कर्तबगार उन्मुक्त चंद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jun-2020
Total Views |

chand _1  H x W



२०१२साली भारताला ‘अंडर-१९’ क्रिकेट स्पर्धेचा विश्वचषक जिंकून देणारा तत्कालीन कर्णधार उन्मुक्त चंद यांच्या आयुष्याची कहाणी सांगणारा हा लेख...



क्रिकेट हा भारतीयांचा सर्वाधिक पसंतीचा खेळ. हा देशाचा राष्ट्रीय खेळ नसला तरी क्रिकेटच भारतीयांच्या अंगात अगदी भिनलेला... कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर क्रिकेटविश्व सध्याच्या घडीला थंडावले असले, तरी नागरिकांनी मात्र क्रिकेटचे सामने पाहणे काही सोडलेले नाही. भूतकाळात रंगतदार ठरलेले आणि सदैव सर्वांच्या स्मरणी असणारे सामने पाहत क्रिकेटप्रेमी आपली हौस भागवत आहेत. आजही टीव्हीवर हे जुने सामने पाहताना भारतीय खेळाडूंनी रचलेल्या विक्रमांच्या आठवणी ताज्या होतात. विक्रमी खेळी करून आपल्या देशाला विजय मिळवून देणार्‍या या खेळाडूंचे कौतुक करावे तितके कमीच. भारतीय संघातील खेळाडूंनी आजवर अशा विविध विक्रमांची नोंद आपल्या नावावर केली आहे. त्यांचे विक्रम आजपर्यंत कुणालाही मोडता आलेले नाहीत. भारतीय संघातील या खेळाडूंचे अनुकरण करत काही युवा आणि कनिष्ठ खेळाडूंनीही आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यांच्या या खुमासदार खेळी आजही सर्वांच्या स्मरणात आहेत. प्रतिस्पर्ध्यांच्या तोंडातील विजयाचा घास हिसकावून घेत भारताला विश्वचषक जिंकून देण्याची किमया या खेळाडूंनी साधली. त्यामुळे भारतीय संघातील खेळाडूंसोबतच कनिष्ठ आणि युवा कर्तबगार खेळाडूही तितकेच कौतुकास पात्र आहेत. भारताला विजयश्री मिळवून देणारे हे खेळाडू आता आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली कारकिर्द घडविण्यास सज्ज असून सध्या संघात संधी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. २०१२ साली भारताला ‘अंडर-१९’ विश्वषक स्पर्धेत अजिंक्यपद मिळवून देणारा तत्कालीन संघाचा कर्णधार उन्मुक्त चंद हा त्यांपैकीच एक, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.




उन्मुक्त चंद याच्या अष्टपैलू कामगिरीमुळेच भारताला ऑस्ट्रेलियासारख्य तगड्या संघाला त्यांच्याच धर्तीवर धूळ चारत विश्वचषकाला गवसणी घालता आली. उन्मुक्तची ती ११४ धावांची खेळी आजही सर्वांच्या स्मरणात आहे. आपल्या दमदार खेळीच्या जोरावर २०१२ साली भारताला ‘अंडर-१९’ स्पर्धेचा विश्वचषक मिळवून देणारा उन्मुक्त चंद सध्या भारताच्या आंतरराष्ट्रीय संघात स्थान मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी तो कसून सरावही करत आहे. इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून भारतीय संघात स्थान मिळविण्याचे स्वप्न उन्मुक्तने आपल्या उराशी बाळगले असून यासाठी तो सध्या घाम गाळत आहे. यासाठी सर्व स्तरांतून त्याला शुभेच्छा देण्यात आहेत. संपूर्ण देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असला तरी येथपर्यंत पोहोचण्यासाठी उन्मुक्तने आपल्या जीवनात जीवापाड संघर्ष केला.




उन्मुक्तचा जन्म २३ मार्च, १९९३ साली दिल्लीतील एका सर्वसामान्य कुटुंबात झाला. उन्मुक्तच्या घरातील कोणाचाही क्रिकेटशी दुरान्वये संबंध नव्हता. त्याचे वडील एका खासगी कंपनीमध्ये नोकरी करायचे. चंद कुटुंब हे मूळचे उत्तराखंडचे. वडिलांची नोकरी दिल्लीत असल्याने चंद कुटुंब हे दिल्लीत स्थलांतरित झाले. उन्मुक्तला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड. त्याच्या याच खेळाच्या आवडीमुळे तो आज एक उत्तम क्रिकेटपटू म्हणून नावारुपास आला. उन्मुक्त वास्तव्यास असणार्‍या कॉलनीतील अनेक मुले क्रिकेटच्या प्रशिक्षणासाठी क्लबमध्ये जात असे. इतरांप्रमाणे आपल्यालाही क्लबमधील क्रिकेटचे प्रशिक्षण मिळावे, असे उन्मुक्तला वाटायचे. पण, घरातील परिस्थिती अभावी ते शक्य होत नव्हते. क्लबमधील प्रशिक्षण मिळत नसले तरी उन्मुक्त खचला नाही. त्याने आपला सराव स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर तसाच सुरु ठेवला. १४ वर्षांच्या जिल्हास्तरीय सामन्यादरम्यान उन्मुक्तने उत्कृष्ट खेळी करत सर्वांवर आपली छाप पाडली.




क्लबमधील प्रशिक्षण घेणार्‍या मुलांनाही जमले नाही ते उन्मुक्तने करून दाखवले. हे पाहून अनेक प्रशिक्षकांनी उन्मुक्तला आपल्या क्लबमधून खेळण्याची ऑफर दिली. उन्मुक्तला याचा फार आनंद झाला. क्लबमधील क्रिकेटचे प्रशिक्षण मिळणार असले तरी खेळण्यासाठी लागणारे ’किट’ त्याच्याकडे उपलब्ध नव्हते. यासाठी कुटुंबीयांना पैशांची जुळवाजुळव करायला सुरुवात केली. अनेक बाबींमध्ये आर्थिक पदरमोड केल्यानंतर उन्मुक्तला खेळण्यासाठी ‘किट’ उपलब्ध झाली. यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. क्लबमधील क्रिकेटचे प्रशिक्षण मिळताच उन्मुक्त आणखीन मेहनतीने सराव करू लागला. त्याच्या उत्तम खेळाचा धडाका असाच कायम असल्याने प्रशिक्षकांनी त्याला जिल्हास्तरानंतर राज्यस्तरीय संघामध्ये अवघ्या पंधराव्या वर्षीच स्थान दिले. उन्मुक्तने या संधीचे सोने केले. या सामन्यात अष्टपैलू कामगिरी करत त्याने राष्ट्रीय स्तरावरील अनेक प्रशिक्षकांच्या मनात घर केले. त्याची ही खेळी पाहून रणजी सामन्यासाठी त्याची निवड करण्यात आली. रणजी सामन्यामध्येही त्याच्या कामगिरीचा धडाका असाच सुरु राहिल्यानंतर २०१२साली भारतीय संघाच्या ‘अंडर-१९’ संघासाठी उन्मुक्त याची निवड झाली. या स्पर्धेत भारताला विश्वचषक मिळवून देत त्याने इतिहास घडविला. उन्मुक्तला आता प्रतीक्षा आहे ती फक्त भारतीय संघाच्या मुख्य संघात प्रवेश करण्याची. आपले हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो प्रयत्नशील असून पुढील वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा!

- रामचंद्र नाईक  

@@AUTHORINFO_V1@@