समृद्ध मनाच्या आमदार...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jun-2020
Total Views |
Chandrakanta Goya _1 






आज आठवणींच्या काठाकाठांनी चालताना कधी भेट झालीशी वाटते. आठवणी उतरतात मनात अलगद जसे डोंगरावर ढग, ढग पांगतात. वार्‍यासोबत आठवणी मात्र मनासोबत. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या मातोश्री आणि भाजप कार्यकर्त्या, माजी आमदार चंद्रकांता गोयल यांच्या निधनाची बातमी समजली. चंद्रकांता गोयल यांना भावपूर्ण श्रद्धांजली.




चंद्रकांता गोयल माटुंगा विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आल्या. माटुंगा-शीव भागात राष्ट्र सेविका समितीचा कार्यप्रसार करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. मृदू स्वभावाच्या चंद्रकांताबाईंच्या चेहर्‍यावर सतत हास्य विलसत असे. कुठल्याही प्रकारचा गर्व नसणारी, आमदारकीचा कुठलाही साज अंगावर न ठेवणार्‍या त्या होत्या. भारतीय जनता पक्षाची अशी आमदार भविष्यात होणे नाही, असे वाटते.


 
आजकाल तर पीए संस्कृतीने राजकारणात प्रवास केला आहे. प्रथम पीएना भेटा, नंतर आमदारांना भेटा. मात्र, असे कधी चंद्रकांता गोयल यांच्याबाबतीत झाले नाही. चंद्रकांताबाई अतिशय मोकळ्या मनाच्या होत्या. अंबर पॅलेसमध्ये सर्वांसाठी सकाळपासून रात्रीपर्यंत पूर्वपरवानगी न घेता प्रवेश मिळत असे. असो. चंद्रकांताबाई गेल्यानंतर दादरस्थित विहार ट्रॅव्हल्सच्या संचालिका रत्नप्रभा दांडेकर यांच्याशी केलेली बातचित आठवली. रत्नागिरीतून ८० साली नोकरीच्या शोधात आलेल्या दांडेकरांचे राष्ट्रसेविका समितीच्या बकुळताई देवकुळे यांच्याकडे वास्तव्य होते. साधना हायस्कूल, शीव येथे त्या राहत असत. श्रुती ही बकुळताईंची मुलगी, तर पीयूष चंद्रकांताबाईंचा मुलगा.
 
 
 
ही दोघेही लहान मुले नेहमी एकत्र खेळत असत. चंद्रकांताबाईही फोनवरुन याबाबत सांगत असत. रत्नप्रभा दांडेकर यांचे समितीची सेविका या नात्याने गोयल यांच्या घरी जाणे येणे नेहमीचेच असे. मात्र, एवढ्या मोठ्या घरात जात असतानाही रत्नप्रभा दांडेकर यांच्यासारखीला चंद्रकांताबाईंनी कधी परकेपणा जाणवू दिला नाही. त्या नेहमी आस्थेवाईकपणे विचारपूस करत असत, जणू हा त्यांचा स्वभावधर्म होता. शाखेचे कार्यक्रम, भाजप कार्यक्रमांची माहिती त्यामुळे मिळत असे. पुढे रत्नप्रभा दांडेकर यांनी समितीच्या कामातून स्वतःचा व्यवसाय सुरू केला. नवा व्यवसाय सुरु केल्याचे आजही त्यांना अभिमानाने सांगावेसे वाटते. त्यांच्या व्यवसायाच्या उद्घाटनाला दादरस्थित गंगानिवास येथे (१९ नोव्हेंबर १९८६) साध्या निमंत्रणावरून चंद्रकांताबाई आल्या होत्या. त्यांच्या आशीर्वादाने आजही व्यवसाय सुस्थितीत आहे, असे दांडेकर यांनी सांगितले.
 
 
चंद्रकांताबाईंकडे जिजामाता ट्रस्ट, गृहिणी विद्यालय यांच्यासाठी नेहमी आसरा, आधार असे. ४ फेब्रुवारी २००३ रोजी स्वदेशी जागरण मंचाने ‘उद्योजिका सन्मान सोहळा’ आयोजित केला होता आणि तो पुरस्कार रत्नप्रभा दांडेकर यांच्या ‘विहार ट्रॅव्हल्स’ला मिळाला. चंद्रकांताबाईंनी याचे कौतुक केले आणि तेच रत्नप्रभा दांडेकर यांना पुढच्या प्रवासासाठी उपयोगी पडत आहे. शून्यातून व्यवसाय उभ्या करणार्‍यांसाठी त्या आधारवडासारख्याच होत्या. रत्नप्रभा दांडेकर यांनी चंद्रकांताबाईंबद्दल अशाप्रकारे साश्रू नयनांनी आपले अनुभव कथन केले.
 
 
चंद्रकांता गोयल यांच्या घरी भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा नेहमी राबता असायचा. सामान्य कार्यकर्ता आणि परिसरातील नेते यांची भेट व्हावी, असे मनोमन त्यांना वाटे. आवर्जून प्रमुख कार्यकर्त्यांना त्या घरी बोलावित असत. निवडणुकीच्या प्रचारात कार्यकर्त्यांबरोबर राहणे, सामूहिक प्रचारापेक्षा व्यक्तीगत प्रचारावर अधिक भर, डोक्यावर बर्फ, तोंडात साखर आणि सतत संपर्क यामुळे जननायिकेचे काम त्यांनी अखंड सांभाळले.
 
 
भारतीय जनता पक्षामध्ये जयवंतीबेन मेहता, कुसुमताई अभ्यंकर, सुशीलाताई आठवले, मालती नरवणे, क्षेमाताई थत्ते या सर्वांच्या रांगेत चपखल बसणार्‍या चंद्रकांता गोयल. आता त्याही आपल्यातून गेल्या. भाजप कार्यकर्त्यांची कधीही भरून न निघणारी अशी हानी त्यामुळे झाली. कर्मालाच त्यांनी आपला धर्म मानला आणि तथाकथित उच्चभ्रू समाजातील असूनसुद्धा सतत जमिनीवर राहणार्‍या अशा मनमिळावू, संयमी आणि मितभाषी सर्वांच्या हृदयात अढळ स्थान प्राप्त करणार्‍या त्या अजातशत्रू होत्या.
 
 
भारतीय जनता पक्षात नवीन येणार्‍या कार्यकर्त्यांना त्यांच्या कार्याची आणि व्यक्तिमत्त्वाची सतत उणीव भासत राहील. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन कार्यकर्त्यांनी मार्गक्रमण करावे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. मुंबई महापालिकेत नगरसेविका असताना एका रस्त्याचे नामकरण, लक्ष्मीबाई केळकर रोड, राष्ट्रसेविका समिती, आद्य संचालिका, असे करणार्‍या आज आपल्यातून गेल्या, सर्व स्मृती मागे.

- शैला सामंत
@@AUTHORINFO_V1@@