सिंधचा सिंह...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jul-2020
Total Views |


Atta Muhammad Bhanbhro_1&

विकसित चेतनेची अभिव्यक्ती पाकिस्तानची केवळ एक वसाहत ठरलेल्या सिंधमध्ये सातत्याने पाहायला मिळते. सिंधमधील याच चेतनेचा एक महत्त्वाचा आवाज होता, अत्ता मुहम्मद भांभरो आणि त्यांचेच यंदाच्या जूनच्या पहिल्या आठवड्यात निधन झाले. त्यांच्याविषयी...



१९४७ साली इस्लामानुयायांसाठी एका स्वतंत्र राष्ट्राच्या किंवा होमलॅण्डच्या रुपात पाकिस्तानचा जन्म झाला. तथापि, पाकिस्ताननिर्मितीची बीजे १८५७च्या स्वातंत्र्यसमरानंतर नाममात्र केंद्रीय सत्तेच्या रुपात अस्तित्वात असलेल्या मुघल वंशाच्या उच्चाटनातही होती. कारण, मुघलांना सत्ताच्युत करण्यात आल्याने भारतीय मुस्लिमांमध्ये आपण आता भारताचे सत्ताधीश नसून ब्रिटिश निकषांवर आधारित लोकशाहीकडे घेऊन जाणार्‍या व्यवस्थेमुळे ते अधिकच निराश झाले व त्यांच्यात हीनत्वाची भावना तयार झाली. लोकशाही व्यवस्थेत बहुमतावर सत्ताधारी ठरत असल्याने मुसलमान त्याला ‘नंबर गेम’ मानत होते, ज्यात ते कधीही विजयी होऊ शकत नव्हते. परिणामी, भारतात पुन्हा एकदा इस्लामी विचारांवर आधारित शासनप्रणाली आणण्याचे त्यांचे स्वप्न दिवास्वप्नच राहिले असते. अशा निराश व कपटपणातूनच मुस्लीम नेतृत्वाला एका वेगळ्या इस्लामी देशाच्या अस्तित्वासाठी षड्यंत्र रचण्यासाठी चिथावण्यात आले. परंतु, इस्लाम किंवा इस्लामी धर्मांधतेच्या एकमेव आधाराने मुस्लीम जनमताचे ध्रुवीकरण सुलभ होत असले तरी या एकांगी आधारावर एका राष्ट्राच्या निर्मितीमागे दूरदृष्टीचा संपूर्ण अभाव होता आणि आजच्या पाकिस्तानकडे पाहिल्यावर त्याची खात्रीही पटते.
 

पाकिस्तानची निर्मिती झाली तेव्हापासून तिथे बंगाली, सिंधी, बलुच, पंजाबी, पख्तुन यांसारख्या अनेक राष्ट्रीय, प्रादेशिक व जातीय ओळखी अस्तित्वात होत्या आणि त्या इस्लामच्या नावावर आपला समृद्ध ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा गमवायला बिल्कूल तयार नव्हत्या. पुढे याच स्वतंत्र ओळखीतून १९७१ साली बांगलादेशाची निर्मिती झाली. भारताच्या फाळणीपासूनच ‘सिंध’ प्रांत अशा पृथक ओळखीच्या व अस्तित्वाच्या चेतनेचे एक प्रमुख केंद्र राहिले. सिंध प्रांताला प्राचीन भारतीय संस्कृतीचा पाळणा म्हणावे लागेल. कारण, हजारो वर्षांच्या कालक्रमात विकसित झालेल्या महान भारतीय संस्कृतीचा उत्तराधिकारी सिंधच होता आणि याच विकसित चेतनेची अभिव्यक्ती पाकिस्तानची केवळ एक वसाहत ठरलेल्या सिंधमध्ये सातत्याने पाहायला मिळते. सिंधमधील याच चेतनेचा एक महत्त्वाचा आवाज होता, अत्ता मुहम्मद भांभरो आणि त्यांचेच यंदाच्या जूनच्या पहिल्या आठवड्यात निधन झाले. एक प्रख्यात वकील, लेखक, इतिहासकार, पुरातत्त्वविद आणि पत्रकार तथा सिंधुदेशाचे महान स्वातंत्र्यसैनिक म्हणून भांभरो यांना ओळखले जाते. उल्लेखनीय म्हणजे, भांभरो यांना पाकिस्तानच्या ‘सितारा-ए-इम्तियाज’ या तिसर्‍या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, मात्र, त्यांनी सिंधुदेशाचे स्वातंत्र्य या आपल्या महान उद्दिष्टध्येयासाठी हा पुरस्कारही नाकारला. बुद्धीजीवी असलेले भांभरो ‘आयएसआय’ आणि पाकिस्तान सरकारच्या हातून सिंधी लोकांवर केले जाणारे अन्याय-अत्याचार व सिंधी लोकांना होणारा त्रास, त्यांची दयनीय अवस्था पाहून दुःखी झाले. तसेच पाकिस्तान सरकारच्या दमनतंत्राविरोधात व लष्कराच्या नृशंसेविरोधात भांभरो यांनी सातत्याने आवाज बुलंद केला. परिणामी, पाकिस्तानच्या तावडीतून सिंध मुक्त करणे, हाच त्यांच्या आयुष्याचा सर्वोच्च उद्देश झाला.

 
भांभरो यांचे मृत्यूपत्र


भांभरो यांनी विविध विषयांवर १०० पेक्षा अधिक पुस्तके लिहिली किंवा अनुवादित केली असून जागतिक स्तरावर त्यांचे कौतुकही झाले. परंतु, भांभरो यांच्या मृत्यूनंतर त्यांचे मृत्युपत्र चर्चेत आले आणि त्यातल्या तथ्यांमुळे पाकिस्तानच्या अस्तित्वावरच सवाल उपस्थित झाला. भांभरो यांचे मृत्युपत्र गेल्या सात दशकांपासून सिंधची जनता भोगत असलेल्या अन्याय-अत्याचाराचे यथार्थ वर्णन करणारा दस्तावेज असल्याचे, ते वाचल्यानंतर स्पष्ट होते. एका इस्लामी राष्ट्रामध्ये इस्लामच्याच अनुयायांवर इस्लामच्याच नावाखाली केल्या जाणार्‍या अत्याचार आणि शोषणाचा प्रतिकार ठळकपणे दिसून येतो. “इस्लाम चुकीचा धर्म असून मी या धर्माला मानत नाही आणि माझ्या मृत्यूनंतर कोणत्याही प्रकारचे इस्लामी विधी करु नये,” असे त्यांनी स्वतः मुस्लीम असूनही अगदी सुस्पष्ट शब्दांत आपल्या मृत्युपत्रात लिहिले आहे. मृत्युपत्रात भांभरो यांनी पुढे लिहिले की, “माझ्या शरीरावर दहन संस्कार केला जावा.” मात्र, इथे लक्षात घेतले पाहिजे की, इस्लाममध्ये मृत्यूनंतर दफनविधी केला जातो आणि भांभरो यांनी दहनसंस्काराची इस्लामी विधीच्या विपरित सूचना केली आहे. भांभरो यांच्या मृत्युपत्राचे वैशिष्ट्य म्हणजे, “माझ्या मृत्यूनंतर मी धरणीमातेचे चुंबन घेऊ इच्छितो,” असे त्यांनी म्हटले आणि यातूनच त्यांचे मातृभूमी सिंधवरील प्रदीर्घकाळाच्या प्रेमाचे चित्र दिसते. माझ्या कबरीवर लावण्यात येणार्‍या शिलेवर, ‘इथे सिंधमातेच्या एका गुलामावर अंत्यसंस्कार करण्यात आले,’ असे स्पष्ट लिहावे,” असे निर्देशही त्यांनी आपल्या मृत्युपत्रात दिले. सोबतच “माझ्या कबरीच्या वरच्या भागाला साखळदंडांनी जखडून ठेवा आणि जोपर्यंत माझी प्रिय मातृभूमी पाकिस्तानच्या कब्जातून मुक्त होत नाही, तोपर्यंत ते साखळदंड जसेच्या तसे ठेवा,” अशी सूचनाही त्यांनी आपल्या मृत्युपत्रात केली.


भांभरो आणि इस्लाम!


भांभरो यांनी पाकिस्तानमध्ये एका तार्किक आणि वैज्ञानिक विचाराला प्रोत्साहन देण्याचे काम सातत्याने केले. १४०० वर्षांपूर्वी इस्लामच्या जन्माआधी संपूर्ण जग अंधारात होते आणि ज्ञान, कला, संस्कृतीचा अभाव होता, असा इस्लामचा मूळ सिद्धांत होता. मात्र, भांभरो यांना हा सिद्धांत अजिबात मान्य नव्हता. भांभरो यांच्याकडे सिंध आणि सिंधू संस्कृतीवरील अनेक दुर्मीळ पुस्तकांचा विशाल संग्रह होता. एक सुशिक्षित बुद्धिजीवी म्हणून ते विद्यार्थी आणि लेखकांमध्ये सिंधी संस्कृती व परंपरेच्या विश्वकोशाच्या रुपात विख्यात होते. मोहेंजोदडोतील लिपीसंदर्भातील अध्ययन-अभ्यास हे त्यांचे प्रमुख कार्य होते आणि २०१२ साली सिंध विद्यापीठाच्या जमशोरोच्या पुरातत्त्व विभागाने ‘इंडस स्क्रिप्ट’ शीर्षकाने हे पुस्तक प्रकाशितदेखील केले. तथापि, पाकिस्तानसारख्या धर्मांध देशात भांभरो यांचे बौद्धिक आणि तार्किक वर्तन सामावण्यासारखे नव्हते आणि याचमुळे ते तेथील राजकीय व लष्करी नेतृत्वाच्या निशाण्यावर येत असत. यातूनच जुलै २०१५ मध्ये ‘जिये सिंध मुत्ताहिदा महाज’चे कार्यकर्ते व पाकिस्तानमध्ये सिंधच्या अधिकारांसाठी संघर्ष करणारे आणि भांभरो यांचे पुत्र राजा दाहिर यांचे ‘आयएसआय’ने अपहरण केले व नंतर त्यांची हत्याही केली. इथे लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, भांभरो यांनी आपल्या पुत्राचे नाव ‘राजा दाहिर’ असे ठेवले होते. आपल्याला माहितीच असेल की, भारतात येणार्‍या इस्लामी आक्रमणाचा जोरदार प्रतिकार करणारा तत्कालीन लढवय्या वीर म्हणजेच राजा दाहिर! मात्र, ज्या देशात मोहम्मद बिन कासिमला नायक मानले जाते, तिथे याच राजा दाहिरचे नाव आपल्या मुलाला देऊन इतिहासाचे पुनरुज्जीवन करणे ईशनिंदेच्या समकक्ष असाच अपराध! त्याचीच परिणती राजा दाहिर या भांभरो यांच्या हत्येत झाली. पाकिस्तान ही विविध राष्ट्रीय ओळखींची ठिगळं लावलेली अशी गोधडी आहे, जिथे इस्लामच्या नावावर त्या त्या ओळखीच्या स्वतंत्र अभिव्यक्तीला सातत्याने दडपले जाते. वास्तविक, आज संपूर्ण पाकिस्तान व तिथल्या आर्थिक, राजकीय व लष्करी क्षेत्रातही पंजाबी व्यक्तींनी कब्जा केलेला आहे. उल्लेखनीय म्हणजे, आपल्या कुत्सित राजकारणापायी असा पाकिस्तान अन्य प्रांतातील इस्लामानुयायांनाही लक्ष्य करतो. तसेच पाकिस्तानचे शासक आपल्या प्रत्येक दडपशाही धोरणाला इस्लामच्या नावावर योग्य ठरवत आले आहेत. म्हणूनच भांभरो यांनी इस्लामचा विरोध केला, यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही.


स्वतंत्र राष्ट्र म्हणून अस्तित्वात आल्यानंतर पाकिस्तानच्या सुरुवातीच्या दिवसांत ‘नॉर्थवेस्ट फ्रंटियर प्रोव्हिन्स’चे पख्तुनी नेते खान अब्दुल गफार खान हे होते आणि त्यांना ‘डॉ. खान साहेब’ या नावाने ओळखले जाई. त्यावेळी, मी सहा हजार वर्षांपासून पख्तुन आहे. १ हजार, ४०० वर्षांपासून मुसलमान आणि आता नुकताच पाकिस्तानी झाल्याचे ते म्हणाले होते. म्हणजेच त्यांना आपली नेमकी ओळख काय व ती किती हजार वर्षांपासून आहे, हे यातून दाखवून द्यायचे होते. तसेच पाकिस्तानच्या विभिन्न वर्गात अस्तित्वात असलेल्या वेगवेगळ्या ओळखींमधला संघर्षही यातून दिसतो आणि आता तर तो सातत्याने वाढत आहे. सोबतच या संघर्षाच्या स्थितीमध्ये यातून सामान्य व्यक्ती काय निवडते व त्याने काय निवडले, हेदेखील अभिव्यक्त होते. म्हणजे तो स्वतःला सर्वप्रथम ‘पाकिस्तानी’ म्हणवून घेत नाही, तर तो जो हजारो वर्षांपासून आहे तोच मी आजही आहे आणि नंतर पाकिस्तानी, असे यातून सांगत असल्याचे दिसते. डॉ. खान साहेबांसाठी सामान्यांची अशी निवड करण्याची क्षमता स्वातंत्र्याच्या सुरुवातीच्या दिवसांत उपयुक्त होती आणि आजच्या काळात अत्ता मुहम्मद भांभरो यांच्यासाठीही. १९७१ साली बांगलादेशची निर्मिती या स्वतंत्र ओळखीच्या उद्दिष्टपूर्ततेच्या मार्गातील पहिले यश होते आणि हा मार्ग यापुढेही खुला आहे. आज खैबर पख्तुनख्वा, बलुचिस्तान आणि सिंध अशा प्रत्येक प्रांतात स्वतंत्र राष्ट्रनिर्मितीची आंदोलने प्रबळ होताना दिसत आहेत आणि सातत्याने दुबळा होत चाललेला पाकिस्तान या राष्ट्रीय आकांक्षांचे किती काळ दमन करु शकेल, हाच एकमेव प्रश्न आहे.

@@AUTHORINFO_V1@@