किवींची ‘कोरोनामुक्ती’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jun-2020
Total Views |

jessica arden_1 &nbs




न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांनी गेल्या १७दिवसांपासून देशात एकही कोरोनाचा ‘अ‍ॅक्टिव्ह’ रुग्ण नसल्याची घोषणा केली आणि देशातील सर्व निर्बंध हटविण्यात आले. इतकेच नाही, तर ही आनंदाची बातमी कानावर पडताच आपण संगीतावर थोडेसे थिरकलो, अशी कबुलीही त्यांनी दिली.



कोरोनाच्या जागतिक कहरामुळे २०२०चा पूर्वार्ध संपायलाही आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. जानेवारी आणि फेब्रुवारी सोडल्यास उरलेले चार महिने घरबसल्या नजरेसमोरुन चटकन निसटलेही. पण, हळूहळू या ‘लॉकडाऊन’मधून अवघं जग टप्प्याटप्प्याने का होईना ‘अनलॉक’ होतंय. कोरोनापश्चातची ‘न्यू नॉर्मल’ जीवनशैलीही आता काही दिवसांनी अगदी ‘नॉर्मल’ भासू लागेल. पण, कोरोनाच्या बाबतीतही सगळे देश समसमान पातळीवर नाहीत. आजघडीला जगात ७२लाखांपेक्षा कोरोनाबाधित आढळले असून मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ही चार लाखांच्या पार गेली आहे. अमेरिकेसारखे महासत्ता म्हणून मिरवणारे देश या आरोग्य आणीबाणीत पुरते धारातीर्थी पडले, तर न्यूझीलंडसारख्या चिमुकल्या देशाने नुकतेच स्वत:ला कोरोनामुक्त घोषित केले. भारतात कदाचित कोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी सप्टेंबर-ऑक्टोबर महिना किंवा डिसेंबर महिनाही उजाडण्याची शक्यता काही तज्ज्ञांनी आकडेवारीच्या आधारावर बोलून दाखविली आहेच. पण, कोरोनामुक्तीचा ध्यास हा फक्त सरकारी उपाययोजनांवर अवलंबून नाही, तर देशवासीयांची शिस्त, त्यांची जिद्द ही या लढ्यात निश्चितच महत्त्वाची भूमिका बजावते आणि किवींच्या देशाने आपल्या नीतीवर्तनातून हेच जगाला दाखवून दिले. किवींचा देश अर्थात न्यूझीलंड हा कोरोनामुक्त होणारा काही पहिलावहिला देश नक्कीच नाही. मॉटेनिग्रो, एरिट्रिया, पापुआ न्यू गिनिया, सेशेल्स, होली सी, फिजी, ईस्ट तिमोर यांसारखे इतर क्षेत्रफळ आणि लोकसंख्येच्या दृष्टीने चिमुकले देश यापूर्वीच कोरोनामुक्त झाले आहेत. आता त्यात न्यूझीलंडचीही भर पडली.



न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांनी गेल्या १७दिवसांपासून देशात एकही कोरोनाचा ‘अ‍ॅक्टिव्ह’ रुग्ण नसल्याची घोषणा केली आणि देशातील सर्व निर्बंध हटविण्यात आले. इतकेच नाही, तर ही आनंदाची बातमी कानावर पडताच आपण संगीतावर थोडेसे थिरकलो, अशी कबुलीही त्यांनी दिली. पण, मग न्यूझीलंडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झालाच नाही का? तर, असे अजिबात नाही. या देशात दीड हजार जणांना कोरोनाची लागण झाली आणि २२ जण दगावलेही. पण, न्यूझीलंडच्या सरकारने तातडीने पावली उचलल्यामुळे पुढचा मोठा अनर्थ मात्र टळला. १५ मार्च रोजी जेव्हा देशात केवळ १०० कोरोनाचे रुग्ण होते, तेव्हाच आंतरराष्ट्रीय प्रवासावर निर्बंध लादले गेले. परदेशातून दाखल झालेल्यांनाही १४ दिवसांसाठी ‘क्वारंटाईन’ करण्यात आले. परंतु, सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सात आठवड्यांचा कडकडीत ‘लॉकडाऊन.’ या काळात फक्त अत्यावश्यक सेवा देशभरात सुरळीत सुरु होत्या. पंतप्रधानांच्या नावे देशवासीयांना त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने घरीच राहण्याचे आवाहन वेळोवेळी करण्यात आले. ‘लॉकडाऊन’चे महत्त्व पटवून देण्यासाठी पंतप्रधानांनी माध्यमांशी, जनतेशी दैनंदिन संवादावरही तितकाच भर दिला. त्यामुळे न्यूझीलंडमध्येे अमेरिका आणि युरोपप्रमाणे नागरिक ‘लॉकडाऊन’ विरोधात रस्त्यावर उतरले नाहीत की कुठे लूटमार झाली नाही.




न्यूझीलंडवासीयांनी दाखवलेल्या एकूणच संयमामुळे कोरोनामुक्तीचा हा प्रवास निश्चितच सुकर झाला. कोरोनाच्या बाबतीत विचार करताना, कोणत्या देशाने किती चाचण्या केल्या, हेदेखील तितकेच महत्त्वाचे ठरते. त्याबाबतीतही न्यूझीलंडने आघाडी घेतली. २०१८च्या आकडेवारीनुसार, ४८ लाख लोकसंख्या असलेल्या न्यूझीलंडमध्ये जवळपास तीन लाखांपर्यंत चाचण्या करण्यात आल्या. दरदिवशी किमान आठ हजार चाचण्या करण्याची क्षमताही न्यूझीलंडने अल्पावधीत विकसित केली, जी नक्कीच कौतुकास्पद आहे. त्यात न्यूझीलंड प्रशांत महासागरात ऑस्ट्रेलियाच्या किनार्‍यापासूनही दीड हजार किमी पूर्वेला असल्यामुळे या देशाचे भौगोलिक स्थानही कोरोनापासून बचावासाठी तारणहार ठरले. एकूणच काय तर जागतिक ‘लॉकडाऊन’च्या नियमावलीची कडक आणि काटेकोर अंमलबजावणी, ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’वर दिलेला भर, यामुळे न्यूझीलंड कोरोनामुक्त झाला. सार्वजनिक वाहतुकीपासून ते उद्योगधंद्यांपर्यंत कुठल्याही निर्बंधांविना न्यूझीलंडवासीय आज मुक्त आहेत. हे यश केवळ एकट्या पंतप्रधानांचे नाही, तर हा सामूहिक प्रयत्न आणि सार्वजनिक शिस्तीचा परिणाम म्हणावा लागेल. कोणी म्हणेलही, न्यूझीलंड हा लहान देश, म्हणूनच हे सर्व सहज शक्य झाले. तेही खरेच, पण आयर्लंडसारख्या तितक्याच लहान द्विपराष्ट्रात कोरोनाचा कहर आजही कायम आहे. तेव्हा, कोरोनामुक्तीसाठी गरज आहे ती अनंत इच्छाशक्तीची अन् ध्येयासक्तीची...

@@AUTHORINFO_V1@@