समाधानकारक : देशात १ लाख २९ हजार २१४ कोरोनाग्रस्त ठणठणतीत!

    09-Jun-2020
Total Views |
Covid 19_1  H x

१५ राज्यांमध्ये केंद्राची ५० पथके तैनात, महाराष्ट्रात सात पथके

नवी दिल्ली, (विशेष प्रतिनिधी) : देशात आतापर्यंत एकुण १ लाख २९ हजार २१४ कोरोनाग्रस्त ठणठणीत बरे झाले असून सध्या सक्रीय रुग्णांची संख्या १ लाख २९ हजार ९१७ झाली आहे. सक्रीय रुग्ण आणि बरे झालेले रुग्ण यांच्यातील दररोज कमी होणारे अंतर ही दिलासादायक बाब आहे. त्याचप्रमाणे १५ राज्यांमधील ५० महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा क्षेत्रात केंद्र सरकारची ५० पथके तैनात करण्यात आली असून महाराष्ट्रात सात पथके तैनात आहेत.


देशात आतापर्यंत १ लाख २९ हजार २१४ कोरोनाग्रस्त पूर्णपणे बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. गेल्या २४ तासात एकुण ९ हजार ९८७ कोरोनाबाधित आढळले आहेत तर ३३१ मृत्यू झाले आहेत. देशातील एकुण कोरोनाग्रस्तांची संख्या आता २ लाख ६६ हजार ५९८ झाली असून त्यापैकी सक्रीय रुग्णांची संख्या १ लाख ३९ हजार ९१७ एवढी आहे. आतापर्यंत ७ हजार ४६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


आयसीएमआरतर्फे जारी केलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ४६ लाखापेक्षा जास्त नमुन्यांची चाचणी करण्यात आली असून गेल्या २४ तासात १ लाख ४१ हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.



१५ राज्यांमध्ये केंद्राची ५० पथके तैनात


देशातील सर्वाधिक कोरोनाप्रभावित असल्या १५ राज्यांमधील ५० महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा क्षेत्रांमध्ये केंद्र सरकारने तज्ज्ञांची पथके तैनात केली आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रात सात पथके तैनात आहेत. स्थानिक प्रशासनासोबत समन्वय साधून संसर्गावर आळा घालण्यासाठी ही पथके कार्यरत असणार आहेत. केंद्रीय दोन साथरोग तज्ज्ञ आणि एक संयुक्त सचिव दर्जाचा अधिकारी अशा तीन जणांचा समावेश आहे.


महाराष्ट्रात ७, तेलंगाणा ४, तामिळनाडू ७, आसाम ६, राजस्थानमध्ये ५, हरियाणात ४, कर्नाटकमध्ये ४, गुजरात ३, उत्तराखंड ३, मध्य प्रदेश ५, प. बंगाल ३, दिल्ली ३, बिहार ४. उत्तर प्रदेश ४ आणि ओदिशामध्ये ५ पथके पाठविण्यात आली आहेत.