का करिसी ‘निंदा’ प्रभूची?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jul-2020
Total Views |


corona_1  H x W

चीनसारख्या दुर्बुद्धी राष्ट्राने आज सार्‍या जगावर कोरोनाचे भयावह संकट लादले आहे. ईश्वराने आधुनिक तंत्रज्ञानाचे भरलेले ताट तुमच्यासमोर ठेवले आणि तुम्ही मात्र त्यात विष कालवून ते इतरांना खाऊ घालता? ही त्या भगवंताच्या ज्ञान-विज्ञानाची निंदा नव्हे का?



मा निन्दत् य इमां मह्यं रातिं देवो ददौ मर्त्याय स्वधावान् ।
पाकायः गृत्सो अमृतो विचेता वैश्वानरो नृतमो यह्नो अग्निः ॥
(ऋग्वेद - ४/५/२)


अन्वयार्थ-


त्या महान परेश्वराची व त्याच्या सृष्टीतत्त्वांची (मा) नका करू (निन्दत) निंदा, हेटाळणी! (यः) ज्या (स्वधावान्) सर्वशक्तिसंपन्न, (अमृत) अविनाशी, (विचेताः) विशेष चैतन्यशील, (वैश्वानरः) सर्व नरांचा (मानवांचा) हितकारी, (नृतमः) सर्व नेत्यांमध्ये श्रेष्ठ, (यह्नः) बलधारक, (गृत्सः) उपदेशदायक, (अग्निः) स्वप्रकाशक, सर्वांची प्रगती साधणार्‍या अशा (देवः) देवाने (मह्यम्) माझ्यासारख्या (मर्त्या) मरणधर्मा मानवाकरिता (पाकाय) परिपक्वतेसाठी, परिपूर्णतेसाठी (इमाम्) या समग्र सृष्टीतील पदार्थांना, (रातिम्) दानाला (ददौ) प्रदान केले आहे.


विवेचन-


या समग्र ब्रह्मांडाचा निर्माता ईश्वर हा सर्वदृष्टीने परिपूर्ण आहे. ही सृष्टी रचण्यापूर्वी त्यांना सर्व जडचेतन पदार्थांची व्यवस्था करून ठेवली आहे. जेवढे प्राणी आहेत, त्यांना जन्माला येण्यापूर्वीच त्यांचे अन्न, औषध, जगण्याची साधने, ज्ञान-विज्ञान हे सर्व काही देऊन ठेवले आहे. हे सारे जग म्हणजे देवाने प्राणिमात्रांकरिता दिलेले अमूल्य दान होय. एक प्रकारचे ते वरदानच नव्हे काय? कारण तो सर्वांचा ‘वरद’ आहे. त्याच्या या सृष्टीमध्ये कोणतीही कमतरता नाही. सर्व गोष्टी अगदी पूर्णत्वाला प्राप्त झालेल्या आहेत. अशा या ईश्वरीय व्यवस्थेत कोणीही कमी-अधिक करण्याचा प्रयत्न करू नये. हो, मात्र त्यात सुधारणा घडवून आणताना त्याच्या मूलभूत स्वरुपाला बिघडवण्याचा प्रयत्न करू नये आणि जर काय आपल्या सोयी-सुविधांपोटी कोणी त्यात आम्ही बदल घडवित असू, तर प्रकृतीमाता आम्हाला कधीही माफ करणार नाही.


या मंत्रात सृष्टीनिर्मात्या परमेश्वराकरिता काही विशेषणे आलेली आहेत. तो ‘स्वधावान्’ आहे. म्हणजेच स्वतःच्या शक्तीला धारण करून इतरांनाही शक्ती देणारा आहे. तो ‘अमृत’ म्हणजे न मरणारा किंवा कधीही नष्ट होणारा नाही. तो ‘विचेता’ आहे. विशेषत्वाने ज्ञानविज्ञानाने ज्ञात होणारा, चेतनस्वरुपी आहे. ‘वैश्वानरः नृतम’ सर्व नरांचे, प्राणिमात्रांचे हित साधणारा, असा श्रेष्ठतम नेता होय. ‘यह्नः’ बलधारक असून ‘गृत्स’ म्हणजे वेळोवेळी सर्वांना या बुद्धीमध्ये उपदेशाचा प्रकाश पेरणारा आहे. ‘अग्नी’ म्हणजे सर्वांमध्ये अग्रणी नेता व दिव्य गुणसंपन्न ‘देव’ आहे. आपल्या प्रजेची सदैव काळजी वाहणारा तो माता-पिता होय. सर्वांना यथोचित सद्बुद्धी देणारा, ज्ञान वितरीत करणारा आचार्य होय!


अशा परमेश्वराची म्हणजेच आपल्या निर्मात्याची कदापि निंदा करू नका, असा या मंत्रातील मुख्य आशय! सामान्यपणे ही गोष्टी कदाचित हास्यास्पद वाटेल! कारण, तो इतका मोठा ब्रह्मांडाचा नायक आणि क्षुद्र अशा माणसाने त्याची निंदा करू नये, इतका छोटा उपदेश! वाचकांना आश्चर्यच वाटेल. पण, यात मोठे तथ्य दडलेले आहे! कारण, त्या महान ईश्वराची निंदा केल्यास काय तो नाराज होईल? की रागवेल? काय कुणावर कोपेल? इतका तो लहान-सहान थोडाच आहे. ‘मा निन्दत।’ या मंत्रादेशाचा भाव असा की त्या सर्वश्रेष्ठ ईश्वराने निर्मिलेल्या सृष्टीतत्त्वांची. निंदा म्हणजेच अपमान, तिरस्कार वा अवमान कोणीही करता नये. आपल्या वर्तनातून परमेश्वराच्या दानरुपी निसर्गाचे अवमूल्यन होता नये. वरदान स्वरुपाने मिळालेल्या प्रकृतीचा दुरुपयोग होता कामा नये...!


आजचा मानव आपल्या स्वार्थ व सुखाच्या हव्यासापोटी भगवंताच्या त्या प्रकृतीला नष्ट करतोय. मोठ्या प्रमाणात धन मिळविण्याकरिता संकरित बी-बियाणे निर्माण करून जमिनीला एक प्रकारे विषांची त्याची पेरणी करतोच. ती उगवल्यानंतर त्यावर विषयुक्त रासायनिक औषधांची फवारणी करतो. ही परमेश्वराची निंदा नव्हे का? त्यातही अशा मार्गाने प्रचंड प्रमाणात धान्य मिळविल्यानंतर त्याद्वारे प्राप्त धनाचे दान न करता किंवा त्यांचा धार्मिक, राष्ट्रीय इ. परोपकारी कार्यासाठी सदुपयोग न करणे म्हणजे त्या ईश्वराची निंदा नव्हे का? अथवा मोठ्या प्रमाणात विभिन्न कार्यक्रमांतून स्वतःच्या श्रीमंतीचे प्रदर्शन करीत केली जाणारी पैशाची उधळणारी, अन्नाची नासाडी... हे सर्व प्रकार म्हणजे त्या परमेश्वराची निंदा नव्हे का? रस्ते, महामार्ग बनविण्याच्या किंवा कारखाने उभे करण्याच्या प्रयत्नांतून प्रचंड प्रमाणात होणारी जंगलतोड, त्यातून प्रवाहित होणारा दूषित वायू यामुळे पर्यावरणावर होणारे हल्ले हे काय त्या परमेश्वरीय सृष्टीचा अवमान नव्हे का?


ईश्वरीय दिव्य वेदज्ञान किंवा वैदिक (आर्ष) ग्रंथ त्यागून अनार्ष ग्रंथांची निर्मिती आणि त्याद्वारे अवैदिक, असत्य, मिथ्या, धार्मिक व आध्यात्मिक विचारांना नाकारणे! खरा ईश्वर सोडून अवतार कल्पनेतून जड मूर्तीची स्थापना वगैरे प्रकारे म्हणजे ईश्वरीय सत्यव्यवस्थेचा अवमान नव्हे काय? एकूणच सत्याचा अंगीकार म्हणजे ईश्वराचा सन्मान व असत्याचा अवलंब म्हणजे त्याचा अपमान होय, हे विसरता नये. विचारांना नाकारणे, मूळ स्वरुपातील ईश्वरीय तत्त्वज्ञानाला सोडून मनुष्यकृत अपूर्ण मिथ्या विचारसरणीचा अंगीकार करणे म्हणजे त्या सनातन व्यवस्थेची निंदाच आहे. भगवंताची वेदवाणी ही सर्वदृष्टीने परिपूर्ण आहे. ‘देवस्य पश्य काव्यं न ममार न जीर्यति।’ विश्वदेवाचे काव्य म्हणजेच हा निसर्ग व त्यात दडलेले ज्ञान! ते कधीही नाहीसे होणार नाही की, जीर्णशीर्ण होणार नाही. ज्याने अगदी सूक्ष्मातिसूक्ष्म जड व चेतन तत्त्वांपासून ते स्थूलातिस्थूल अशा मोठ्या पदार्थांपर्यंत असंख्य वस्तूसमूहाची निर्मिती केली आणि तीदेखील पूर्णांशाने ज्ञानयुक्त! तो खर्‍या अर्थाने एक वैज्ञानिक कवी आणि सर्वज्ञ असा विश्वकर्मा आहे. त्याने निर्मिलेले एकही तत्त्व चंद्राची स्वारी करणार्‍या आजच्या माणसाला निर्मिता आले नाही. मग कशाला इतका गर्व आणि ताठपणा?


आजच्या विज्ञानाने सर्व काही बनविले... सुखांची सर्व साधने व भौतिक पदार्थ इतक्या मोठ्या प्रमाणात तयार केली. पण, दुर्दैवाने त्यांचा वापर करण्याची सद्बुद्धी मात्र तो हरवून बसला आहे. परिणामी, चीनसारख्या दुर्बुद्धी राष्ट्राने आज सार्‍या जगावर कोरोनाचे भयावह संकट लादले आहे. ईश्वराने आधुनिक तंत्रज्ञानाचे भरलेले ताट तुमच्यासमोर ठेवले आणि तुम्ही मात्र त्यात विष कालवून ते इतरांना खाऊ घालता? ही त्या भगवंताच्या ज्ञान-विज्ञानाची निंदा नव्हे का? पण, तो ‘सर्वज्ञ’ असल्याने सर्वांच्या कुकृत्यांना जाणतोय. त्याची कर्मफलव्यवस्था खूपच महान आहे. तो अपराध्यांना दंडित केल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच कोरोनाने सर्वात अगोदर चीनलाच हैराण केले होते. नंतर जगात त्याचा प्रसार होत गेला.


मंत्रोक्त ‘मा निन्दत’ या उपदेशामागील त्याची दुसरी बाजू म्हणजे ‘कृतज्ञाः भवन्तु।’ त्या परमेश्वराविषयी कृतज्ञता बाळगा! आम्हा सर्वांचा तो जन्मदाता, पालक, पोषक व संहारक आहे. आमच्या सर्व कामना तो पूर्णत्वास नेणारा आहे. संत तुकारामांच्या शब्दातच सांगावेसे झाल्यास- ‘सत्य संकल्पांचा दाता नारायण ॥ सर्व करीं पूर्ण मनोरथ॥’ अशा ईश्वराच्या कृपादानामुळे आमची जन्मोजन्मीची अनंत यात्रा अगदी सुखरूपपणे सुरू आहे. मग आम्ही त्यांच्या प्रती कृतज्ञता का बाळगू नये? याचसाठी त्याचे नित्य स्मरण, ध्यान, भक्ती, उपासना व्हावयास हवे. म्हणूनच तर संध्या (सम्यक) व देवपूजा (निसर्गातील पंचमहाभूते व इतर दिव्य शक्तींचा) सन्मान, नियमांचे पालन आदी गोष्टी व्हावयास हव्यात. हे शक्य नसेल तर किमान कृतींतून सृष्टीनियमांचे उल्लंघन किंवा अनैसर्गिक वागणे तरी नको! याच कारणे तुकोबा म्हणतात-


कां रे नाठवीसी कुपाळू देवासी ।
पोसितो जनासी एकला तो ॥
बाळा दुधा कोण करिते उत्पत्ती ।
वाढवी श्रीपती सवें दोन्ही ॥
फुटति तरुवर उष्ण-काळ-मासीं ।
जीवन तयासी कोण घाली ॥
तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर ।
त्याचे निरंतर ध्यान करी ॥
 

- प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य

@@AUTHORINFO_V1@@