‘व्हर्च्युअल रॅली’ ठरणार गेमचेंजर, भाजपचा राजकारणात नवा प्रयोग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jun-2020   
Total Views |

shah_1  H x W:

व्हर्च्युअल रॅली ठरणार गेमचेंजर, भाजपचा राजकारणात नवा प्रयोग

 

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी बिहार जनसंवाद या पहिल्याच व्हर्च्युअल रॅलीद्वारे बिहारच्या जनतेशी संवाद साधला. भारतीय राजकारणात पहिल्यांदाच झालेल्या या प्रयोगाला मोठा प्रतिसाद लाभल्याचे स्पष्ट झाले आहे. आकडेवारीनुसार तब्बल ५४ लाख लोकांनी फेसबुक, ट्विटर, वेबेक्स अणि दूरचित्रवाणीच्या (टिव्ही) माध्यमातून शाह यांचे भाषण ऐकले आहे. त्यामुळे आगामी काळात व्हर्च्युअल रॅली या राजकीय पक्षांसाठी गेमचेंजर ठरण्याची दाट शक्यता आहे.
 

कोरोना विषाणूमुळे पुढील मोठ्या कालावधीपर्यंत सोशल डिस्टन्सिंग पाळावेच लागणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांवरही सभा, मेळावे घेण्यावर बंधने आली आहेत. कारण जाहिर सभा असो की कार्यकर्ता मेळावा, किमान ५०० आणि कमाल काही हजार लोक तरी त्यात सहभागी होत असतात. त्यासाठी मंडप उभारणे, भव्य व्यासपीठ बांधणे, पाण्याची, भोजनाची सोय करणे असे सर्व काही करावे लागते. मात्र, कोरोनाचा धोका पाहता काही काळ अशा भव्य सभा आणि मेळाव्यांचे आयोजन करणे स्थगित कराव लागणार आहे.

 

मात्र, भारतीय राजकारणात नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात नेहमीच आघाडीवर असणाऱ्या भारतीय जनता पक्षाने त्यावर व्हर्च्युअल रॅलीचा उपाय शोधला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांच्या घोषणेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या वर्षपूर्तीनिमित्त देशभरात ७५ व्हर्च्युअल रॅली केल्या जाणार आहेत. त्यातली पहिली सभा रविवारी बिहार जनसंवादच्या रूपात पार पडली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीतल्या दिनदयाल उपाध्याय मार्गावरील भाजप मुख्यालयातून बिहारच्या जनतेशी संवाद साधला. त्यासाठी भाजपने केलेली नियोजनबद्ध आखणी ही सर्व राजकीय पक्षांना अनुकरणयोग्य आहे. शाह यांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण खासगी वृत्तवाहिन्यांनी तर केलेच. पण त्यासोबतच फेसबुक, ट्विटर, युट्यूब आणि वेबेक्सद्वारेही त्याचे प्रक्षेपण करण्यात आले.

 

rally_1  H x W: 
 

पहिल्याच व्हर्च्युअल रॅलीची आकडेवारी पाहिल्यास हा प्रकार आता किती महत्वाचा ठरणार आहे, हे लक्षात येते. शाह यांची सभा ५३ फेसबुक पेजेसवरून थेट प्रसारित करण्यात आली होती, त्याद्वारे २२ लाख १४ हजार १३६ लोकांनी सभा पाहिली. बिहारमधील ७ प्रादेशिक वाहिन्यांवरूनही (न्यूज 18, झी न्यूज, कशीश न्यूज, ई टिव्ही न्यूज, न्यूज 4 नेशन, लाईव्ह सिटीज्, सिटी पोस्ट) भाषणाचे प्रसारण झाले, त्यास ४४ लाख ७१ हजार ५०० व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचप्रमाणे वेबेक्स ऑनलाईन बैठका घेण्यासाठीच्या सॉफ्टवेअरद्वारे ८४१ जण सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे बिहारमधील एकुण ३० हजार ९० बुथवरदेखील शाह यांच्या भाषणाचे प्रक्षेपण करण्यात आले होते. जनसंवाद रॅली ऐकणाऱ्या आणि पाहणाऱ्यांची एकुण संख्या ही ५४ लाख ३२ हजार ७१६ एवढी असल्याचे समोर आले आहे.

आता प्रत्यक्षात सभा घेण्यात येणारा खर्च, त्यासाठी लागणारे संसाधने यांचा खर्च मोठा असतो. त्याचप्रमाणे जनतेला सभास्थळी आणणेदेखील महत्वाचे असते. त्या तुलनेत व्हर्च्युअल सभा घेणे हा कमी खर्चाचा प्रकार आहे. त्याचप्रमाणे आता देशातील स्मार्टफोन आणि इंटरनेट वापरकर्त्यांची मोठी संख्याही महत्वाची ठरत आहे. त्याचप्रमाणे यामुळे जनता आपल्या घरात अथवा कार्यालयात बसुनही राजकीय सभा बघू शकणार आहे. अर्थात, प्रत्यक्ष जाहिर सभेचे महत्व वेगळे असतेच, मात्र सध्याची परिस्थिती पाहता व्हर्च्युअल सभांनाचा सर्व राजकीय पक्षांकडून प्राधान्य दिले जाऊ शकते.

 

भाजपच्या तंत्रज्ञानस्नेहाचा महाजन मार्ग’…


mahajan_1  H x  
 

प्रचाराची नवनवी तंत्रे स्विकारण्यात देशात अन्य राजकीय पक्षांच्या तुलनेत भाजप नेहमीच आघाडीवर असतो. भाजपच्या या तंत्रज्ञानस्नेहाचे श्रेय दिवंगत प्रमोद महाजन यांना द्यावे लागेल. महाजन यांनी २००४ त्या सार्वत्रिक निवडणुकीत तेव्हाच्या काळात हायटेक प्रचारास प्राधान्य दिले होते. भाजपने तेव्हा ई-मेलसह देशात नुकतेच रुजू लागलेल्या मोबाईल फोनच्या एसएमएस आणि व्हॉईस मेसेजचा मोठ्या प्रमाणावर वापर केला होता. नमस्कार, मैं अटल बिहारी वाजपेयी बोल रहा हूं असा वाजपेयी यांचा आवाज अनेकांच्या स्मरणात असेल. त्याचप्रमाणे राजकीय पक्षाच्या अधिवेशनातही इंटरनेटचा सर्वप्रथम वापर करण्याचे श्रेय भाजप आणि महाजन यांचेच आहे. मुंबईतील वांद्रे – कुर्ला संकुलात २००५ साली झालेल्या भाजपच्या सुवर्ण महोत्सवी राष्ट्रीय अधिवेशनात वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना अधिवेशनाच्या बातम्या तात्काळ पाठविता याव्यात, यासाठी संगणक आणि इंटरनेटची सुविधा अधिवेशनाच्या मिडिया रूममध्ये उपलब्ध करून देण्यात आली होती.

त्यानंतर २०१४ साली नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमांचा केलेला वापर, थ्रीडी तंत्राचा वापर करून घेतलेल्या सभा हा जनतेच्या आकर्षणाचा विषय ठरला होता. आतादेखील व्हर्च्युअल सभांना सुरूवात करुन पुन्हा एकदा नव्या तंत्राचा अवलंब करण्यात भाजपने आघाडी घेतली आहे.

@@AUTHORINFO_V1@@