मुंबईकरांनो, सावधान!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jun-2020
Total Views |

mumbai_1  H x W


पहिल्याच पावसाने ‘बेस्ट’ची वाहतूकही इतर मार्गाने वळवण्यात आल्याने अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांचे हाल झाले. ही मान्सूनपूर्व पावसाची झलक आहे. खरोखरच मान्सून बरसू लागेल, तेव्हा मुंबईकरांची सत्वपरीक्षाच सुरू होईल. मुंबईकरांनो, तयार राहा !



मुंबई हे शहर असे आहे की त्या शहराला नेहमीच सत्वपरीक्षेला सामोरे जावे लागते. आता हेच पाहा ना, कोरोनाच्या जागतिक महामारीशी लढत सुरू असतानाच ‘निसर्ग’ चक्रीवादळाचे संकट येऊन ठाकले. सुदैवाने वादळाने दिशा बदलली म्हणून थोडक्यात निभावले. पण, हेच चक्रीवादळ मुंबईतून गेले असते, तर दुहेरी संकटाशी सामना करताना मुंबईकरांची काय गत झाली असती, याची कल्पनाच करवत नाही. तरीही ‘निसर्ग’ वादळाने जी काही थोडीशी धडक दिली, त्यावरून मुंबईत पावसाळ्यात काय हाल होणार आहेत, याची कल्पना येते.कोरोनाचा सामना करत असताना पालिका प्रशासनाचे मुंबईकरांच्या इतर सोयी-सुविधांकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे एप्रिलच्या सुरुवातीला होणार्‍या नालेसफाईच्या कामाला एप्रिलच्या अखेरीस सुरुवात झाली. बरे, या कामाकडे लक्ष ठेवायला प्रशासनाकडे कर्मचारी वर्गच अपुरा होता आणि आजही कर्मचारी वर्ग अपुराच आहे. त्यामुळे रस्त्याचे काम असो वा नालेसफाई असो, ठेकेदारांचे आयतेच फावले आहे. ते सांगतील ते सत्य मानावे लागते, अशी परिस्थिती.



पावसाळापूर्व होणारी ७० टक्के नालेसफाई जवळजवळ पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, हे कितपत सत्य आहे ते ठेकेदारच जाणो ! ३१ मेपर्यंत नालेसफाईच चालली होती. मग नाल्याच्या काठावर काढून ठेवलेला गाळ सुकल्यानंतर उचलण्यासाठी किमान १५ दिवस तरी लागतात. मात्र, ‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर २ जूनपासून पावसाला सुरुवात झाली. ४ जूनच्या दुपारपर्यंत पाऊस बरसत होता. म्हणजे काढलेला गाळ पुन्हा नाल्यात गेला आहे. त्यामुळेच मान्सूनपूर्व पहिल्याच पावसात मुंबईत काही ठिकाणी पाणी साचले. नाले, गटारे साफ केल्याचा दावा होत असलेली ठिकाणे पुन्हा कचर्‍याने भरून वाहू लागली. गुरुवारी सकाळपासूनच कोसळलेल्या संततधार पावसामुळे मुंबईतील सखल भागात पाणी साचले. शीव येथील गांधी मार्केट, किंग्ज सर्कलचा भाग दरवर्षीप्रमाणे पाण्याखाली गेला. पहिल्याच पावसाने ‘बेस्ट’ची वाहतूकही इतर मार्गाने वळवण्यात आल्याने अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांचे हाल झाले. ही मान्सूनपूर्व पावसाची झलक आहे. खरोखरच मान्सून बरसू लागेल, तेव्हा मुंबईकरांची सत्वपरीक्षाच सुरू होईल. मुंबईकरांनो, तयार राहा!



रामभरोसे...



कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने १ जून ते ३० जूनपर्यंत पाचवा ‘लॉकडाऊन’जाहीर केला असला तरी त्याला ‘अनलॉकडाऊन’ असे नाव दिले आहे. म्हणजे, दोन महिने ‘लॉकडाऊन’मुळे घरात बसलेल्या जनतेला थोडासा तरी दिलासा मिळावा यासाठी ‘लॉकडाऊन’मधून थोड्याथोड्या सवलती, मुभा देण्याचा हा प्रयत्न आहे. मात्र, त्याचे सर्व अधिकार राज्यांना देण्यात आले आहेत. ‘लॉकडाऊन’चा पहिला टप्पा संपल्यानंतर गावी जाण्यासाठी इतर राज्यातील श्रमिकांनी स्थलांतर केले. त्यांच्या पाठोपाठ राज्यातल्या चाकरमान्यांनीही ‘गड्या आपुला गाव बरा’ असे म्हणत कोकणासह पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या भागाकडे प्रयाण केले. बरे, तेथे जाऊनही ते १४ दिवस ‘क्वारंटाईन’च राहिले. पण, हवा खेळती ही त्यांच्यासाठी समाधानाची बाब होती. मात्र, गेलेल्या चाकरमान्यांमुळे कोकणासह इतर भागातही कोरोनाचा फैलाव होत राहिला.

तेथे मोठ्या संख्येने कोरोनाबाधित आढळून आले आहेत. आता टप्याटप्प्याने मुंबई सुरू होत असल्याचे लक्षात येताच बाहेरगावी गेलेले लोक पुन्हा मुंबईकडे परतू लागले आहेत. यातील ३०टक्के लोक गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये राहणारे आहेत. जर गावी गेल्यानंतर हे लोक ‘क्वारंटाईन’ राहिले, तर मुंबईत त्यांच्या घरात आल्यानंतर त्यांना ‘क्वारंटाईन’ ठेवण्यात यावे, या मुद्द्यावरून आता गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये वाद रंगू लागले आहेत. कोरोना संसर्ग मार्च महिन्यापासून वाढत गेल्याने मुंबईतील सर्व गृहनिर्माण सोसायट्यांनी प्रवेशबंदी लागू केली. अत्यावश्यक कामासाठी कुटुंबातल्या एकाच सदस्याने बाहेर पडण्याची मुभा देताना बाहेरच्यांना ‘नो एंट्री’ केली. त्यामुळे कोरोना काही प्रमाणात नियंत्राणात राहिला. मात्र, शिथीलता मिळताच घरकाम करणार्‍या महिलांना प्रवेश देणे सुरू झाले, प्लम्बिंगची कामे सुरू झाली. बाहेगावी असणार्‍या मुलांना ‘क्वारंटाईन’च्या अटीवर परवानगी देण्यास सुरुवात झाली. आता कुटुंबात असणारी माणसे आणि बाहेरगावून येणारा मुलगा त्यांच्यातच ‘क्वारंटाईन’ राहून कोरोनाला खरोखरच अटकाव होईल का, हा प्रश्न आहे. राज्य शासनाने याबाबतची नियमावली जाहीर करणे आवश्यक आहे, अन्यथा कोरोनाची साखळी तुटणार नाही. त्याचे संक्रमण चालूच राहील आणि सर्वांचेच जीवन रामभरोसे होईल.
- अरविंद सुर्वे
@@AUTHORINFO_V1@@