आहोत आम्ही बेस्ट!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jun-2020   
Total Views |
Vedh_1  H x W:




आम्ही ‘बेस्ट’ आहोत. आम्ही लोकप्रिय आहोत यासाठी सर्वेक्षणाचा घाट घातला जातोय. पण मुंबईत किती लोकांची कोरोना स्क्रीनिंग झाली? किती कोरोनाग्रस्तांना तात्काळ उपचार सुरू झाले, किती कोरेानाग्रस्तांच्या घरातल्यांना कुठे कसे ‘क्वारंटाईन’ केले. या ‘क्वारंटाईन सेंटर’ची व्यवस्था कोण कशी करते आहे? याचे सर्वेक्षण करण्याची वेळ आली आहे. प्रशासनाने हेल्पलाईन दिली आहे, तिथे चौकशी करा, हे उत्तर तत्काळ दिले जाते. पण ‘जावे त्यांच्या वंशा.’ लोक घरात भीतीने मरणे पसंत करत आहेत, पण उपचार करण्यासाठी बाहेर येत नाहीत. हा दोष कुणाचा आहे? अर्थात, सरकार किंवा प्रशासन घराघरात जाऊ शकत नाही. पण वस्तीपातळीचे नियोजन तर करायला हवे ना? असे जरी म्हटले तरी उत्तर असते ‘मोदी काय करतो?’, ‘भाजप काय करते?’ (हो अशीच भाषा). याला मोदी आणि भाजपचे यश म्हणावे की राज्य सरकारचे अपयश म्हणावे? स्वत:ला भाजपविरोधी समजणारेही कोरोना काळात काम कुणी करावे यावर मोदींनी आणि भाजपने काम करावे असा सल्ला देतात. मुंबईचा कोरोना मृत्यू दर ३.९ झाला आहे. कोरोनाग्रस्त, त्यांच्या परिवाराची समस्या भीषण आहे. याबद्दल काही बोलले तर उत्तर दिले जाते राजकारण करता. राज्य सरकारपेक्षा त्यांचे हस्तक अशा भूमिकेत आहेत की, कोरोनामुळे निर्माण झालेली समस्या मांडली की लगेच मोदी, भाजप, संघ आणि फडणवीस यावरची त्यांची पोपटपंची सुरू होते. माणूस मरत असतानाही, आणि त्याचा परिवार जीवंतपणी नरकयातना भोगत असतानाही हे सगळे लोक आपली सत्ताच कशी चांगली हे सांगण्याचा आटापीटा करत आहेत. अर्थात कोणतेही राजकारणी हेच करतील, पण राजकारण करत असताना थोडंतरी समाजकारण करावं, ही बापड्या महाराष्ट्राची इच्छा आहे. अर्थात लोकांच्या इच्छा जपण्याचे दिवस रद्दीतच गेले. काही बोलाल तर बंगले आहेतच. तिथे तुमचा आवाज बिनबोभाट बंद केला जाऊ शकतो. मारणारे ‘क्वारंटाईन’ होतील किंवा नामानिराळे राहतील. न्याय तर मिळणे दूरचीच गोष्ट. सध्या महाराष्ट्रात, मुंबईत अशी परिस्थिती आहे की कोरोनाने मरा किंवा कोरोनाने घाबरून मरा. आम्हाला विचारायचे नाही. आम्ही ‘बेस्ट’ आहोत, ‘बेस्ट’ आहोत आम्ही, आहोत आम्ही ‘बेस्ट.’ समजलं?

आम्ही ‘महान’ आहोत


सोनू सूदला महात्मा का बनवले? आम्ही का मेलो होतो? त्याने स्वत:च्या पैशाने, काही ट्रस्टच्या पैशाने लोकांना त्यांच्या त्यांच्या घरी पोहोचवले. उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा, कर्नाटक किती तरी लोकांना महाराष्ट्राबाहेरच्या राज्यात परत पाठवले म्हणे. लोक काय त्याचे गुणगाण गात आहेत. त्याची तुलना कुणाकुणाशी करत आहेत. महात्माच बनवून टाकले त्या सोनू सूदला. महाराष्ट्रात काय वाहतूक सेवा नाही? नांदेडहून मुंबईला अशोकराव आले ना? पण नाही. या सोईबद्दल कुणीच काही बोलत नाही. मुंबईची परिस्थिती आज जी आहे ती नसती, तर कुणीतरी मुंबई सोडली असती का? मुंबईला अशा परिस्थितीमध्ये आणले की लोकांना मुंबई सोडावीशी वाटली. त्यामुळेच तर सोनू सूद त्यांना मुंबईबाहेर पाठवू शकला. त्यात आमचे मोठे योगदान आहे. पण लोकांना आमच्यासारखे पडद्यामागचे कलाकार दिसतच नाही. मुंबई-महाराष्ट्र सगळ्या देशाची शान होता. देशाच्या कानाकोपर्‍यातून दररोज हजारो-लाखो लोकं इथे मुंबईत यायची. मुंबईत कुणीही कष्टकरी उपाशी मेला असा दाखला नाही. या मुंबईत एकदा तरी जायचे अशी देशभरातल्या लोकांची इच्छा. आज या मुंबईतून लोक जीव घेऊन पळून जात आहेत. याचे श्रेय कुणाला जाते? मुंबईला आज ‘कोरोना क्रमांक १’चा किताब बहाल झाला, त्यामुळेच तर लोक मुंबई बाहेर जायचा विचार करू लागली. लोक घाबरली म्हणूनच तर सोनू सूद त्यांना त्यांच्या घरी पाठवू शकला. नाही तर त्याला हे शक्य तरी होते का? पूर आला, भूकंप झाला, बॉम्बस्फोट झाला, कसाबचा दहशतवद झाला, मुंबईतून कुणी बाहेर गेले का? नाही ना? पण ‘आम्ही करून दाखवलं.’ काय म्हणता? करून दाखवलं म्हणजे कोरोना काळात मुंबईची अवस्था हिनदीन होत असताना आम्ही काही केले नाही? असे कसे म्हणता, मुंबईला भारत देशाच्या बरोबरीला आणले. आज देशाचा कोरोना मृत्युदर आणि एकट्या मुंबईचा मृत्युदर समान आहे. आहात कुठे? हे सगळे होत आहे म्हणून तर लोक मुंबईबाहेर जात आहेत. म्हणून तर सोनू सूद त्या लोकांना राज्याबाहेर पाठवू शकला. त्यात सोनूचे काय योगदान. ते योगदान आमचेच. तो महान नाही, आम्ही महान आहोत.



@@AUTHORINFO_V1@@