चतुर्भुज आणि चतुर्भुज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jun-2020
Total Views |

chaturbhuj_1  H



मुक्काम -
डेन्व्हर रेल्वे स्टेशन. पूर्वेला जाणारी रेल्वे लवकरच सुटणार होती. येणार्‍या प्रवाशांची झुंबड उडाली होती. एका डब्यात खिडकीनजीकच्या सीटवर उत्तम पोशाखातील एक देखणी तरुणी बसली होती. गाडी सुटण्यापूर्वी काही क्षण दोन तरुण घाईघाईने डब्यात चढले. दोघांपैकी एक देखणा, आक्रमक डोळ्यांचा आणि चकाचक पोशाखात होता. दुसरा गंभीर चेहर्‍याचा, राकट आणि जरा मळलेल्या पोशाखात होता. दोघांच्या हातात हातकडी होती. डबा जवळजवळ भरलेला होता. फक्त त्या तरुणीच्या समोरच्या दोन सीट्स मोकळ्या होत्या. तिच्या चेहर्‍याकडे लक्ष गेल्यावर दोघा तरुणांपैकी एकाच्या चेहर्‍यावरचे भाव बदलले. तो दुसर्‍याच्या कानात काहीतरी पुटपुटला. दुसर्‍याने मान हलवून होकार दिला. दोघे समोरच्या रिकाम्या जागेवर येऊन बसले. तिचे दोघांकडे लक्ष गेले. तिच्याही चेहर्‍यावरचे भाव बदलले. पण, दोघे काहीच बोलले नाहीत.


तिने देखण्या तरुणाकडे पाहून मनमोहक स्मित केले. मग खाकरल्यासारखं करून प्रांजळ आणि मधुर आवाजात ती बोलू लागली, “ईस्टन, इतक्या वर्षांनी आपण भेटतोय. लहानपणी तू घर सोडून सैन्यात भरती व्हायला निघालास. त्याच्या आदल्या दिवशी आपलं भांडण झालं होतं. अजून तो राग आणि अबोला? तुझ्याआधी मीच बोलायला हवं?”


तेव्हा समोरचा देखणा तरुण ओशाळगत हसला आणि हातकडी नसलेल्या आपल्या डाव्या हाताने तिच्याशी हस्तांदोलन करीत म्हणाला, “तुझ्यावरचा राग मी केव्हाच विसरलो. पण, थोडा संकोच वाटत होता. संभाषणाला कशी सुरुवात करावी याचाच मी विचार करीत होतो.” मग त्याने उजवीकडे वळून आपल्या राकट जोडीदाराला सांगितले, “ही माझी बालमैत्रीण, मिस फेअरचाईल्ड.”


राकट इसम स्मितहास्य करीत म्हणाला, “मिस, तुझी आणि मार्शलची जुनी ओळख दिसते. मला तो अटक करून लिव्हेनवर्थ तुरुंगात घेऊन चाललाय. माझ्या वतीने तू रदबदली केलीस तर मला तुरुंगात सोपवताना तो माझ्याबद्दल चार शब्द चांगले बोलू शकतो आणि माझी शिक्षा सौम्य होऊ शकते.” एवढं बोलून राकट इसम खिडकीबाहेर पाहू लागला. देखणा तरुण आणि तरुणी एकमेकांशी बोलू लागले.


“सैन्यात जाण्याऐवजी तू पोलीस खात्यात नोकरी धरलीस तर...?”

“आपण आयुष्यात एखादी गोष्ट ठरवतो. पण नियती माणसाला कुठं कशी नेईल हे सांगता येत नाही.”

“वॉशिंग्टनला गेल्यावर आपली निवांत भेट होईल नं. तू या कैद्याला तुरुंगात पोचवून घरी ये. आपण खूप गप्पा मारू.”

“अर्थात, पण लगेच नाही. तिथं पोहोचल्यावर माझ्या मागे बरीच कामे आहेत. तुझा नवा पत्ता मात्र देऊन ठेव. मीच सवड झाली की तुला येऊन भेटेन. मनाप्रमाणे वागता येण्याचे आपले फुलपाखरी दिवस संपले, फेअरचाईल्ड...” त्याच्या बोलण्यात एक हळवी छटा होती.तिने पर्समधून कागद काढून आपला पत्ता लिहून त्याला दिला. त्याने तो खिशात ठेवला. थोडा वेळ दोघे असेच इकडच्या तिकडच्या गप्पा मारीत राहिले. त्यांच्या लहानपणीच्या आठवणी रंगात आल्या.अचानक खिडकीतून बाहेर बघत बसलेला तो राकट तरुण आत वळून बघत म्हणाला, “मिस फेअरचाईल्ड, तुमच्या गप्पात व्यत्यय आणल्याबद्दल मी क्षमा मागतो. पण, आम्ही सकाळपासून बरीच धावपळ केलीय. आम्हाला अगदी पाणी पिण्याचीही फुरसत मिळाली नाही. आम्ही डायनिंग कारमध्ये जाऊन पाणी आणि कॉफी घेतली तर चालेल? प्लीज?”

फेअरचाईल्डने मान हलवून होकार दिला. दोघे उठून डायनिंग कारकडे गेले. पलीकडच्या कोपर्‍यातल्या सीट्सवर दोन प्रवासी बसले होते. नकळत या तिघांचे संभाषण त्यांच्या कानांवर पडले होते. दोघे निघून गेल्यावर हे प्रवासी कुजबुजत्या स्वरात बोलू लागले.

“पोलीस खात्यातली नोकरी किती वाईट असते, बघा. त्या मार्शलला आपली बालमैत्रीण इतक्या वर्षांनी भेटली. पण, तो तिला घेऊन कॉफी घ्यायला जाऊ शकला नाही. त्याला मैत्रिणीऐवजी त्या कैद्याबरोबर कॉफी घ्यावी लागली. स्टेशनवर उतरल्यावर देखील त्याला आधी आपलं कर्तव्य पार पाडावं लागेल.”

“तुझा काहीतरी गैरसमज झालाय. ती मुलगी मार्शलची बालमैत्रीण नाहीच मुळी.”

“पण, आपण मघापासून बघतोय की, इतका वेळ दोघे चांगले गप्पा मारीत होते. जुन्यापान्या आठवणी काढत होते.”

“तू त्यांच्याकडे नीट बघितलं नाहीस. मार्शल जेव्हा गुन्हेगाराला हातकडी घालून धरून नेतात, तेव्हा एक कडी गुन्हेगाराच्या उजव्या हातात आणि दुसरी कडी मार्शलच्या डाव्या हातात असते. मार्शल खिडकीत बसलेला होता. त्या मुलीशी जो बोलत होता, तो कैदी होता. मुलीला वाईट वाटू नये म्हणून त्या मित्राने आपण मार्शल असल्याची थाप मारली आणि सहानुभूतीचा भाग म्हणून खर्‍या मार्शलने त्या कैद्याला तात्पुरती साथ दिली. आता दोघे डायनिंग कारमध्ये कॉफी घेतल्यावर दुसर्‍या डब्यात जाऊन बसतील. कारण, रेल्वेतून उतरल्यावर मार्शलच्या मदतीला इतर पोलीस येतील तेव्हा ते दृश्य त्या मैत्रिणीला दिसू नये, अशी त्या कैद्याची इच्छा असणार.”

- विजय तरवडे
(ओ हेन्रीच्या ’Hearts and Hands' या कथेवर आधारित.)
@@AUTHORINFO_V1@@