्मगुरु. जगात इतरत्र तत्त्वज्ञानी नाहीत, असं थोडंच आहे! परंतु, मूळ आध्यात्मिक ज्ञानाचा प्राचीनतम निधी आहे, तो भारतातच निर्माण झाला.अशा सनातन आणि तरीही नित्यनूतन ज्ञानाशी नव्याने परिचय झाला आणि कितीतरी प्रश्नांची उत्तरे मिळाली. किती दिव्य प्रकाशविश्वांची द्वारे उघडली. डोळ्यांना दिसणारे सीमित जग असीमित होत गेले. अपार, अनंत अशा अदृश्य जगाचा एक लहानसा भाग होऊन गेले. यापूर्वी जे अंधुक, अस्पष्टपणे माहिती होते ते स्पष्ट झाले. जी चुकीची माहिती होती, ती सुधारली गेली. अंधश्रद्धा पूर्णच संपली. प्रत्यक्षानुभव मिळू लागला. अनिर्वचनीय आनंद म्हणजे काय हे कळले. तो मिळण्याचा एकमात्र, एकमेव मार्ग हाच हेही प्रतीत झाले. भारतात योगमार्गाची परंपरा कायम चालत आली. परंतु, कालौघात योगामधील मूळ हेतूचा गाभा हरवला आणि केवळ योगासनांना महत्त्व आहे, असे दिसते. मूळ हेतू न विसरलेले तुरळक योगी काही एका उंचीवर पोहोचले. त्यांना काही विशेष गोष्टी कळल्या, दिसल्या. त्यांचे वर्णनही त्यांनी करून ठेवले आहे. तशा आधुनिक काळातल्या योग्यांपैकी एक आहेत, अरविंद- महाकवी अरविंद.



सृष्टीचक्रच नव्हे तर कालचक्रही वर्तुळाकार गतीने फिरते, हे आता सर्वमान्य झाले. जे जे अनादि, अनंत, अविनाशी ते ते संपत नाही आणि वर्तुळाकार गतीने फिरत राहते, हे वैज्ञानिक सत्य आहे. या सृष्टीचक्रात कलियुग संपल्यानंतर सत्ययुगाचे येणे हे अटळ आहे. परंतु, ते सत्ययुग काय आहे, कसे आहे, ते येते कसे, हे काही आपण जाणत नाही. या सत्ययुगाचे वर्णन सनातन ज्ञान मिळवणार्‍यांना कळते. तसेच ते अरविंदांसारख्या योग्याला साक्षात्कारातून कळले आहे. सविस्तर, मागच्या पुढच्या सार्‍या गोष्टींसह नाही, इतिहास-भूगोलासह नाही. परंतु, त्याची क्षणिक झलकसुद्धा या योग्याच्या दृष्टीला किती सुखावून गेली आहे. त्यांच्या बुद्धीने, दिव्य दृष्टीने त्याचे मर्म पकडले आहे. प्रतिभेने ते शब्दांत मांडले आहे. पुद्दुचेरीच्या अरविंदाश्रमाने १९९२मध्ये प्रकाशित केलेली एक छोटीशी पुस्तिका हाती आली. ‘ग्रीटिंग्ज अ‍ॅण्ड बेनेडिक्शन्स फॉर अ ब्युटिफूल फ्युचर’ हे त्या पुस्तिकेचे शीर्षक. ती पुस्तिका वाचल्यावर एक सुंदर साक्षात्कार झाल्यासारखे वाटले. त्यांची ही कविताच पाहा-
‘Then shall the embodied being Live as one’
मी केलेला तिचा स्वैर मराठी अनुवाद खाली देत आहे.
तेव्हा...
देहधारीच असेल तो, परंतु...
त्याच्यामधून व्यक्त होईल
त्या परमात्याची इच्छा
अन् त्याचाच विचार!
त्या मानवपुत्राचं शरीर म्हणजे
दिव्यतेचं ल्यायलेलं वस्त्र


तो मनुज
केवळ साधनच नसेल परमेश्वराचं
त्याच्या शक्तीचा तो भागीदार;
अनंतात उमटलेलं
एक टिंब - एक रेखा
अविनाशी तत्त्वाचं एक स्वरुप


त्याच्या स्वभाव-झर्‍याचा उगम
त्या अतिमानसामध्ये,
त्या सार्वकालीन सत्यामधून
आकार घेतील
त्याचे विचार आणि कर्में
ते अमर सत्य म्हणजेच त्याचा दीप
त्याचा मार्गदर्शकसुद्धा ते सत्यच...


ईश्वरीय सुसंगति
हाच असेल जगाचा नियम
पृथ्वीचे जगणे होईल आनंदाचे गाणे
सुंदरतेने नव्याने रचलेले

मानवाचे मनच नव्हे
शरीरही स्मरेल ईश्वरालाच
निसर्ग असेल गुप्त अशा
दिव्यतेचे प्रकट रूप,
आत्मरूपच चालवील मनुष्याला
घडवील त्याचे जीवननाट्य
अन्
या धरतीवरचे जगणे असेल
दिव्य, दिव्य... केवळ दिव्य!
ही आहे या महाकवी योगपुरुषाला दिसलेली सत्ययुगाची झलक! परंतु, कसं येणार आहे ते? ते स्थित्यंतर कसं असेल, याचं एक रेखाटन दिसेल खाली दिलेल्या दुसर्‍या कवितेत. त्या कवितेचा मराठी अनुवाद असा-
अंधार आणखीनच
गडद होत जातोय
घुसमटून टाकत धरतीचा श्वास
अन् माणसाच्या मनाची
मातीची पणती
ही एकच काय ती ज्योत हाताशी
जणू चोरट्याच्या हातातली
जेव्हा तो दबकत लपत छपत शिरतो घरात
कोणाच्याही नकळत

परंतु,
एक आवाज उठणार आहे
आजवर ऐकला न गेलेला
अन् आत्मा त्याची आज्ञा मानेल
मनाच्याही अंतर्मनातल्या खोल अशा कक्षात हळूच
जाऊन पोहोचेल
एक शक्ती, एक गोडवा,
एक उमदेपण आत येत जाईल
जीवनाची बंद द्वारं
उघडत जातील
अन्
सुंदरता जिंकील जगाला,
सारा विरोध मोडून काढीत
विस्मित कवीत
अचानकच प्रकटेल त्यातून
सत्याचा प्रकाश
परमेशाची हलकीशी चाहूल
चाखवीलच हृदयाला
परमानंदाची चव
अन् अनपेक्षितपणेच अगदी
हे जग होत जाईल दिव्य...


जे जे भौतिक ते ते उजळेल आतूनच आत्मप्रकाशानं
देहादेहातून ज्योत जन्मेला पवित्रतेची
रात्रीला जाग येईल
तारकांच्या गीतानं
दिवसांचे येणे अन् जाणे
पवित्र! यात्रेसारखे अन् सुखदायक
त्यावेळी आपली इच्छा म्हणजे
त्या अनंताच्या शक्तीचंच
एक रूप असेल
अन् विचार असतील
आध्यात्मिकतेच्या सूर्याचे किरण


काही थोडेच जन असतील
‘ते’ पाहणारे
जे जगाला
अजून कळलेलंच नाही
ईश्वराचं अस्तित्व वाढत जाईल मनामनात
तेव्हा, इकडे
विद्वत्जन बोलत राहतील,
बोलून बोलून झोपी जातील
कारण माणूस जात राहील अज्ञानातच
अगदी अंतिम क्षणापर्यंत
अन् जेव्हा ते सत्य
प्रत्यक्षात उतरेल
तेव्हाच बसेल त्यांचा विश्वास
परंतु, ते अतीव सुंदर सत्ययुग सुखासुखी थोडंच येणार आहे? त्यासाठी फार फार मोठ्या घडामोडी आधी घडायच्या आहेत. त्याची चुणूक माताजींच्या या लहानशा प्रार्थनेमधून दिसते. त्याचा मराठी अनुवाद असा-
योद्धे बनव आम्हाला, श्रेष्ठ योद्धे
जे बनण्याची आमची आकांक्षा आहे
भूतकाळात आम्ही सहन करण्याची पराकाष्ठा केली
आता आम्ही ते महायुद्ध लढू
यशस्वी होऊ, जेते ठरू
अन् तो भावी काल
खेचून आणू समीप
ज्यामध्ये नूतन विश्व
प्रकटणार आहे
त्याच्या स्वागतासाठी
सज्ज असू आम्ही
तेव्हा माताजींनी आपल्याला हलवून जागं केलं आहे. जाणवून दिलं आहे की, योद्धा बनायचं आहे. आता स्थूल नि सूक्ष्म दोन्ही प्रकारांनी. एक लढाई अंतर्बाह्य पवित्र बनण्याची; दुसरी प्रत्यक्षात अपवित्रतेला संपविण्याची.
या आजच्या अशांत, अस्वस्थ, खळबळ माजलेल्या जगात हे योगी मात्र पृथ्वीच्या सुंदर भविष्याचं रम्य चित्र पाहत आहेत. माताजी म्हणतात-
ते आनंदानं ओसंडणारं जग
उभं आहे आपल्या द्वाराशी
या पृथ्वीवर उतरण्यासाठी...
आपल्या हाकेची वाट पाहत...
पुढे लहानशा गद्य परिच्छेदात माताजींनी म्हटलं आहे, “श्री अरविंद या जगात आले, ते त्याच्या सुंदर भविष्यकाळाबद्दल सांगण्यासाठीच! ते भविष्य सत्यात उतरणारच आहे. ही काही केवळ आशा नव्हती व्यक्त केली त्यांनी. ते पूर्ण विश्वास देत आहेत, त्या भावी काळाचा, जो दिव्य आणि वैभवशाली असणार आहे.”

हे जग काही दुर्दैवी अपघातातून नाही जन्माला आलेलं. ते एक असं नवल आहे, जे स्वतःला व्यक्त करीत, प्रकटवीत जात असतं. जगाला कळणं आवश्यक आहे की, त्याचं भविष्य उज्ज्वल आहे, सुंदर आहे. श्री. अरविंद हे त्या जगाची खात्री देत आहेत. या लहानशा पुस्तिकेच्या प्रारंभी दिले आहे, बृहदारण्यक उपनिषदातील त्या सुप्रसिद्ध श्लोकाचे श्री अरविंदकृत भाषांतर-
असतो मा सद्गमय (१-८)
From the nonbeing
to the true being
From the darkness to the light
From death to Immortality
Om Peace! Peace! Peace!...
या चार ओळीत ऋषींनी कालचक्राचं मर्मच प्रकट केलं आहे जणू! मनुष्यजात उन्नत अवस्थेकडून पायर्‍या उतरत उतरत अवनतीकडे येते खरी. परंतु, तोच मनुष्य पुन्हा तपस्या करून उन्नत होतो, शांती मिळवतो. परंतु, ती केवळ शांती नाही. ती शक्ती, पवित्रता, सुख, प्रेम, ज्ञान, आनंद, सत्य यांनी परिपूर्ण अशी शांती आहे. आरपार सुंदरतेने मढवलेल्या अशा जगातली ती शांती आहे. सत्ययुग हाच स्वर्ग! इतकं सुंदर नि परिपूर्णतेची परिसीमा गाठलेले जग, तो ईश्वरनिर्मिती म्हणून त्याचे- त्या रचयित्याचं एक नाव ‘कवि’सुद्धा आहे!अन् तो मात्र आम्हाला सांगत असतो, ‘सत्ययुगाच्या निर्मितीत तुम्ही माझे सुपुत्र माझे सहकारी बना. मित्र व्हा, साथीदार व्हा. माझ्या खांद्याला खांदा लावून, हातात हात देऊनच तपस्या करा, पवित्र व्हा. मग या सुंदर विश्वाचे स्वामी तुम्हीच!”
- अनुराधा खोत
@@AUTHORINFO_V1@@