किसी का दर्द हो सके तो लो उधार...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jun-2020   
Total Views |
DR Londhe _1  H
 
 





आयुष्यात सुख येते येते म्हणता दु:ख पदरी पडते. पण, त्या दु:खावर मात करत कुटुंब आणि समाजासाठी काम करणारे खूप कमी असतात. त्यापैकीच एक म्हणजे साहित्यिक, समाजसेविका, उद्योजिका आणि डॉक्टर शुभा लोंढे...






संघर्ष आणि समन्वय यांची मैफील जमते, तेव्हा आयुष्य एक कादंबरी बनून जाते. त्या कादंबरीची नायिका आदर्शच असते. पण, तो आदर्शवाद जगताना त्या नायिकेच्या आयुष्याचे, भावनांचे काय होत असेल, तिचे तीच जाणो. असेच आयुष्य आहे डॉ. शुभा लोंढे यांचे. डॉ. शुभा लोंढे या पुण्यात 20 वर्षे ‘डॉक्टर’ म्हणून प्रॅक्टिस करत आहेत. त्यांच्या साहित्यिक, सामाजिक कार्याबद्दल त्यांना अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत. त्यांची एक कंपनी असून त्या एक यशस्वी उद्योजिका म्हणूनही ओळखल्या जातात.




पुण्यात राहणार्‍या डॉ. शुभा लोंढेंचे व्यक्तिमत्व, कर्तृत्व पाहिले की कुणालाही वाटेल की वारसा मिळाल्याशिवाय हे शक्य नाही. पण, तसे अजिबात नाही. यवतमाळच्या ज्ञानेश्वर आणि वीणाताई या दोघेही शिक्षक दाम्पत्याच्या सहा मुलांपैकी एक म्हणजे शुभा. ज्ञानेश्वर आणि वीणाताई यांना साहित्याची आवड. मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य देण्याबरोबरच त्यांच्यावर साहित्यिक नीतिमत्तापूर्ण संस्कारही त्यांनी केले. लहानपणी गावात शुभा यांना जातीयतेचे चटके सहन करावे लागले. शुभा खेळात खूप हुशार. राज्य स्तररावर त्या व्हॉलीबॉल खेळल्या. पण, सर्व निकष योग्य असूनही त्यांची निवड राष्ट्रीय स्तरावर झाली नाही. त्यामुळे शुभा खूप दु:खी झाल्या. त्यावेळी त्यांचे वडील म्हणाले, “कोणत्याही प्रसंगांनी निराश व्हायचे नाही. प्रयत्न करत राहायचा. संघर्ष मेहनत केली की यश मिळतेच.” वडिलांचे ते उद्गार शुभा यांनी कायम लक्षात ठेवले.




लहानपणापासून त्यांना डॉक्टरच व्हायचे होते. त्यामागे तसे कारणही होते. गावात एका गरोदर महिलेचा वैद्यकीय उपचारांअभावी तडफडून मृत्यू झाला होता. या घटनेचा शुभा यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. डॉक्टर होऊन समाजासाठी काम करायचे त्यांनी ठरवले. त्यांनी बीएएमएसचे शिक्षण पूर्ण केले. याच काळात त्यांचा संपर्क अंनिस आणि स्त्री मुक्ती संघटनेशी आला. गावखेड्यात अंधशद्धा निर्मूलनाचे कार्य करताना त्यांना खूप बरेवाईट अनुभव आले. त्यापैकी एका वाईट अनुभवात शुभा कशाबशा बचावल्या. पुढे त्यांनी डॉक्टरकी सुरू केली. प्रॅक्टिस सुरू असताना त्यांना जाणवले की कितीतरी महिलांची प्रसुती सुलभ होऊ शकत असताना बहुतेकजण या महिलांना सिझर करायला लावतात. ही अनैतिकता आहे. हे थांबायला हवे म्हणून शुभा यांनी एक आघाडीच उघडली. पण, त्यासाठी त्यांना कितीतरी धमक्या आणि उपदेश एकावे लागले. मात्र, शुभा यांनी आपले कार्य आजही सोडले नाही.




पुढे एमडीच्या शिक्षणासाठी त्या पुण्याला आल्या. तिथे त्यांची ओळख इंजिनिअर असलेल्या प्रशांत लोंढे यांच्याशी झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. पण, प्रशांत जातीने मराठा होते आणि शुभा बौद्ध. प्रशांत यांच्या घरातून त्यांच्या प्रेमाला विरोधच झाला. तरीही प्रशांत आणि शुभा यांनी लग्न केले. मात्र, त्यांना त्यासाठी गावाबाहेर राहावे लागले. चिंचवडहून ते दोघे धायरीला आले. इथे या दोघांनी शून्यातून सुरुवात केली. शुभा यांनी दवाखाना उघडला, तर प्रशांत यांनी ‘ओमनी टेक इंजिनिअर’ नावाची कंपनी उघडली. अशी सात वर्षे गेली. सासरचे दरवाजे शुभा यांना बंदच होते. शुभाचे सासरे एक दिवस खूप आजारी पडले. शुभा सात वर्षांतले सारे कटुगोड प्रसंग विसरून सासरी गेल्या. डॉक्टर आणि सूनबाई म्हणून जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे केले. शुभा यांना सासरच्यांनी अखेरीस स्वीकारले. आता जातीय संघर्षाचा तेढ संपलीच होती.





‘ओमनी टेक कंपनी’ही सुस्थितीत होती. बर्‍यापैकी आर्थिक-सामाजिक स्थैर्य लाभले होते. सोळंकी येथील दुष्काळग्रस्त गावात शुभा आणि प्रशांत यांनी प्रचंड कष्ट करून ‘सुप्रा अ‍ॅग्रो रिसॉर्ट’ हे नंदनवनही फुलविले. पण, दैवाचा फेरा निराळा. प्रशांत यांची तब्येत बिघडली. शुभा म्हणतात, त्या इस्पितळाच्या भोंगळ कारभारामुळे योग्य तो निर्णय न घेण्यामुळे प्रशांत यांचा मृत्यू झाला. शुभा या प्रसंगानी हादरून गेल्या. इस्पितळावर केस करावी? काय करावे? पण, आता पतीची साथ नव्हती, दोन किशोरवयीन मुली. आयुष्याचा दुसरे वळण सुरू झाले होते. सुख येते येते म्हणताच, दु:खाचा डोंगर कोसळला होता. प्रशांत यांच्या सोबतचे शून्यातून निर्माण केलेले जग समोर होते. त्याला या क्षणी सावरणे गरजेचे होते. शुभा यांनी कणखर भूमिका घेतली. त्यांची मोठी मुलगी एमबीए झाली, तर दुसरी मुलगी शिकत आहे.




माहेर, सासर, कुटुंब, समाज, साहित्य, उद्योग या सर्व आघाड्यांवर डॉ. शुभा यांनी स्वत:चे अस्तित्व निर्माण केले आहे. पुण्यामध्ये कोणतीही वारी असो की आंदोलन, सगळे शुभा यांना आवर्जून बोलावतात. त्यांचे मार्गदर्शन घेतात. आज कोरोनाच्या प्रादुर्भावातही शुभा दररोज दवाखाना उघडतात. कंपनी बंद आहे, पण तीन महिन्यांचा पगार त्यांनी कामगारांना दिला आहे. दररोज संध्याकाळी त्या कोरोना आरोग्य हेल्पलाईनवर समुपदेशन करतात. जातीय संघर्षावर बोलताना शुभा म्हणतात, “जगण्याची अनुभूती माणूस म्हणून असणे गरजेचे आहे. ती अनुभूती घेतली की जातपात, विद्वेश याहीपेक्षा माणूसपण महत्त्वाचे वाटते.” खरे म्हणजे, ‘किसी का दर्द हो सके तो लो उधार’, हेच आयुष्याचे संचित असते.
@@AUTHORINFO_V1@@