टेबल टेनिस सुवर्णस्टार मनिका बत्रा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jun-2020   
Total Views |
मनिका  बत्रा_1  





‘खेलरत्न’ या क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाच्या पुरस्कारासाठी टेबल टेनिस सुवर्णस्टार मनिका बत्राची शिफारस करण्यात आली. तेव्हा, जाणून घेऊया तिचा हा रंजक प्रवास...

 
सध्या ‘लॉकडाऊन’ आणि कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर क्रीडास्पर्धा, सरावही ठप्प आहे. तरी काही देशांमध्ये हळूहळू क्रीडास्पर्धांच्या आयोजनाला परवानगी मिळालेली दिसते. पण, दरवर्षी अनेक खेळांमधून काही निवडक आणि सर्वोत्त्म कामगिरी करणार्‍या खेळाडूंना ‘खेलरत्न’ या पुरस्काराने भारत सरकारतर्फे सन्मानित केले जाते. यामुळे तरुण खेळाडूंना नक्कीच एक नवी उमेद मिळते. यावर्षी टेबल टेनिस स्टार खेळाडू मनिका बत्राच्या नावाचीदेखील ‘खेलरत्न’ पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. २०१८च्या ‘कॉमनवेल्थ’ स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये सुवर्णपदक जिंकणारी मनिका पहिली भारतीय महिला ठरली.

 
मनिकाचा जन्म १५ जून, १९९५ रोजी दिल्लीमध्ये झाला. दिल्लीतील नारायणा विहार या भागामध्ये तिचे बालपण गेले. सुषमा आणि गिरीश बत्रा यांची ती सर्वात धाकटी कन्या. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी तिने टेबल टेनिस खेळायला सुरुवात केली. तिची सर्वात मोठी बहीण अंचल आणि भाऊ साहिल हे दोघेही तेव्हा टेबल टेनिस खेळायचे. त्यांच्यामुळेच मनिकालाही टेबल टेनिसची ओढ लागली. प्रारंभीच्या खेळामध्ये तिच्या मोठ्या बहिणीचा मनिकावर चांगला प्रभाव होता. नवी दिल्लीतील हंसराज मॉडेल स्कूलमध्ये शिकत असताना तिने आठ वर्षांखालील राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये काही सामने जिंकले. या कामगिरीनंतर तिच्या घरच्यांनी तिला संदीप गुप्त यांच्याकडे टेबल टेनिसचे पुढचे प्रशिक्षण घेण्यास पाठवले. याचदरम्यान तिचे वडील मानसिक आरोग्याच्या काही समस्येमुळे ग्रस्त होते. तरीही त्यांनी मनिकाला मात्र प्रोत्साहन दिले. २००८मध्ये वयाच्या तेराव्या वर्षी मनिकाने एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. याच दरम्यान तिला मॉडेलिंगसाठी बर्‍याच ऑफर्सही आल्या होत्या. मात्र, त्या झगमगत्या दुनियेला धुडकावून तिने टेबल टेनिसशी एकनिष्ठ राहाण्याचा निर्णय घेतला.


 
पुढे २०११ मध्ये मनिकाने चिलीमध्ये झालेल्या २१ वर्षांखालील श्रेणीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना रौप्यपदक कमावले. पुढे राष्ट्रीय पातळीवरही टेबिल टेनिसमध्ये मनिकाने अनेक पदकांची कमाई केली. २०१४ मध्ये ग्लासग्लोव येथे झालेल्या ‘कॉमनवेल्थ’ स्पर्धेत तिने एकेरी टेबल टेनिस स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली. तसेच याचवर्षी झालेल्या आशियाई स्पर्धेमध्येही तिने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत धडक दिली. २०१५ वर्ष हे तिच्या कारकिर्दीमध्ये महत्त्वाचे ठरले. २०१५च्या ‘कॉमनवेल्थ टेबल टेनिस स्पर्धे’मध्ये अंकिता दास आणि मौमा दास यांच्यासोबत सांघिक पद्धतीमध्ये मनिकाने रौप्यपदक पटकावले. अंकिता दाससोबत दुहेरी स्पर्धेमध्येही रौप्य, तर एकेरी स्पर्धेमध्ये कांस्यपदक पटकावले. या एकाच वर्षात तिने तीन आंतरराष्ट्रीय पदकांची कमाई केली. पुढे २०१६ हे वर्षदेखील तिच्यासाठी लाभदायक ठरले. यावर्षी झालेल्या दक्षिण आशियाई स्पर्धेमध्ये पूजा सहस्रबुद्धेसोबत महिला दुहेरीमध्ये सुवर्णपदक, तर मिश्र दुहेरीमध्ये अ‍ॅन्थनी अमलराजसोबत सुवर्णपदकाची तिने कमाई केली. या कामगिरीमुळे तिची निवड २०१६च्या उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये करण्यात आली. पण, या स्पर्धेमध्ये मनिका अपयशी ठरली. मात्र, त्या अपयशाने खचून न जाता, तिने पुढच्या स्पर्धांची तयारी जोमात केली. वयाच्या २२व्या वर्षीच तिने जागतिक महिला टेबल टेनिसच्या क्रमवारीत ५८व्या स्थानावर झेप घेतली.

 
 
२०१८ मध्ये झालेले ‘कॉमनवेल्थ गेम्स’ हे सर्वार्थाने तिच्यासाठी खास होते. मनिका ही भारतीय महिला टेबल टेनिस संघाचे नेतृत्व करत होती. ऑस्ट्रेलियामधील गोल्ड कोस्ट येथे झालेल्या या स्पर्धेमध्ये तिच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने चार वेळा सुवर्णपदक जिंकलेल्या सिंगापूरच्या संघाला धूळ चारत, भारतीय संघाला सुवर्णपदक जिंकून दिले. याच स्पर्धेमध्ये मोमा दाससोबत महिला दुहेरीमध्ये भारताला रौप्यपदक मिळवून दिले. सिंगापूरच्या यू मेंग्यायूला पछाडत मनिकाने कॉमनवेल्थ टेबल टेनिस स्पर्धेमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक पटकावले. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. पुढे मनिकाची २०१८ सालची कामगिरी बघून आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस फेडरेशनने ‘ब्रेकथ्रू स्टार पुरस्कार’ हा सन्मान देऊन तिचा गौरव केला. टेबल टेनिसच्या इतिहासात हा सन्मान प्राप्त करणारी ती एकमेव टेबल टेनिसपटू ठरली. याचवर्षी २०१८ मध्ये तिला ‘अर्जुन पुरस्काराने’देखील सन्मानित करण्यात आले. सध्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसच्या जागतिक क्रमवारीमध्ये ती ६१व्या स्थानावर आहे.


 
भारतीय क्रीडाविश्वाने अनेकवेळा तिच्या कामगिरीची दाखल घेतली आहे. २०१९मध्येही तिची शिफारस ‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारा’साठी करण्यात आली होती. आता २०२० मध्येही तिची शिफारस ‘खेलरत्न पुरस्कारा’साठी करण्यात आली आहे. यापुढेही तिची कामगिरी अशीच बहरत राहो आणि टेबल टेनिसमध्येही भारताचे नाव हे उज्ज्वल राहो, यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे मनिकाला पुढील प्रवासाठी हार्दिक शुभेच्छा...!





@@AUTHORINFO_V1@@