स्त्री-पुरुष कर्मचारीसंख्येतील तफावतीची कारणमीमांसा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jun-2020
Total Views |

vicharvimarsh_1 &nbs


सध्या कोरोना आणि ‘लॉकडाऊन’मुळे ‘वर्क फ्रोम होम’च्या पर्यायाचा जगभरात अवलंब होताना दिसतो. पण, अजूनही बरेच ठिकाणी पुरुष ‘वर्क’ मोडवर, तर महिला ‘होम’ फ्रंट सांभाळताना दिसतात. भारतीय उद्योगधंद्यांमध्येही स्त्री-पुरुष कर्मचारीसंख्येत ही तफावत स्पष्ट दिसून येते. तेव्हा, त्यामागील कारणांचा ऊहापोह करणारा हा लेख...



शासकीय-प्रशासकीय अशा विविध स्तरांवर कर्मचार्‍यांमधील स्त्री-पुरुष कर्मचार्‍यांची संख्या आणि त्यांची टक्केवारी यांच्यात प्रचंड तफावत आजही दिसून येते. ही तफावत कमी करण्यासाठी प्रयत्न होत असले तरी त्या प्रयत्नांना अद्याप पुरेसे यय आलेले मात्र दिसत नाही. यासंदर्भात ‘लिंक्ड इन’ द्वारा प्रकाशित तपशीलानुसार सध्या वाहतूक व्यवसाय, बांधकाम व उत्पादन क्षेत्रात काम करणार्‍या कर्मचार्‍यांमध्ये पुरुष कर्मचार्‍यांची टक्केवारी ८५टक्के इतकी असून तंत्रज्ञानावर आधारित अन्य उद्योगांमध्ये ही टक्केवारी सुमारे ६२टक्के आहे.‘लिंक्ड इन’च्या या अभ्यासपूर्ण अहवालानुसार तसे पाहता भारतातील सर्वच प्रकारच्या उद्योग-व्यवसायांत पुरुष कर्मचार्‍यांचे प्रमाण त्यांच्या महिला सहकार्‍यांपेक्षा अधिक आहे. जागतिक स्तरावर कर्मचार्‍यांमधील स्त्री-पुरुष कर्मचार्‍यांच्या संख्येचा विचार करता, ही तफावत जगात सर्वाधिक असल्याचे दिसून येते.



या अभ्यासात ‘लिंक्ड इन’ने सुमारे पाच कोटी कर्मचार्‍यांच्या माहितीचे विश्लेषण केले. या अभ्यासाला अधिक व्यापकता देण्याच्या दृष्टीने उद्योग-व्यवसायातील १८ वर्गगटातील ११५ प्रकारच्या उद्योगांना समाविष्ट करण्यात आले होते. तेव्हा सकृतदर्शनी असे आढळून आले की, अभ्यासात समाविष्ट ११५ प्रकारच्या उद्योगांतील केवळ दोन उद्योगांमध्येच स्त्री-पुरुष कर्मचार्‍यांची संख्या बरोबरीची वा समतुल्य होती. याशिवाय वरील १८ वर्गगटातील कायदेविषयक सल्ला, वैद्यकीय क्षेत्र, शिक्षण व आरोग्यसेवा यांसारख्या क्षेत्रात महिला कर्मचार्‍यांची संख्या ही पुरुषांपेक्षा अधिक असल्याचेही स्पष्ट झाले. यालाच स्वयंसेवी क्षेत्राची पण जोड दिली जाऊ शकते. कारण, त्याठिकाणीही महिला कर्मचार्‍यांची संख्या तुलनेने अधिक आहे. याउलट कर्मचार्‍यांमधील पुरुष-महिला कर्मचार्‍यांच्या संख्येच्या संदर्भातील तफावत वाहतूक क्षेत्रात सर्वाधिक असल्याचेही दिसून येते. यासंदर्भात वाहननिर्मिती उद्योग क्षेत्रातील उपलब्ध आकडेवारीनुसार, टाटा मोटर्समध्ये पुरुष कर्मचार्‍यांची टक्केवारी ८८टक्के असून मारुती उद्योगात हीच संख्या तेवढीच म्हणजेच ८८.६ टक्के आहे. अशीच स्थिती पवनऊर्जा क्षेत्रातील ‘सुझलॉन’ या कंपनीच्या संदर्भात सांगता येईल. तेथील पुरुष कर्मचार्‍यांचे भारतातील प्रमाण सुमारे ८९टक्के असून आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘सुझलॉन’मधील पुरुष कर्मचार्‍यांची टक्केवारी ही ९५टक्के आहे. यामागे अर्थातच कंपनीच्या कामाचे स्वरूप व कर्मचार्‍यांचे काम ही प्रमुख कारणे आहेत.


या अभ्यासात प्रामुख्याने लक्षात आलेली बाब म्हणजे संगणक सेवा, विमान वाहतूक, औषध उत्पादन यांसारख्या उद्योगांमध्ये पुरुष कर्मचार्‍यांचे प्रमाण ६५टक्के आहे. याशिवाय काही निवडक कंपनीनिहाय पुरुष कर्मचार्‍यांचा यानिमित्ताने उपलब्ध झालेला तपशील म्हणजे, ‘अ‍ॅमेझॉन इंडिया’मध्ये ६२.५ टक्के, गुगल इंडिया ६०टक्के, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ६६टक्के पुरुष कर्मचारी कार्यरत असून ‘इन्फोसिस’मधील पुरुष कर्मचार्‍यांची टक्केवारी आहे ६४टक्के आहे. या तपशील व आकडेवारीनुसार, कंपनी व व्यवस्थापनानुसार संबंधित कंपनीतील पुरुष-महिला कर्मचार्‍यांची संख्या व टक्केवारी यामध्ये वास्तवात येणारा फरक पण स्पष्ट होतो. त्यातही महत्त्वाचे म्हणजे, ‘इन्फोसिस’मधील पुरुष-महिला कर्मचार्‍यांची ‘लिंक्डइन’द्वारा संकलित-प्रकाशित आकडेवारी व प्रत्यक्ष कंपनीकडे उपलब्ध असणारी कर्मचार्‍यांची संख्या तंतोतंत जुळणारी ठरली आहे.



यापूर्वी २०१६मध्ये ‘लिंक्डइन’ने कौशल्यावर आधारित पुरुष व महिला कर्मचार्‍यांची विविध कंपन्यांमधील संस्थेचा विशेष अभ्यास केला होता. त्यावेळच्या अभ्यासात निवडक अशा ८५ कौशल्य क्षेत्रांचा समावेश केला होता. यामागे नोकरी-रोजगारांच्या संदर्भात कंपन्या-व्यवस्थापनांतर्फे त्यांच्या व्यावसायिक गरजांनुरूप देण्यात येणारे प्राधान्य व त्याचा प्रत्यक्ष पुरुष-महिला कर्मचार्‍यांच्या संस्थेवर होणारा परिणाम याची पडताळणी करणे हा उद्देश होता. त्यावेळच्या कौशल्यांवर आधारित अभ्यासादरम्यान प्रकर्षाने लक्षात आलेली बाब म्हणजे, त्यावेळी इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग, नेटवर्क अ‍ॅण्ड इंस्ट्रुमेंटेशन या पात्रताधारक व कौशल्यप्राप्त उमेदवारांना मोठे प्राधान्य दिले जात असे. अशा प्रकारच्या पात्रताधारक उमेदवारांमध्ये पुरुष कर्मचार्‍यांचे प्रमाण महिलांच्या तुलनेत अधिक होते. त्याचे मूळ वर नमूद केलेल्या अभ्यासक्रमांमध्ये मुलांचे प्रमाण मुलींपेक्षा अधिक असण्यावर विशेष प्रकाशझोत टाकण्यात आला होता.



भारतीय उद्योगधंद्यांमधील कर्मचार्‍यांची संख्या व त्यातील स्त्री-पुरुष कर्मचार्‍यांची टक्केवारी यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारच्या सांख्यिकी विभागातर्फे संकलित-प्रकाशित आकडेवारीचा मागोवा घेतला असता, असे दिसून येते की, सद्यस्थितीत भारतीय उद्योगक्षेत्रात काम करणार्‍यांमध्ये पुरुष व महिलांचे प्रमाण सुमारे ४ : १ असे आहे. याचाच अर्थ आपल्याकडे दर 4 पुरुष कर्मचार्‍यांमागे 1 महिला कर्मचारी कार्यरत असून ही तफावत नक्कीच चिंतनीय ठरते. ‘लिंक्डइन’च्या अभ्यास-सर्वेक्षणाने याच मुद्द्यावर शिक्कामोर्तब केले आहे, हे विशेष. दरम्यान भारतातील पुरुष व महिला कर्मचार्‍यांच्या संस्थेतील मोठ्या प्रमाणावरील फरक व त्यांच्या टक्केवारीत असणार्‍या तफावतीमागे काही ठोस कारणे आहेत. त्यात पदवी-अभियांत्रिकी शिक्षण संस्थांमध्ये मुळातच विद्यार्थ्यांच्या तुलनेत विद्यार्थिनींचे कमी असणारे प्रमाण, पदवी शिक्षणानंतर प्रत्यक्ष नोकरी न करता घरी गृहिणी म्हणून वावरणार्‍याकडे महिलांचा असणारा भर व त्याशिवाय प्रत्यक्ष नोकरी-रोजगाराच्या ठिकाणी पुरुष कर्मचार्‍यांना महिला कर्मचार्‍यांपेक्षा सर्वसाधारणपणे दिले जाणारे वाढीव पद-अधिकार व वेतन, या बाबीही महिलांना नोकरी-रोजगारापासून परावृत्त करत असल्याचे निदर्शनास आले आहे. या सार्‍यांचा संयुक्त परिणाम म्हणजे महिला कर्मचार्‍यांची संख्या ही पुरुष कर्मचार्‍यांपेक्षा तुलनेने कमीच राहिली आहे.


- दत्तात्रय आंबुलकर
(लेखक एचआर व्यवस्थापन सल्लागार आहेत.)
@@AUTHORINFO_V1@@