आता पुन्हा काझी गढी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jun-2020   
Total Views |
kajhi gadhi_1  


नाशिक शहरात पावसाळा सुरु झाला की, दोन विषय नेहमी चर्चिले जातात. एक म्हणजे दुतोंड्या मारुती किती पाण्यात बुडाला आणि दुसरा म्हणजे काझी गढी येथील नागरिकांना नोटीस धाडण्यात आली. काझी गढी कधीही ढासळू शकते वगैरे वगैरे. जुने नाशिक परिसरात उंचावर असणारा भाग म्हणजे काझी गढी. हा भाग जमीन भुसभुशीत असल्याने व उतारावर असल्याने पावसाळ्यात कोसळण्याचा धोका जास्त आहे. त्यामुळे येथील नागरिकांना इशारावजा सूचना देण्यासाठी प्रतिवर्षी नियमितपणे नोटीस धाडली जाते. तशी यंदाच्या वर्षीही ती प्रशासनाच्यावतीने धाडण्यात आली आहे. या वर्षी येथील नागरिकांनी पावसाळ्यातच आम्ही आठवतो का? अशी विचारणा प्रशासनाला केली आहे. एका अर्थी नागरिकांची ही उद्विग्नता योग्यच आहे. जुन्या नाशिकमधील गावठाणांमधील पडक्या वाड्यांइतकीच काझी गढी धोकादायक आहे. अनेक वर्षांपासून जीव मुठीत धरून राहणारे स्थानिक नागरिक जागा सोडण्यास तयार नाहीत. त्यामुळे या ठिकाणी गढीला संरक्षक भिंतींचा प्रस्ताव पुढे आला. त्यासाठी खर्चाचे अंदाज आखले गेले. मात्र, विविध कारणांमुळे काझी गढीचा प्रश्न कायम आहे. वर्षभर काझी गढी या नावाचा उल्लेख येथील रहिवासी सोडून अन्य कोणी करत असल्याचे अभावानेच आढळून येते. मात्र, पावसाळा सुरु झाला की, काझी गढी अचानक प्रकाशझोतात येते. वर्षभर न दिसणारे लोकप्रतिनिधीदेखील येथे पावसाळ्यात दिलासा देताना, अभ्यासपूर्ण दौरे करताना दिसून येतात. सर्व कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी यांचे पावसाळ्यातील काझी गढी भेटीचे छायाचित्र दिसून येते. येथील नागरिकांचा मूळ प्रश्न वर्षभरात का सोडविला जात नाही, हाच प्रश्न मात्र येथील नागरिकांना सतावत आहे. यंदाच्या वर्षी या नागरिकांचे स्थलांतरण करणे हे कोरोना पार्श्वभूमीवर अधिकच जोखमीचे ठरणारे आहे. त्यामुळे किमान मार्चपासून तरी काझी गढीचा विषय मार्गी लावणेकामी कार्य का केले गेले नाही, हाच खरा सवाल यानिमित्ताने पुढे येत आहे. अजून किती काळ येथील नागरिकांनी अधांतरी आयुष्य व्यतीत करावे, अशी विचारणा आता शहरात होऊ लागली आहे.



संधीचे सोने करणारे ग्रामस्थ



कोरोनामुळे देशवासीयांना ‘लॉकडाऊन’ या संज्ञेची प्रचिती आली. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात सुसह्य वाटणारा ‘लॉकडाऊन’ हा आताच्या टप्प्यात काहींना जाचक वाटत आहे. ‘लॉकडाऊन’ काळात प्राप्त झालेल्या वेळेचा सदुपयोग कोणी व्यक्तिगत कौशल्ये दाखविण्यासाठी केला, तर कोणी आराम करण्यास प्राधान्य दिले. मात्र, ‘लॉकडाऊन’मध्ये केरळमधील एका ग्रामपंचायतीने चक्क नवी कृषिक्रांती या काळात केली आहे. दि. २४ मार्च रोजी जेव्हा २१ दिवसांचे प्रथम ‘लॉकडाऊन’ घोषित करण्यात आले, तेव्हा एर्नाकुलम जिल्ह्यातील वडक्ककेरा पंचायतीच्यावतीने गावात कुणालाच बिनकामी न बसविण्याचे धोरण हाती घेण्यात आले. यासाठी गावातील मोकळ्या जागा, घरांजवळ तसेच छतांवरही भाज्यांची लागवड करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. तसेच, ही भाजी लागवड विना खत करण्याचे धोरण अनुसरण्यात आले. या मोहिमेचे बारसे ‘द व्हिजिटेबल फार्मिंग चॅलेंज’ या नावाने करण्यात आले. कल्पना उत्तम असल्याने आणि ‘लॉकडाऊन’ काळात रमवणारी असल्याने काही दिवसांतच पंचायत क्षेत्रातील १०,३१२ कुटुंबांपैकी ९,४१७ कुटुंबांनी यात आपला सक्रिय सहभाग नोंदविला. सध्याच्या घडीला ७० दिवसांच्या ‘लॉकडाऊन’च्या स्थितीचा सामना करत असताना येथील नागरिक भाज्यांबाबत स्वावलंबी झाले असल्याचे चित्र दिसून येत आहे. सामूहिक प्रयत्नांतून भाज्यांचे हे उत्पादन इतके झाले की केरळ सरकारच्या कृषी विभागाने शेतकर्‍यांसाठी मदत सुरू केली. येथे लोक अगोदर छोटे गट करून ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चे पालन करत आपापल्या घरांजवळील मोकळ्या जागा स्वच्छ करू लागले. नंतर जमिनीची मशागत केली. ग्रामपंचायतीने वेगवेगळ्या प्रकारच्या बियांची २० हजार पाकिटे मोफत दिली. आज येथे प्रत्येक घरात भेंडी, वांगी, भोपळे, टोमॅटो इत्यादी भाज्या डोलू लागल्या आहेत. पंचायतीचे साहाय्यक कृषी अधिकारी एस. सीना यांनी सांगितले की, “लोकांना प्रोत्साहन देऊन आम्ही हा कार्यक्रम सुरू केला होता. ‘लॉकडाऊन’दरम्यान घरबसल्या लोकांनी भाज्या लावाव्यात, हा उद्देश होता. हा प्रयोग खूपच यशस्वी ठरला. बहुतांश लोक आता कुटुंबासह शेतीचा आनंद घेत आहेत.” त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कारही देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ‘लॉकडाऊन’सारख्या स्थितीत एका बाजूला मानसिक स्वास्थ्य बिघडण्याच्या घटना समोर येत असताना संधीचे सोने करणारे ग्रामस्थ आपल्या कार्यातून खरा आदर्श उभा करत आहेत.
@@AUTHORINFO_V1@@