कोरोना कहर (भाग - १२ - ‘कोरोना’वर उपयुक्त ‘कॅम्फर’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jun-2020
Total Views |
x_1  H x W: 0 x




होमियोपॅथीक चिकित्सा पद्धती ही संपूर्णपणे वैयक्तिकीकरणावर अवलंबून असते. अ‍ॅलोपॅथीप्रमाणे इथे आजाराच्या नावावर सर्वांना एकच औषध असे नसते, तर प्रत्येक रुग्णाच्या प्रकृतीचा अभ्यास करून त्याच्या शारीरिक व मानसिक प्रकृतीला व लक्षणांना पूरक ठरणारे औषधच होमियोपॅथीमध्ये दिले जाते. साथीच्या आजारातसुद्धा जर रुग्णाला वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे असतील, तर त्याप्रमाणे शोधून औषध द्यावे लागते. ‘ कोविड -19’च्या या साथीमध्ये बाकीच्या औषधांबरोबरच अजून एक औषध फार महत्त्वपूर्ण आहे व ते म्हणजे ‘कॅम्फर.’(Camphora) आज या औषधाची माहिती जाणून घेऊया.

हे औषध कापरापासून बनवले जाते. थंडपणा (शारीरिक आणि मानसिक), पेटके येणे, स्नायू आकुंचन पावणे आणि आकडी येणे, बेशुद्ध होऊन स्नायू आकुंचन पावणे व त्याचबरोबर अतिशय मानसिक क्लेश होणे, ही ‘कॅम्फोरा’ किंवा ‘कॅम्फर’ या औषधाची अतिशय प्रमुख अशी लक्षणे आहेत. या औषधाचा परिणाम हा मेंदूच्या नसांवर होत असतो व या नर्व्हस सिस्टीमच्या प्रभावामुळे अचानकपणे कोसळणे (Sudden Collapse) हे या औषधाचे प्रमुख लक्षण आहे.
 
 
रुग्ण अतिशय थंडगार पडणे, परंतु इतके थंडगार अंग असतानाही रुग्णाला अंगावर जराही पांघरुण नको असते. त्यानंतर थोड्या वेळात शरीराच्या अंतर्गत आग आग होऊ लागते व रुग्णाला भीती वाटू लागते व अशावेळी रुग्ण पांघरुण घेऊन झोपतो. या औषधाचे अजून एक मुख्य लक्षण म्हणजे Dry Collapse, म्हणजेच काय तर सर्वसाधारणपणे उलट्या, जुलाब किंवा शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे व साखरेचे प्रमाण कमी झाल्यामुळे रुग्ण अचानकपणे कोसळतो. परंतु, ‘कॅम्फर’च्या लक्षणांमध्ये उलट्या किंवा जुलाब वगैरे न होताच रुग्ण कोसळतो. यास ‘Dry Collapse' म्हणतात. ‘कॅम्फर’च्या रुग्णाला फार थंडी वाजते व पटकन सर्दी होते. थंड हवा जराही सहन होत नाही. या औषधाचा मुख्य परिणाम हा पचनसंस्था, चेतासंस्था, मेंदू व नसा, मूत्रपिंड व उत्सर्जन संस्था आणि नाक व घसा या अवयवांवर प्रामुख्याने होतो.
 
 
रुग्णाला खालील गोष्टींनी त्रास होतो. जसे-

- थंड हवा

- अर्धवट झालेली झोप, मानसिक ताण व थकवा.

- मानसिक वा शारीरिक धक्का (Shock)

- मलम लावून केलेले रोगदमन, चुकीची औषधे खाऊन झालेले रोगदमन

तसेच रुग्णाला खालील गोष्टींनी आराम मिळतो. जसे-

- घाम आल्यावर रुग्णाला बरे वाटते.

- थंड पाणी प्यायल्यावर रुग्णाला बरे वाटते.

- शरीरातील स्राव वाहिल्यावर रुग्णाला बरे वाटते.

मानसिक लक्षणांमध्ये ‘कॅम्फर’चा रुग्ण हा असंवेदनशील असतो. ग्रहणशीलता कमी होत जाते, स्मृती कमी होते.
तापात किंवा इतर आजारात भ्रम अवस्था तयार होते, रुग्णाला उंचावरून उडी मारावी असे वाटून भ्रमावस्था तयार होते. रुग्ण कोणालाही जवळ येऊ देत नाही. कशानेही त्याचे समाधान होत नाही. सतत चलबिचल सुरू असते. रुग्ण भ्रमित अवस्थेत सतत बोलत राहतो. तापात किंवा इतर आजारात मृत्यूचे भय वाटू लागते. रात्रीच्या वेळेस रुग्णास खूप मानसिक अस्वस्थता येते, क्लेष होतात. रुग्ण नुसता डोळे मिटून पडून राहतो व कुठल्याही प्रश्नाला उत्तर देत नाही.


तापामध्ये डोळे दुखू लागतात. वेदना डोक्यापासून निघून हाताच्या बोेटांपर्यंत पसरतात. सतत नाकाला चुरचुरत राहते व सर्दी होते. जिभेचा रंग निळसर होतो. कारण, रुग्णाला ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडतो व दम लागू लागतो. अंग थरथरू लागते. ताप येताना थंडीपासून ताप येतो व शरीर एकदा थंड, तर नंतर गरम असे बदल होतात. अंग तापलेले असताना रुग्णाला पांघरुण घ्यावेसे वाटते. अचानकपणे ताप येतो. त्यानंतर जबरदस्त थकवा येतो. घाम कमी येतो व रुग्ण एकदम थकल्याने कोसळून जातो.
‘कॅम्फर’ या औषधाच्या शेकडो लक्षणांपैकी काही महत्त्वाची लक्षणे मी इथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ही औषधे कृपया स्वतःहून घेऊ नयेत, त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. पुढील भागात ‘कोविड-19’च्या साथीमध्ये उपयुक्त अशा अजून एका औषधाचा आपण अभ्यास करणार आहोत.



- मंदार पाटकर



(लेखक एम.डी होमियोपॅथी आहेत.)
@@AUTHORINFO_V1@@