
‘येस टू लाईफ...नो टू टोबॅको’या विशेष ऑनलाईन संगीत रजनीचे आयोजन!
मुंबई : जग ‘कोविड -१९’ महामारीशी लढत असताना ‘कॅन्सर पेशंट्स एड असोशिएशन’ (सीपीएए) या कर्करोग रुग्णांसाठी गेली पाच दशके काम करत असलेल्या संस्थेने आणि जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) यांनी एका अनोख्या अशा ऑनलाईन सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ‘येस टू लाईफ...नो टू टोबॅको’ नावाचा हा कार्यक्रम ७ जून २०२० रोजी सायंकाळी ८ वाजता जागतिक तंबाखूरहित सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमामध्ये आघाडीचे गायक सहभागी होत असून त्यांत शान, कुणाल गांजावाला, सलीम सुलेमान, नेहा भसीन आदींचा समावेश आहे. या कार्यक्रमाचे आयोजन ‘कोविड -१९’ महामारीच्या परिस्थितीत कर्करोगावर उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या मदतीसाठी करण्यात आले आहे.
या जाहीर कार्याक्रमातून जो निधी जमा होणार आहे तो ‘कोविड-१९’ लॉकडाउनच्या काळात जे कर्करोग रुग्ण त्यांच्या उपचारांसाठी मुंबईत आले पण येथेच अडकून पडले अशा गरीब रुग्णांच्या मदतीसाठी वापरला जाणार आहे. ‘सीपीएए’ त्यांना महिनाभर लागणारे अन्नधान्य पुरवीत असून त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या निवारा सोयींबद्दलची माहिती देते आणि त्यांन स्वच्छता उपकरणे पुरविते. त्यांमध्ये मास्क, सॅनिटायझर आदी गोष्टींचा समावेश असतो.
त्याशिवाय या रुग्णांना कार्कारोगाबाद्द्लची जागरुकता, व्यवस्थापन व उपचार यांमध्येही संस्थेतर्फे मदत केली जाते. ‘सीपीएए’ने जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ)च्या मदतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात प्रख्यात गायक शान, कुणाल गांजावाला, सलीम मर्चंट, बेनी दयाळ, शादाब फारिदी, नेहा भसीन, ध्वनी भानुशाली, जोनिता गांधी, शिल्पा राव, अदिती सिंग, भूमी त्रिवेदी, आकृती कक्कर, अनुषा मणी, ममता शर्मा आणि रसिका आदी सहभागी होणार आहेत. त्याशिवाय इतर मान्यवरसुद्धा या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असेल. ‘टीकटॉक इंडिया’च्या अधिकृत हँडलवरून त्याचे थेट प्रक्षेपण होणार आहे.
या कार्यक्रमाला विशेष महत्त्व आहे कारण १५० मिनिटांचा हा विनाखंड करमणूक आणि माहिती कार्यक्रम हा सर्वात विश्वसनीय अशा संस्थांनी आयोजित केलेला आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, जागतिक आरोग्य संघटना आणि ‘कॅन्सर पेशंट्स एड असोशिएशन’ या संस्थांचे हे आयोजन आहे. ‘प्रोटेक्टींग युथ फ्रोम इंडस्ट्री मॅनीप्युलेशन अँड प्रीव्हेटिंग देम फ्रॉम टोबॅको अँड निकोटीन युज’ हे यंदाच्या ‘जागतिक तंबाखू विरोधी दिन २०२०’ची संकल्पना आहे. ‘सीपीएए’ने ‘क्विट टोबॅको इंडिया’ या उपक्रमाचे आयोजन केले आहे. त्याचा सर्व भर हा सामाजिक माध्यमांचा प्रभाव, पोहोच आणि प्रागतिक स्वरूप यांवर असणार आहे.
दरवर्षी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ ८० लाख लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरतात. तंबाखू आणि संबंधी उद्योग हा नियमितपणे नवीन ग्राहकांच्या शोधात असतो आणि बळी जाणाऱ्या व्यक्तींची जागा नव्या चेहऱ्यांनी भरून काढली जाते. त्यामाध्यमातून महसूल कायम राखला जातो. भारतात तंबाखूच्या सेवनाने दरवर्षी तब्बल १३.५ लाख लोक मृत्यू पावतात. जागतिक स्तरावर जे कर्करोगाचे बळी दरवर्षी जातात त्यातील २५ टक्के हे तंबाखूसेवनामुळे जातात. निकोटीन आणि तंबाखूच्या सेवनामुळे कर्करोगाचा तसेच कार्डीओव्हॅस्क्यूलर आणि पल्मनरी रोगांचा धोका वाढतो. साधारण १० लाख लोक हे दरवर्षी अप्रत्यक्ष धुम्रपानामुळे मृत्युमुखी पडतात. तंबाखूच्या कंपन्या या दरवर्षी विपणन आणि जाहिरातीवर ८ अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक रक्कम खर्च करतात. त्याचा परिणाम असा होतो कि प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशा धुम्रपानामुळे ८० लाख लोक जगभरात मृत्यू पावतात.
‘कॅन्सर पेशंट्स एड असोशिएशन’च्या कार्यकारी संचालक श्रीमती अनिता पिटर म्हणाल्या, “जागतिक तंबाखूविरोधी दिन २०२०’च्या माध्यमातून सर्वसाधारण जनता आणि धोरणे बनविणारे अधिकारी यांच्यामध्ये तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ्यांच्या उद्योग जगताच्या विविध समाजविरोधी धोरणांबद्दल जागरूक केले जाणार आहे. युवकांमध्ये तंबाखूसेवनाचे जे दुष्परिणाम असतात त्यांच्याबद्दल या दिनाच्या निमित्ताने जागरुकता निर्माण केली जाणार आहे. सीपीएए गेली ५१ वर्षे कर्करोग रुग्णांसाठी काम करत आहे आणि हे काम गौरवास्पद असेच आहे. या माध्यमातून दरवर्षी आम्ही तब्बल ३००० मौखिक आणि फुप्फुसाच्या कर्करोगाच्या रुग्णांना मदत करत असतो. ‘कोविड-१९’च्या पार्श्वभूमीवर हे काम अधिक महत्वपूर्ण बनले आहे, कारण धुम्रपानामुळे फुप्फुस अधिक कमकुवत होते व त्यांना या विषाणूची लागण होण्याची शक्यता बळावते.