अनलाॅकमध्ये बोरिवली नॅशनल पार्कात नव्या पाहुण्याचे आगमन; निसर्ग वादळामुळे आई-पिल्लात दुरावा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jun-2020
Total Views |
leopard cub _1  

 

 
निसर्ग चक्रीवादळामुळे आई-पिल्लाची पुनर्भेट घडू शकली नाही

 
 
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - बोरिवलीच्या 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'त (नॅशनल पार्क) नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. नाशिकमध्ये मादी बिबट्यापासून दुरावलेल्या पिल्लाला पुढील देखभालीकरिता नॅशनल पार्कमध्ये दाखल करण्यात आले आहे. निसर्ग वादळामुळे या पिल्लाची त्याच्या आईसोबत पुनर्भेट घडू शकली नाही. त्यामुळे या पिल्लाच्या देखभालीची जबाबदारी आता नॅशनल पार्क प्रशासनावर पडली आहे.
 
 
 
गेल्या आठवड्यात सोमवारी नाशिकमधील पाथर्डी-गौळाणा रस्त्यावरील यशवंतनगरमध्ये कोंबडे मळ्यातील ऊसाच्या शेतात बिबट्याचे पिल्लू आढळून आले होते. ऊस तोडणी सुरू झाल्याने मादी बिबट्या दुसऱ्या जागेच्या शोधात असताना तिची आणि पिल्लाची ताटातूट झाली. त्याच रात्री वन विभागाने या पिल्लाची मादी बिबट्यासोबत पुनर्भेट घडवून दिली. दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी याच ठिकाणी दुसरे पिल्लू आढळून आले. मादी बिबट्यासोबत या पिल्लाची भेट घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यामध्ये अपयश आले. बुधवारी नाशिकमध्ये निसर्ग चक्रीवादळ धडकल्याने पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे पिल्लांच्या पुरर्भेटीचा प्रयत्न करण्यात आला नाही. परिणामी पिल्लाला पुढील देखभालीकरिता मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पाठवण्याचा निर्णय झाला.
 

leopard cub _1   
 
 
 
राज्यात बिबट्याच्या देखभालीकरिता तीन बिबट्या निवारा केंद्र आहे. त्यापैकी मुंबईतील नॅशनल पार्कमध्ये असलेल्या बिबट्या बचाव केंद्रात ४ जून रोजी या पिल्लाला नाशिकवरुन दाखल करण्यात आले. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव (पश्चिम) सुनील लिमये यांच्या परवानगीने या तीन आठवड्यांच्या मादी पिल्लाला आम्ही बचाव केंद्रात दाखल करुन घेतल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी विजय बारब्दे यांनी 'महा MTB'ला दिली. राष्ट्रीय उद्यानात दाखल झाल्यानंतर या पिल्लाचे वजन १,३०० ग्रॅम होते, जे आता १,५०० ग्रॅम झाल्याचे त्यांनी सांगितले. उद्यानाचे पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. शैलेश पेठे आणि त्यांची टीम या पिल्लांची देखभाल करत आहेत. काही महिन्यांपूर्वी ठाण्यातील येऊर वनपरिक्षेत्रात आणि नाशिकमधून एका पिल्लाला राष्ट्रीय उद्यानात देखभालीकरिता दाखल करण्यात आले होते.
@@AUTHORINFO_V1@@