जिंदगी ना मिलेगी दोबारा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jun-2020
Total Views |
covid19_1  H x

नैसर्गिक आव्हानांवर आपले नियंत्रण नाही, हे आपण नम्रपणे स्वीकारुया. पण, त्याचवेळी या सगळ्या आव्हानात्मक परिस्थितीला आपण कसे सामोरे जायचे? भीतीने मरून जायचे, का ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ हे लक्षात घेऊन धाडसाने सामोरे जायचे, हे तर आपल्याच हातात आहे.



सगळ्यांच्याच आयुष्यात अडथळे येतात आणि जातातही. आपल्यापैकी काही जण या अडथळ्याच्या शर्यतीत मार खातात, तर काही जण पुढे निघूनही जातात. आपण जर या जगात नसू तर अडथळे आहेत की नाहीत, याचा आपल्याला काडीमात्र फरक पडत नाही. पण, आपण या जगात असतो, तेव्हा एखादा अडथळा आपल्या आयुष्यातली एक महत्त्वपूर्ण घटना ठरू शकते आणि त्यातूनच आपल्या आयुष्याचे एक कथानक उदयास येते.


अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी त्यांच्या यशस्वी आयुष्यात ‘डिप्रेशनशी’सुद्धा एक प्रदीर्घ झुंज दिली, हे खूप कमी लोकांना माहीत आहे. त्यांनी अगदी आव्हानात्मक परिस्थितीत अमेरिकेचे नेतृत्व केले. नागरी युद्धाचा काळ होता तो. त्यांनी आपल्या राष्ट्रासाठी, अमेरिकेला एकत्रित आणण्यासाठी आपले आयुष्य समर्पित केले. आपल्या आतील भावनिक क्षोभ त्यांनी वैयक्तिक मर्यादेच्या पलीकडे जाऊन आवरला. आयुष्यात स्वतःच्या घालमेलीकडे वा समस्यांकडे न पाहता, जगाच्या मोठ्या क्षितिजावर व्यक्ती जेव्हा आपलं अस्तित्व शोधायला निघते, तेव्हा तिच्यासाठी आकाशही ठेंगणे ठरते. एखादी व्यक्ती अशा अद्भुत क्षमतेने आणि प्रयत्नांनी आपल्या व्यक्तिगत धडपडीला पार पाडत अर्थपूर्ण व मनस्वी आयुष्य जगते, तेव्हा तिचे असामान्यत्व हे केव्हाही अजरामर ठरते.


अब्राहम लिंकन यांच्या ‘डिप्रेशन’बरोबरच्या अविरत लढाईत आणखी एक अनोखी गोष्ट आपल्याला दिसून येते, ती म्हणजे आपण जेव्हा आपल्या अंतर्मनाला ढवळून काढणार्‍या छोट्या छोट्या समस्यांकडे लक्ष न देता, आपल्या अवतीभवती पसरलेल्या अवाढव्य जगाला मदतीचा हात देतो, तेव्हा आपल्या अस्तित्वाला आपण एका संपन्न आणि अमर्याद अशा अस्तित्वाचा एक अविभाज्य घटक बनवितो. अशावेळी माणसाला त्याच्या स्वतःच्या वेदनेपलीकडे जाऊन दुसर्‍यांच्या वेदनेला फुंकर घालण्याची ताकद मिळते. म्हणजेच केवळ ‘माझे दुःख महान’ म्हणत, आपण त्यात हरवून न जाता दुसर्‍यांच्या दुःखी मनाचे सांत्वन करतो, तेव्हा आपलं दुःख कमी होतं. ही केवढी मोठी हितावह गोष्ट आहे.


कधी कधी आपल्या आयुष्यात येणारी छोटी संकटे, शोकांतिका आणि समस्या नकळत, काही माणसाच्या आयुष्यात प्रचंड बदल घडवून आणतात. हा बदल प्रेरणेने भारलेला गतिमान बदल असतो. अशा संकटकालीन परिस्थितीत काही व्यक्ती त्यांच्या अंतर्मनात सजग होतात आणि त्यांना आपल्यामध्ये असलेल्या उत्तुंग ऊर्जेची जाणीव होते. त्यांना जीवनाचं आणि जगण्याचं महत्त्व खर्‍या अर्थाने कळायला लागतं. आपल्यापैकी अनेकांना कोरोनाच्या भयानक भीतीदायक वातावरणातून जाताना, आपल्या ओळखीच्या नात्यातल्या व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे, हे ऐकताना आपली मित्रमंडळी आणि परिचित ‘क्वारंटाईन’ झाले आहेत, हे कळल्यावर आपला झोन ‘रेड झोन’ झाला आहे, हे समजल्यावर रात्री झोपेत यमराजाने स्वप्नात हजेरी लावली तर आश्चर्य वाटू नये. काळाने आपल्यावर झडप घालायची पूर्ण योजना केली आहे, असे सगळ्यांना वाटत असताना काही खास मंडळी यमाला गुदगुल्या करूनही आली आहेत. हे सगळे अनुभव आपल्या आयुष्यात आपल्याला आपल्या जगण्याचा अर्थ काय, याचा पुन्हा एकदा आढावा घ्यायला भाग पडतात. काहीतरी वाईटसाईट घडलंच आहे. आयुष्यात तर त्यातून काहीतरी चांगलं असं शोधायला काहीच हरकत नाही.


तसे कोराना सरांनी आपल्याला व्यवस्थित कोचिंग दिले आहे. पण, आपल्यापैकी सगळेजण गंभीर किंवा द्रष्टा विद्यार्थी असू शकत नाही, हे सत्य आपण शांत मनाने स्वीकारलेले बरे. आपण सगळे टाईमलाईनवर आहोत. म्हणजे जेव्हा आपण काहीतरी प्रयोजन करत असतो, तेव्हा बर्‍याचवेळा आपली ‘डेडलाईन’ ठरलेली असते. ‘डेडलाईन’ हा आजच्या काळातला परवलीचा शब्द आहे. मला जेव्हा लेख द्यायचा असतो, तेव्हा दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे माझी ‘डेडलाईन’ मला सांगितली जाते. त्याची आठवणही केली जाते. तेव्हा, आपण अशावेळी काही तक्रार करायची नसते. ‘चला सामोरे जाऊया’ असाच आपला अविर्भाव असावा. शेवटी काय ‘डेडलाईन’च्या थोडेसे पुढे सरकलो की, आपली सगळ्यांची वेळ तशी ठरलेलीच आहे. आपल्या आयुष्यातली ‘मृत्यू’ ही संकल्पना आपण कधीच टाळू शकत नाही. तुकोबांनी म्हटले तसे सहज, ‘आम्ही जातो आपुल्या गावा, आमचा रामराम घ्यावा, तुमची आमची हेचि भेटी येथुनिया जन्मतुटी’


किती सहज सोप्या आणि निर्मळ भाषेत संत तुकारामांनी आपल्याला मृत्यूची ओळख करून दिली. एकदा आपल्याला ही गोष्ट सोपी वाटली तर कुठल्या अडचणी आता आपल्याला भयभीत करणार आहेत. आपण आपली सक्षमता प्रत्येक आव्हानाबरोबर वाढवू शकतो, ही जाणीव ज्याक्षणी व्यक्तीस होईल, त्याक्षणी गगन खरंच ठेंगणेच होईल. आपल्या जीवनात महापूर, चक्रीवादळ, भूकंप आणि कोरोना काही सांगून येत नाही. या सगळ्या संकटाकडे विनाश करण्याचे अजब सामर्थ्य आहे, याचे पुरावे आपल्या ‘निसर्गा’ने पुन्हा पुन्हा दिले आहेत. या सगळ्या नैसर्गिक आव्हानांवर आपले नियंत्रण नाही, हे आपण नम्रपणे स्वीकारुया. पण, त्याचवेळी या सगळ्या आव्हानात्मक परिस्थितीला आपण कसे सामोरे जायचे? भीतीने मरून जायचे, का ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ हे लक्षात घेऊन धाडसाने सामोरे जायचे, हे तर आपल्याच हातात आहे. याचाच अर्थ रुद्र संकट अकस्मात आली तरी आपण काय करू शकतो, या विचारांवर आपला काबू नक्कीच आहे मंडळी!


- शुभांगी पारकर
@@AUTHORINFO_V1@@