‘लालबाग’चा आदर्श घ्यावा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jul-2020   
Total Views |


lalbagcha raja_1 &nb



कोरोनाचे सावट आणखीन किती काळ या पृथ्वीतलावर कायम राहील, याचे उत्तर आजघडीला कोणाकडेच नाही. पण, आता निम्मे वर्ष रडतखडत सरल्यानंतर उरलेले सहा महिनेही असेच जातील का, याची चिंताही अनेकांना सतावते आहे. त्यात आता एकामागोमाग एक सणवार, उत्सवांचा काळही सुरु होईल. पण, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा उत्सवालाही काहीअंशी मुरड घालावीच लागेल. आषाढी एकादशी आणि वारीच्या निमित्ताने त्याचा प्रत्ययही आलाच. तेव्हा, समाजभान आणि आरोग्य सुरक्षा केंद्रस्थानी ठेवून, ‘लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा’ने घेतलेला ‘आरोग्योत्सवा’चा निर्णय अतिशय स्तुत्य म्हणावा लागेल. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी राज्यातूनच नव्हे, तर देशविदेशातून भाविक मोठ्या भक्तिभावाने मुंबईत दाखल होतात. पण, यंदा मात्र ८६ वर्षांच्या परंपरेला मंडळाने फाटा देत, मूर्तीची प्रतिष्ठापना करणार नसल्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यामुळे साहजिकच लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी अगदी पहिल्या दिवसापासून ते विसर्जन मिरवणुकीपर्यंत ओसंडून वाहणारा जनसागर यंदा मात्र दिसणार नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंडळाने मुंबईचा, मुंबईकरांच्या आरोग्याचा आणि एकूणच ‘कोरोना योद्ध्यां’च्या सुरक्षिततेच्या दृष्टीने घेतलेल्या या निर्णयामुळे निश्चितच कोरोनाचा फैलाव रोखण्यास मदत होईल आणि आरोग्य यंत्रणेवर अधिकचा ताण येणार नाही. या ११ दिवसांत रक्तदान शिबिरे, प्लाझ्मा दान शिबिरे मंडळाकडून राबविली जाणार आहेत. त्यामुळे निश्चितच त्याचा फायदा रुग्णांबरोबर गरजू रुग्णांनाही होईल. मुंबई आणि राज्यातील इतर गणेशोत्सव मंडळांनीही आता लालबागच्या राजाचा आदर्श घ्यावा. अशाच प्रकारे रक्तदान, प्लाझ्मा दान शिबिरांचे इतरही मंडळांना आपापल्या स्तरावर निश्चितच आयोजन करता येईल. भक्तांनीही विघ्नहर्त्याच्या भक्तीपोटी आणि माणुसकीच्या नात्याने रक्तदान करुन या उपक्रमात जरुर सहभागी व्हावे. गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता आहे. तो अवघ्या जगावर आलेले हे कोरोनाचे संकट हे दूर करेलच. पण, त्यासाठी गरज आहे, ती आपणही दिलेल्या सर्व नियमांचे कोटेकोरपणे पालन करायची. तेव्हा, आपली, आपल्या कुटुंबाची काळजी, समाजसुरक्षा हेच आपले कर्तव्य आणि हेच आपले गणरायाचरणी भक्तीसमर्पण ठरेल.

उत्सवाचे घरगुती रंग...


सण-उत्सव म्हटले की नातेवाईक, मित्रमंडळी वगैरे गोतावळा हा ओघाने आलाच. पण, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता उत्सवप्रिय भारतीयांनी मात्र अधिक काळजी घेण्याची गरज आहे. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास दहीहंडी, गणेशोत्सव आणि नवरात्री आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपले आहेत. आता तोपर्यंत कोरोना असो वा नसो, ‘दो गज की दूरी’ ही तरी ठेवावीच लागेल. त्या अनुषंगाने मोठमोठे दहीहंडी उत्सवही रद्द करण्यात आले असून स्थानिक पातळीवरही त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. गणेशोत्सव मंडळांनीही हळूहळू सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत मोठाल्या मूर्ती, भलेमोठे देखावे याला फाट देत साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहेच. पण, त्या साधेपणाच्या साजरीकरणात तसेच आरोग्य शिबिरांचे, इतर मदतीचे उपक्रम राबवितानाही कोरोनापासून बचावात्मक सर्व नियमांचे पालन करणे ही मंडळांची, कार्यकर्त्यांचीच जबाबादारी आहे. नवरात्रीच्या काळातही कोरोनाचा प्रादुर्भाव तोपर्यंत तुलनेने कमी झाला असला तरी दांडिया, गरबाची गडबड करुन चालणार नाही. पुढे दिवाळी असो वा नाताळ, यंदाचे वर्ष तरी फक्त आपल्या कुटुंबीयांपुरते साजरे करायची खुणगाठ बांधायलाच हवी. आता राहता राहिला प्रश्न घरगुती गणेशोत्सवाचा, तर आपल्या लाडक्या बाप्पाचे तुमच्या-आमच्या घरी प्रथापरंपरेनुसार आगमन होईलच. मग बाप्पा दीड दिवसांचा असो वा दहा दिवसांचा, त्यानिमित्ताने आपल्या घरी दरवर्षी पाहुण्यांची, मित्रमंडळींची, नातेवाईकांची उठबस असतेच. पण, ते करतानाही आपल्याला मास्क, सॅनिटायझर यांचा वापर कटाक्षाने करावाचा लागेल. तीर्थ आणि प्रसाद हातावर देण्यापूर्वी सॅनिटायझरच्या दोन थेंबांनी हात निर्जुंतक करावे लागतील. तसेच यानिमित्ताने उगाच घरात गाव गोळा होणार नाही, खासकरुन घरातील ज्येष्ठांना त्यामुळे त्रास होणार नाही, याची यंदा खबरदारी घ्यावीच लागेल. गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात, धुमधडाक्यात आणि सामूहिक स्वरुपातच साजरा व्हायला हवा, हा विचार यंदा बाजूला ठेवूया. या महामारीच्या काळात येणारे सर्व सण-उत्सव, सोहळे अगदी साधेपणाने घरच्या घरीच साजरे करुया. आपली, कुटुंबीयांची आरोग्याची काळजी घेत हे महामारीचे संकट दूर लवकर दूर होवो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करुया.

@@AUTHORINFO_V1@@