मुंबई : मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमधून मृतदेह गायब होण्याचे प्रकार घडू लागल्याने राज्य शासन आणि पालिका प्रशासनाच्या बेफिकिरीमुळे नातेवाईक एकीकडे चीड व्यक्त करत असतानाच चिंताही व्यक्त करत आहेत. माजी खासदार भाजपचे उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी आठवडाभरात गायब झालेल्या सहा मृतदेहांची यादी जाहीर करून संपूर्ण चौकशीची मागणी केली आहे.
एकीकडे शासन आणि महापालिका प्रशासन मोठमोठे आकडे जाहीर करून कोरोनाला थोपविण्यात आरोग्ययंत्रणा यशस्वी झाल्याचे सांगत असताना, मुंबईत माणसांचे मृतदेह प्राण्यासारखे बेवारस फेकण्याचे प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. तर काही मृतदेह गायब झाल्याचे, नातेवाईक असतानाही काही मृतदेहावर बेवारस म्हणून अंत्यसंस्कार केल्याचे उघड झाले आहे. किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात माणसाच्या मृतदेहाची कशी विटंबना केली जात आहे हे दाखवून दिले आहे. मुंबईतील रुग्णालयांमध्ये कोरोनाग्रस्त मोठ्या संख्येने दाखल होत असल्याने त्यांची दखल ठेवताना आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडत आहे. एकूणच ताळमेळच बिघडल्याने रुग्णालयातन मृतदेहच गायब होत असल्याचे प्रकार घडत आहे. किरीट सोमय्या यांनी तर रुग्णालयातून गायब झालेल्या सहा मृतदेहांची यादीच जाहीर केली आहे. शिवाय त्यांनी आरोग्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना पत्र लिहून रुग्णांच्या नातेवाईकांच्या मनःस्थितीची विचार करण्याची विनंती करत, `हे काय चालले आहे,` असा प्रश्नही केला आहे.
कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण येत असून त्यातून अनेक धक्कादायक प्रकार घडत आहेत. गेल्या काही दिवसांत मुंबईतील वेगवेगळ्या रुग्णालयांतून करोनाबाधितांचे सहा मृतदेह गायब झाले आहेत. किरीट सोमय्या यांनी ट्विटद्वारे गायब झालेल्या मृतदेहांची नावासह माहिती दिली आहे. शिवाय मृतदेह गायब करणाऱ्या रुग्णालयांचीही नावे दिली आहेत. त्या नावांसह त्यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे व गृहमंत्री अनिल देशमुख यांना लिहिलेल्या पत्रात `ज्यांचे मृतदेह रुग्णालयातून गायब होत आहेत, त्यांच्या कुटुंबीयांच्या मन:स्थितीचा विचार करून सरकारने योग्य ती कारवाई करावी,` अशी मागणीही केली आहे.
गायब झालेले मृतदेह
केईएम (परळ) : सुधाकर खाडे
राजावाडी (घाटकोपर) : मेहराज शेख
शताब्दी (कांदिवली) : विठ्ठल मोरे
नायर (मुंबई सेंट्रल) : मधुकर पवार
ट्रॉमा (जोगेश्वरी) : राकेश शर्मा
लोकमान्य टिळक (सायन) : ग्यांतीदेवी विश्वकर्मा
केईएमचा भोंगळ कारभार
केईएम रुग्णालयातून सुधाकर खाडे यांचा मृतदेह अनेक दिवस गायब होता. मात्र तेरा दिवसांनंतर तो मृतदेह केईएमच्या शवागारातच सापडला. नातेवाईकांनी भाईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. दुसऱ्या व्यक्तीचा मृतदेह ताब्यात देत त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न रुग्णालय प्रशासनाने केला. मात्र त्यांनी त्यास नकार दिला. त्यानंतर तेराव्या दिवशी खाडे यांचा मृतदेह शवागारात मिळाला. मृतदेह ट्रेसेबल नव्हता, असे कारण त्यावेळी केईएमच्या अधिष्ठात्यांनी दिले होते. मात्र केईएममध्ये भोंगळ कारभार हे त्याचे खरे कारण आहे. मर्च्युरी विभागाची नोंद ठेवणारा कर्मचारीच तेथे नियुक्त नव्हता. त्यामुळे मृतदेहांची नोंद होत नव्हती. शिवाय तेथील १३ पैकी १० कर्मचारी कोरोनाबाधित झाले होते. खाडे यांचा मृतदेह न सापडण्याचे हे खरे कारण होते. कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनात मर्च्युरी विभागात नोंदणी साहाय्यक नियुक्तीचा मागणी केली होती.
शताब्दीला शंभर वाटा ?
रुग्णालयात मृतदेह कुरतडणे, त्यांचे लचके तोडणे असले अंगावर शहारे आणणारे किळसवाणे प्रकार घडतात. पण कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयातून तर मृतदेह बोरिवली रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर आणून टाकण्यात आला होता. रुग्णालयाला सुरक्षा व्यवस्था असताना एक मृतदेह बाहेर नेला जातो, तरीही सुरक्षा व्यवस्थेला पत्ता लागू नये याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे. रुग्णालय प्रशासनाकडूनही नातेवाईकांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यास नकार देण्यात आला. शताब्दी रुग्णालयाला मुख्य प्रवेशद्वाराशिवाय इतर चोरवाटा आहेत का, अशीही शंका व्यक्त करण्यात येत आहे.
सायनबाबत संशय
शीव येथील सायन (लोकमान्य टिळक) रुग्णालयाबाबत संशय घेण्यासारखेच घडले आहे. येथील एका रुग्णाचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नातेवाईक आले होते. मात्र त्याच्या ताब्यात देण्याआधीच बेवारस म्हणून त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकार तर फारच भयानक आहे.
राजावाडीत चौकशी समिती
घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयातील बेपत्ता मृतदेह प्रकरणी पालिकेने घेतली गंभीर दखल घेतली असून प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप आंग्रे यांची एक सदस्यीय चौकशी समिती नियुक्ती केली आहे. समितीला येत्या ५ दिवसात याबाबतचा अहवाल देण्याचे आदेश उपनगरीय रुग्णालयांचे प्रमुख वैद्यकीय अधीक्षक प्रदीप जाधव यांनी दिले आले आहेत. यात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती डॉ. जाधव यांनी दिली.
आवरा ही अनागोंदी
शताब्दी रुग्णालयात दाखल होणे म्हणजे रुग्णाची शंभरी भरली असे जनतेने समजावे का? बेपत्ता रुग्णाचा मृतदेह रेल्वे स्टेशनवर सापडणे म्हणजे रुग्णालयाची बेफिकीरीच आहे. राजावाडी प्रकरणी ते म्हणाले की, जिवंत रुग्णही बेवारस आणि मृत्यूनंतर त्याचा मृतदेहही बेवारस. मुंबई महानगरातला हा प्रचंड धक्कादायक प्रकार आहे. वृद्ध रुग्ण महिला गायब होते. कोणाचा कोणाशी ताळमेळ राहिलेला नाही. खबरदारी तुमची, जबाबदारीही तुमचीच.
-अतुल भातखळकर, आमदार, भाजप